-->
अंडरवर्ल्डमध्ये हलचल

अंडरवर्ल्डमध्ये हलचल

रविवार दि. ०१ नोव्हेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
अंडरवर्ल्डमध्ये हलचल
-------------------------------------------
एन्ट्रो- दाऊदसारख्या आन्तराष्ट्रीय गुन्हेगाराशी पंगा घेऊन त्याच्याशी लढत देणे ही बाब काही सोपी नव्हती. असेही बोलले जाते की, अनेकदा दाऊदचा काटा काढण्यासाठी रॉ ने राजनला संरक्षण दिले व त्याच्या मार्फत दाऊदच्या अनेक मोहर्‍यांना ढगात पाठविले. दाऊदच्या बातम्या काढून घेण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थांना राजनची मोठी मदत झाली, असेही बोलले जाते. मात्र या सर्व गडबडीत राजनची ताकद क्षीण होत गेली. त्याच्या अनेक साथीदारांना गमवावे लागले तर अनेकांनी त्याची साथ सोडून आपली स्वतंत्र दुकाने थाटली. परंतु आता पंच्चावन्न पार करुन साठीच्या उंबरठ्यावर आलेल्या या डॉनला पुन्हा मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर उर्वरीत आयुष्य जर सुखाने जगायचे असेल तर पोलीस संरक्षण आवश्यक आहे अन्यथा दाऊद आपल्याला ठार मारणार याची भीती तर होतीच. त्यावर उपाय म्हणून भारतात पोलिस संरक्षणात परतणे हाच एक उत्तम मार्ग होता...
----------------------------------------------------------
अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याला नुकतीच इंडोनेशिया तेथील बाली येथे अटक झाल्याने अंडरवर्ल्डमध्ये एकच हलचल माजली आहे. इंटरपोलवरुन आलेल्या माहितीच्या आधारे ही अटक झाली असे बाली पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच तेथील सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर या डॉनला भारताच्या हवाली करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सध्या तरी चित्र आहे. निदान भारतात परतण्याची इच्छा तरी त्याने व्यक्त केली आहे. हे जर प्रत्यक्षात उतरले तर तब्बल २५ वर्षानंतर छोटा राजन मायदेशी परतेल. छोटा राजन याला अटक नव्हे तर तो भारतात परतण्यासाठी पोलिसांना शरण गेला असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. एकेकाळी दाऊद इब्राहिमच्या टोळीतून वावरत मोठा झालेला छोटा राजन हा त्याचा १९९३ सालच्या मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर दाऊदचा कट्टर विरोधक बनला. मूळचा सातार्‍याचा असलेला राजेंद्र निकाळजे मुंबईत वाढला. वडिल गिरणी कामगार असल्याने घरची परिस्थिती जेमतेमच होती. सुरुवातीपासूनच त्याची प्रवृत्ती गुंडाची असल्याने त्याकाळी झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग असलेल्या सिनेमाच्या  तिकिटांचा काळाबाजार त्याने केला. त्याकाळात जे डॉन म्हणून वावरत होते त्यांची सुरुवात ही तिकीटांच्या काळ्या बाजारापासून सुरु झाली आहे. अगदी हाजी मस्तान ते दाऊद आणि छोटा राजन ही त्याची काही उदाहरणे. चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात सिनेमांच्या तिकीटांच्या काळाबाजारावर चांगले बस्तान बसविल्यावर त्याचे महत्व दाऊदने ओळखले आणि त्याला आपल्या टोळीत सामिल होण्याचे आमंत्रण दिले. त्याकाळी दाऊदने दोन नंबरच्या व्यवसायात आपले पाय चांगलेच रोवले होते व त्याला राजनसारख्या डॅशिंग तरुणांची फौेज हवी होती. राजनला देखील झटपट पैसा कमविण्यासाठी आपल्या कामाचा विस्तार करावयाचा होता. यातून दाऊद व छोटा राजनची मैत्री चांगलीच जमली. कोणत्याही अन्य गुन्हेगाराप्रमाणे छोटा राजनही विविध उत्सवांवर प्रामुख्याने हिंदू उत्सावासाठी भरपूर मदत करीत असे. टिळकनगरमध्ये छोटा राजनच्या गँंगच्या वतीने भरविला जाणारा गणपती उत्सव हे मुंबईचे अजूनही आकर्षण ठरले आहे. १९९३ साली दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट केले आणि दाऊदचे व राजनचे या मुद्यावरुन बिनसले. अशा प्रकारचे देशविघातक कृत्य करण्यास राजनने विरोध केला होता. परंतु दाऊदने त्याचे काही जुमानले नाही व शेवटी त्या दोघांमध्ये उभी फूट पडलीच. राजनने या मुद्यावरुन दाऊदशी पंगा घेतल्याने त्याला हिंदू डॉन म्हणून संबोधिले गेले. अर्थात दाऊद असो किंवा राजन या दोघांपैकी कुणाच्यएाही गुन्हेगारी प्रवृत्तीला धर्म नसतो किंवा तो कोणत्या धर्माचा आहे त्याला महत्व नसते. त्याच्या गुन्हेगारीचे मोजमाप हे समान पारड्यात मोजले जाते. त्यामुळे त्याचा हिंदू डॉन म्हणून सन्मान करणे मूर्खपणाचे आहे. त्याने केलेले आजवरचे गुन्हे माफ होऊ शकत नाहीत. असो. दाऊदशी पंगा घेतल्यावर तो आपला खातमा करणार हे नक्की असल्याने छोटा राजनने आपल्या टोळीची सर्व सुत्रे विदेशातून हलविण्यास सुरुवात केली. किंवा त्याला तसे करण्यावाचून काही पर्यायही नव्हता. १९९८ साली त्याला थायलंडमध्ये अटक झाली होती. परंतु त्यातूनही त्याने पोबारा केला. दाऊदने त्याच्यावर २००० साली हल्ला केला मात्र त्यातूनही तो बचावला. ज्या रुग्णालयात तो दाखल होता तेथून उडी मारुन त्याने पळ काढला. विविध प्रकारच्या ६८ गंभीर गुन्ह्यात सरकारला पाहिजे असलेला राजन आपला जीव वाचविण्यासाठी अनेक देशात पलायन करीत होता. परंतु त्याचा बहुतांशी मुक्काम हा थायलंड किंवा मलेशियातच होता. या काळात त्याने दाऊदच्या अनेक साथीदारांना कंठस्थान घालून दाऊदला धक्का देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. दाऊदसारख्या आन्तराष्ट्रीय गुन्हेगाराशी पंगा घेऊन त्याच्याशी लढत देणे ही बाब काही सोपी नव्हती. असेही बोलले जाते की, अनेकदा दाऊदचा काटा काढण्यासाठी रॉ ने राजनला संरक्षण दिले व त्याच्या मार्फत दाऊदच्या अनेक मोहर्‍यांना ढगात पाठविले. दाऊदच्या बातम्या काढून घेण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थांना राजनची मोठी मदत झाली, असेही बोलले जाते. मात्र या सर्व गडबडीत राजनची ताकद क्षीण होत गेली. त्याच्या अनेक साथीदारांना गमवावे लागले तर अनेकांनी त्याची साथ सोडून आपली स्वतंत्र दुकाने थाटली. परंतु आता पंच्चावन्न पार करुन साठीच्या उंबरठ्यावर आलेल्या या डॉनला पुन्हा मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर उर्वरीत आयुष्य जर सुखाने जगायचे असेल तर पोलीस संरक्षण आवश्यक आहे अन्यथा दाऊद आपल्याला ठार मारणार याची भीती तर होतीच. त्यावर उपाय म्हणून भारतात पोलिस संरक्षणात परतणे हाच एक उत्तम मार्ग होता. त्यासाठीच त्याने अटकेचा मार्ग मोकळा करुन घेतला, असे जे बोलले जाते त्यात बर्‍यापैकी तथ्य आहे. त्यासाठी त्याने असा देश निवडला की, तेथून गुन्हेगार भारतात म्हणून जाणे सोपे पडणार आहे. छोटा राजनची गॅँग आता संपत आली आहे. अशा वेळी केवळ पैसा आहे म्हणून सर्व काही चालू शकत नाही. दाऊदपासून जीव वाचविणार तरी आता किती काळ, त्यालाही काही शेवट पाहिजे, असा विचार करुन राजन भारतात परतत आहे. पोलिसांच्या संरक्षणात असल्याने त्याला मारुन बदला घेणे दाऊदला कठीण आहे. पोलिसांना मात्र आता त्याच्याकडून फार काही माहिती मिळेल असे नाही कारण यापूर्वी त्याने बर्‍यापैकी माहिती आपल्या गुप्तचर संस्थांना दिलेली आहे. मात्र यामुळे दाउद गँग अस्वस्थ झाली आहे ह नक्की. त्यांना राजनला ठार मारुन बदला घ्यावयाचा होता ते आता साध्य होईल असे दिसत नाही. छोट्या राजनच्या अटकेमुळे अंडरवर्ल्डमध्ये हलचल माजली असली तरीही यामुळे फारसे काही होईल असे दिसत नाही. दाऊदला मुसक्या बांधण्यासाठी याचा उपयोग होईल असेही दिसत नाही.
--------------------------------------------------------------------  

0 Response to "अंडरवर्ल्डमध्ये हलचल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel