-->
संपादकीय पान मंगळवार दि. ४ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
सामाजिक बांधिलकी मानणारा कलावंत
------------------------------------
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचे एक गुणी कलावंत सदाशिव अमरापुरकर यांचे मुंबईत सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक बांधिलकी मानणारा एक कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. अमरापुरकर हे गेल्या दशकभरात एक कलाकार म्हणून निवृत्त झाल्याच्या स्थितीत होते, मात्र त्यांनी आपले आयुष्य सामाजासाठी वाहून घेऊन काम करण्यासाठी वेचण्याचा निश्चय केला होता. त्यादृष्टीने त्यांची विविध क्षेत्रात कामे चालत होती. बालपणापासून त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी देशात सामाजवादी चळवळीशी बांधिलकी ठेवून कामे केली होती. आदिवासी, कष्टकरी यांच्या विविध चळवळींशी ते निगडीत होते. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याशी जोडलेल्या अनेक आंदोलनात ते सक्रिय होते. तीन वर्षापूर्वी अण्णा हजारेंनी छेडलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनालाही त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. चित्रपटसृष्टीतला हा कलाकार ज्यावेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करीत असे त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटे आणि त्यांच्याबद्दल आपुलकीही वाटत राही. कारण अनेक कलाकार निवृत्त झाले तरी आपल्या बंदिस्थ राजवाड्यात राहून आपल्या गतवैभवाची स्वप्ने पाहून आयपले आयुष्य कुंठीत असतात. अर्थातच सदाशिव अमरापुरकर हे अशा कलाकालांसारखे नव्हते. मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक दिवंगत कलाकार निळू फुले हे ज्या प्रकारे सामाजिक बांधिलकी मानणारे कलाकार होते व त्यादृष्टीने ते जी कामे करीत होते त्याच धर्तीवर अमरापूरकर शेवटपर्यंत कार्यरत होते. निळू फुले आणि अमरापुरकर यांच्यात बरेच साधार्म्य होते असे म्हणता येईल. एक कलाकार म्हणून निळू फुलेंनी अनेक चित्रपटात नकारात्मक कामे प्रामुख्याने व्हिलनची कामे केली. मात्र सार्वजनिक जिवनात निळू फुले हे एक अत्यंत सज्जन गृहस्थ होते. अमरापूरकर यांनी देखील चित्रपटात अनेक वेळा व्हिलनची कामे किंवा नकारात्मक भूमिका केल्या. मात्र खर्‍या आयुष्यात ते एक चांगला गृहस्थ म्हणून आयुष्य जगले, लोकांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल होता. आज हे दोन्ही कलाकार आपल्यात नाहीत. यामुळे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. अहमदनगरमध्ये एका सामन्य कुटुंबात जन्मलेल्या सदाशिवच्या वडिलांचा किरकोळ व्यवसाय होता. पोटापुरते खात जगणार्‍या या कुटुंबात हा एवढा महान कलाकार जन्माला येईल असे कुणाला वाटले देखील नव्हते. बालपणापासूनच सदाशिवला नाटकांची आवड होती व आपण या क्षेत्रात काही तरी करावे असे त्याच्या मनाने ठाम घेतले होते. अर्थातच घरच्यांचा याला ठाम विरोध होता. मात्र आपण फक्त नाटकातच काम करु शकतो हे निश्चितपणे ठरवून त्यांनी अहमदनगरला रामराम ठोकला आणि आपले नशिब आजमाविण्यासाठी मायानगरी मुंबई गाठली. परंतु मुंबईत आल्यावर त्यांना समजून चुकले की, नाटकात एखादा छोटा रोल मिळविणे देखील कठीण आहे. ८०च्या दशकात तर आपल्याकडे नाट्यसृष्टीत कलाकारांना विशेष मानधनही मिळत नसे. त्यामुळे एकीकडे अभिनय करण्याची हौस तर दुसरीकडे कामे मिळत नव्हती आणि पोटापाण्याचही सोय नव्हती अशा कात्रीत अमरापुरकर अडकले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागले आणि नाटकांमध्ये लहान भूमिका मिळू लागल्या. त्यांची ही धडपड सुरु असताना गोविंद निहलानी यांनी त्यांच्यांतला कलाकार नेमका हेरला आणि त्यांच्या अर्धसत्य या चित्रपटासाठी भूमिका दिली. त्या चित्रपटात त्यांची भूमिका नकारात्मक व्हिलच्या थाटातली होती. परंतु या चित्रपटातील ही भूमिका त्यांनी चपखल केली होती. त्यांची दाक्षिणात्य भाषेतील टोनमधील संवाद फेकी, उंची नसलेला व प्रत्यक्ष कधीच गुंडागर्दी न करता पडद्यामागून व्हिलनगिरी करणारा अशी त्यांची भूमिका लोकांना जबरदस्त आवडली. त्यांच्या या भूमिकेने लोकांच्या हृदयाचा ठावच घेतला. अर्धसत्य हा चित्रपट मुंबईतील एका नामवंत गँगस्टरवर बेतलेला होता आणि त्याची ही भूमिका अमरापूरकरांनी हुबेहुब बेतली होती. एका रात्रीत एखादा कलाकार स्टार कसा होतो हे आपण या भूमिकेतून अनुभवले होते असे अमरापूरकर आपल्या यशाबद्दल सांगताना नेहमी सांगायचे. अर्धसत्यने अमरापुरांना एका रात्रीत स्टार केले. केवळ हिंदीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांचे दरवाजे यातून त्यांना खुले झाले. त्याकाळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आत्ताप्रमाणे कलाकारांची कदर करणारी व त्यांना चांगले मानधन देणारी म्हणून ओळखली जायची. अमरापुरकरांची देहयस्टी, त्यांचा रंग हे दाक्षिणात्य चित्रपटांसाठी एकदम फिट्ट झाले. त्यांना दक्षिणेतून मोठी मागणी येऊ लागली. एक स्टार म्हणून स्थिरावण्यास त्यातून त्यांना मदत झाली. कारण आर्थिक स्थैर्य त्यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनेच दिले. ३०० हून जास्त तामीळ चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्या. ८० व ९० च्या दशकात अमरापुरकरांनी आपला वरचश्मा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बसविला. त्याच्या सोबतीला काही निवडक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. याची अनेकांना कल्पनाही नसेल. ९० च्या दशकात त्यांचा आठवडाभर वावर चेन्नईत असायचा तर आठवड्याच्या अखेरीस मुंबईत असायचा. चित्रपटसृष्टीतील एक बिझी कलाकार म्हणून त्यांनी दोन दशके काम केले. शून्यातून त्यांनी हे शिखर पाहिलेले असल्याने त्यांनी मात्र आपले जुने गरिबीतले दिवस कधीच विसरले नाहीत. एकीकडे चित्रपटात नकारात्मक भूमिका सफाईदारपणे करीत असताना सार्वजनिक आयुष्यात मात्र चांगल्या नटाची भूमिका बजावित आले. आपला समाजवादी विचार कधीही सोडला नाही. दाक्षिणात्य चित्रपटात आपण केवळ पैसे कमविण्यासाठी कामे केली अशी प्रांजळ कबुली ते देत असत. जे वास्तव आहे ते स्वीकारुन ते जाहीरपणे कबुल करण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. कलाकार सहसा मोठा झाला की त्याच्यात गर्व घर करतो असे अनेक कलाकारांच्या बाबतीत म्हणता येईल. मात्र सदाशिव अमरापुरकर हे त्याला अपवाद होते. अशा या गुणी कलाकाराला आमचे अखेरचे अभिवादन.
-----------------------------------------------------------
       

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel