-->
भाजपाच्या पराभवाची कारणे

भाजपाच्या पराभवाची कारणे

संपादकीय पान गुरुवार दि. १२ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भाजपाच्या पराभवाची कारणे
बिहारच्या निवडणुकीत अखेर भाजपाला दणकून मार खावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा बिहारी मते मिळविण्याचा आत्मविश्‍वास फाजिल ठरला. भाजपाच्या पराभवाचे आता पक्षात विचामंथन होऊन त्याचे विश्‍लेषण केले जाईल अशी अपेक्षा आहे. निदान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरी आपल्या या राजकीय पक्षाला कशासाठी मार खावा लागला यावर बंद दरवाज्यात गुफ्तगू करील. परंतु भाजपाचा पराभव का झाला याची कारणे स्पष्ट आहेत. खरे तर हा भाजपाचा केंद्रात सत्तेत आल्यानंतरचा दुसरा पराभव. पहिला पराभव त्यांना दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी चाखावयास लावला होता. आता दुसरा पराभव त्यांना नितिश-लालू या जोडगळीने दाखविला आहे. या पराभवामागे सर्वात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांचे राखीव जागासंबंधीचे विधान. भागवत हे धूर्त आहेत व सरसंघचालक आहेत, त्यामुळे त्यांच्या विधानाचे टायमिंग अगदी भाजपाच्या पराभवाला हातभार लावणारे होते. राखीव जागांसबंधीची संघाची ही भूमीका काही नवीन नाही. परंतु भागवत नेमके यावेळीच का बोलले. त्यामुळे संघाचा यामागे काही तरी निश्‍चितच डाव होता हे नक्की. अर्थातच हे विधान भाजपाचा पराभव होण्यासाठी केलेले असल्याने एक नक्की आहे की, मोदी व शहा यांच्या गच्छंतीची वेळ आता जवळ आलेली आहे. त्यातच भरीस भर म्हणून केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी दलित मुलाची तुलना कुत्र्याशी केल्याने संपूर्ण दलितांची मते गमवावी लागली. असो. पराभवाचे दुसरे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे प्रचार शिगेला पोहोचला असताना डाळ जी बिहारींच्या अन्नातील महत्वाचा घटक आहे, ती तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचली होती. बिहारमधील जनता गरीब असली तरी दुधखुळी नाही. कारण याच मोदींनी सतरा महिन्यांपूर्वी स्वस्ताई आणण्याचे आश्‍वासन दिले होते. स्वस्ताई तर दूर राहो डाळ २०० रुपयांवर नेणारे हे सरकार भविष्यात महागाई कुठवर नेणार, असा सवाल मतदारांपुढे पडला होता. यातून मोदी हे थापाडे आहेत, यांची फक्त भाषणेच एैकावीत अशी मतदारांची ठाम समजूत झाली. त्यामुळे मोदींनी लाखो रुपयांच्या पॅकेजची केलेली घोषणा पोकळ ठरली. यातूनच मोदी यांची लोकप्रियता आता आटू लागली आहे हे सिद्द होते. सार्वत्रिक निवडणुकींच्या वेळी मोदी हे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होते. त्यावेळी त्यांच्या सभांना लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता. आता त्यांच्या सभेनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची टर उडविली जाते. मागच्या निवडणुकीत सोशल मिडियात मोदींचे जे तरुण समर्थक होते तेच आज त्यांची या माध्यमातून टीका करीत आहेत. त्यामुळे सोशल मिडियाने त्यांना गेल्यावर हात दिला खरा मात्र आता हाच मिडिया मोदींचा सर्वात मोठा टिकाकार झाला आहे. नितिशकुमार-लालूप्रसाद यादव-कॉँग्रेस हे त्रिकूट एकत्र आल्याने सेक्युलर मते विभागली नाहीत. दादरी घटना व त्यानंतरची भाजपा-संघ नेत्यांची भाषणे, सरसंघचालकांचे राखीव जागांसंबंधीचे मत यामुळे महादलित, मुस्लिम मते ही भाजपाकडे न जाते एकगठ्ठा नितिश-लालू-कॉँग्रेस यांच्या पारड्यात पडली. त्यामुळे भाजपाची दाणादाण उडाली. अर्थात भाजपाने हिंदू मतांचे धुव्रीकरण करण्याचा जो डाव आखला होता तो पूर्णपणे फेल गेला. आगामी वर्षात केरळ, पश्‍चिम बंगाल, आसाम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. एकतर या राज्यात भाजपाचे संघटनात्मक बळ नाही. अशा वेळी जर मोदींची जादू चालली नाही तर भाजपा व मोदींपुढे कठीण काळ आहे. बिहारमध्ये भाजपात स्थानिक नेत्यांमध्येही मोठी गटबाजी होती. शत्रृघ्न सिन्हा, आर.के सिंग यांच्यासारखे नेते तर भाजपामध्ये आहेत किंवा नाहीत अशी शंका यावी अशी त्यांची विधाने होती. या गटबाजीसमोर मोदी निष्प्रभ ठरले. तसेच नितिश कुमार यांनी गेल्या दहा वर्षात जी कामे केली आहेत तसेच त्यांची असलेली स्वच्छ प्रतिमा त्यांना सत्तेच्या शेजारी नेण्यास मदतकारक ठरली. लालूप्रसाद यादव यांची प्रतिमा काही स्वच्छ नाही. परंतु नितिश कुमार यांना मख्यमंत्री म्हणून जाहीर केल्याने त्याचा फायदा महागठबंधनला झाला. कॉँग्रेसला याचा फायदा झाला. कारण गेल्या वेळी जेमतेम चार जागा मिळविणारी कॉँग्रेस यावेळी २७ जागांवर पोहोचल्याने त्यांना नवसंजीवनी येथे मिळाली आहे. कॉँग्रेसला आता भविष्यात अशाच प्रकारे सर्व सेक्युलर पक्षांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. बिहारमधील पराभवातून भाजपा काही धडा घेईल असे दिसत नाही. कारण पराभवानंतर शत्रृघ्न सिन्हा यांच्यावर आता जी टीका झाली आहे ते पाहता बिहार भाजपात मतभेद आता उफाळून येतील असे दिसते.
-------------------------------------------------------------      

0 Response to "भाजपाच्या पराभवाची कारणे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel