-->
कोकणात विकासगंगा

कोकणात विकासगंगा

संपादकीय पान बुधवार दि. ११ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकणात विकासगंगा
दिवाळीच्या आदल्या दिवशी रेल्वेमंत्री व कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी कोलाड येथे एका कार्यक्रमात कोकण रेल्वेच्या दुपरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाला प्रारंभ केला. येत्या पाच वर्षात हे काम पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोकण रेल्वेच्या स्थापनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली आहेत.     दर्‍याखोर्‍यातून जाणारी ही रेल्वे उभारणे म्हणजे स्वप्नवतच एकेकाळी वाटत होते. याची दखल जगातील अनेक आघाडीच्या अभियंत्यांनीही घेेतली होती. परंतु ही रेल्वे प्रत्याक्षात धावू लागल्याला आता २५ वर्षे झाली असताना आता ही रेल्वे कात टाकीत आहे, ही आनंदाची बाब म्हटली पाहिजेे. सर्वात महत्वाचे म्हणजे एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे दुपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपरीकरण-विद्युतीकरण तसेच मुंबई-गोवा सागरी महामार्ग पूर्ण करण्याचा केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला निर्धार व मुंबई-गोवा येथून जाणारी बंद पडलेली प्रवासी सागरी वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी सुरु झालेले प्रयत्न पाहता संपूर्ण कोकणपट्टी ही झपाट्याने येत्या काही वर्षात विकासाच्या केंद्रभागी येणार आहे, हे नक्की. कोकण रेल्वे आता दुपदरी होणार असल्याने त्यावरील मालवाहतूक व प्रवासी वाहतूक वाढणार आहे. सध्या रेल्वेला ७५ टक्के उत्पन्न हे प्रवासी वाहतुकीतून मिळते. रो-रो सेवेमुळे तर दक्षिणेत जाणार्‍या मालवाहतुकीची मोठी सोय झाली आहे, यामुळे इंधनाची बचत तर होतेच आहे शिवाय वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो. त्याचबरोबर दक्षिणेकडे जाणार्‍या प्रवाशांच्या वेळेत १२ तासाहून जास्त वेळ कोकण रेल्वेमुळे वाचला आहे. सध्या एकेरी मार्ग असूनही या मार्गावरुन तब्बल ५५ गाड्या जातात. जर दुपदरी मार्ग झाल्यास सध्यापेक्षा दुपटीहून जास्त गाड्या कोकण रेल्वेवरुन धावू शकतील. तसेच विद्युतीकरणामुळे इंधनाच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे विशेष आभार मानावयास हवेत. कारण त्यांच्याच प्रयत्नातून कोकण रेल्वेचे दुपरीकरण व विद्युतीकरण सुरु झाले आहे. कोकण रेल्वे ही कोकणी माणसांसाठी नसून बाहेरच्या लोकांसाठी आहे. कारण या मार्गावरुन धावणार्‍या गाड्या कोकणात न थांबता थेट बाहेर अन्य राज्यात जातात ही चाकरमान्यांची तक्रार काही खोटी नाही. परंतु दुपरीकरण झाल्यावर ही तक्रार दूर होऊ शकेल. त्याचबरोबर चिपळूण-कराड, चिपळूण-दिघी, कोल्हापूर वैभववाडी हे रेल्वेने जोडणार असल्यामुळे कोकणातील बंदरेच नव्हे तर ती  घाटमाथ्याशीही जोडली जाणार आहेत. असे झाल्यावर नवीन उद्योगांना चांगली चालना मिळू शकते. त्याचबरोबर पर्यटन केंद्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील मांडवा जेटी येथे १६० कोटी रुपये खर्च करुन ब्रेक वॉटर प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामुळे येथील प्रवासी वाहतूक बारमाही होईल त्यामुळे पर्यटनाला चांगलीच चालना मिळेल. तसेच रो-रो सेवा भाऊचा धक्का ते रेवस सुरु झाल्याने प्रवासी व मालवाहतुकीसाठी एक नवे दालन सुरु होणार आहे. तसेच यालाच जोडून सध्या अर्धवट असलेला सागरी महामार्ग पूर्ण करण्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्याच्या जोडीला मुंबई-गोवा महामार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या कामाला आता वेग येणार आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा अंतिम टप्पा रायगड जिल्ह्यातून जाऊन त्याच शेवट जे.एन.पी.टी. बंदरात होणार आहे. अशा प्रकारे या नव्या औद्योगिक टप्प्यातील सर्व मालाची आयात व निर्यात ही जे.एन.पी.टी.तून होईल. त्यामुळे कोकण पुन्हा एकदा केवळ पर्यटनाच्यादृष्टीनेच नव्हे तर औद्योगिकदृष्ट्याही जगाच्या नकाशावर येईल. या सर्व घडामोडी सुरळीत होऊन हे सर्व प्रकल्प येत्या पाच वर्षात मार्गी लागल्यास कोकणात विकासाचे एक नवे केंद्र निर्माण होऊ शकते. मुंबईच्या जवळ असल्याने तसेच किनारपट्टी असल्याने रायगड जिल्हा हा यात अग्रक्रमाने असेल यात काहीच शंका नाही. अलिबाग हे मुंबईच्या जवळ असूनही तेथे अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. मात्र अलिबागला लवकरच रेल्वे पाहाण्याचे भाग्य अलिबागकरांच्या नशिबात आहे असेच दिसते. कारण कित्येक काळ असलेले हे स्वप्न आता पूर्ण होईल असे दिसू लागले आहे. आर.सी.एफ.च्या असलेल्या पेण ते अलिबाग या खासगी मार्गावरुन प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता मिळणार आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास अलिबागच्या पर्यटनाला तसेच औद्योगिकीकरणाला एक नवा आयाम मिळू शकेल. एकूणच पाहता कोकणचा चेहरामोहरा बदलण्यास आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. कोकण रेल्वेचे दुपरीकरण व विद्युतीकरण हे त्यातील पहिले पाऊल ठरावे.
--------------------------------------------------------------    

0 Response to "कोकणात विकासगंगा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel