-->
आंध्रचे नवे स्वप्न

आंध्रचे नवे स्वप्न

संपादकीय पान सोमवार दि. २६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आंध्रचे नवे स्वप्न
स्वातंत्र्यानंतर आपण फार मोजकी शहरे नव्याने वसविली. लोकसंख्या वाढत गेल्याने मध्यम, लहान आकारांच्या शहरांचे मोठ्या शङरात रुपांतर झाले. त्यामुळे अगदी मुंबई, पुण्यापासून बहुतांशी महानगरे नियोजनबध्द नाहीत. इंदिरा गांधींनी पंजाब व चंदीगडची राजधानी वसविली ती चंदीगढमध्ये. त्यासाठी नव्याने शहर वसविण्यात आले. त्यासाठी रशियन वास्तू शास्त्रज्ञांनी या शहराच्या उभारणीस मोठा हातभार लावला होता. अर्थात आता त्या घटनेलाही ५० वर्षे उलटली. त्यानंतर आपण नियोजनबध्द शहरे आपण वसविली नाहीतच. विदेशात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नियोजनबध्द शहरे विकसीत केली जातात. सिंगापूर शहरापुरता असलेला अख्खा देश हा नियोजनबध्द आहे. हॉँगकॉँग, बँकांक ही त्याच पध्दतीने नियोजनबध्द आहेत. युरोपातील शहरे एतिहासिक आहेतच शिवाय त्यांनी तेथे आधुनिकता आणण्यासाटी नियोजनबध्दपणा आणला आहे. त्यामुळे ती शहरे देखणी वाटतात. आता नरेंद्र मोदींनी स्मार्ट शहरांचे स्वप्न दाखविले आहे. ते प्रत्यक्षात किती उतरेल हे आता काही सांगता येत नाही. कारण त्यादृष्टीने अजूनतरी नियोजन काहीच दिसत नाही. कारण अशा प्रकारच्या नियोजनबध्द शहरांच्या उभारणीसाठी किमान २० ते ३० वर्षांचा कालावधी लागतो. आंध्रप्रदेशाच्या विभाजनानंतर त्या राज्याला एक नव्याने राजधानी उभारणी गरजेचे होते. त्यादृष्टीने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या वर्षात आखणी केली व अमरावती (महाराष्ट्रातील नव्हे) हे राज्याचे राजधानी शहर म्हणून वसविण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरपेक्षा काकणभर सरस असे हे शहर उभारले जाणार आहे. आंध्र प्रदेशची संभाव्य राजधानी असलेले अमरावती हे एक गाव तब्बल १८०० वर्षांनी आंध्र राज्याची राजधानी होते. कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आणि अतिशय संपन्न अशा विजयवाडा आणि गुंटूर शहरांदरम्यानचा हा भाग काही अवशेषांच्या रूपाने साडेचारशे वर्षांचा सातवाहन राजवटीचा इतिहास सांभाळतो आहे. ही राजवट आजच्या आंध्र, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या पैठण, नाशिक, जुन्नरपर्यंतच्या भागात राज्य करत होती. सातवाहन राजवट हा महाराष्ट्र आणि या भागातला सुवर्णकाळ. पण पुढे पारतंत्र्यात या भागाची पीछेहाट झाली. आज काळाने पुन्हा कूस बदलली असून गेल्या दोन जून २०१४ रोजी स्थापन झालेल्या तेलंगणामुळे आंध्र राज्याच्या राजधानीचा मान अमरावतीला मिळतो आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी आंध्रप्रदेशला आय.टी. हब बनविण्यात फार मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्या या स्वप्नांना तेथील जनता मोठ्या उत्साहाने पाठिंबा देत आहे. त्यामुळेच ३० हजार एकर जमीन मिळवण्यात नायडू यशस्वी झाले आहेत. वर्षात तीन पिके देणारी पिकाऊ जमीन शेतकर्‍यांनी नायडू यांच्या हवाली केली. जमिनी एखाद्या प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांनी नवीन संकल्पना मांडली आहे. नायडू यांच्या लँड पुलिंगची कल्पनेनुसार, त्या जागेचा विकास झाल्यानंतर त्यातील ३० टक्के जागा मूळ मालकाला परत मिळणार आहे. शिवाय तोपर्यंत जमीन मालकास नियमित पगार, तर कौशल्य विकास करून घेण्याची संधी मिळणार आहे. मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रात हा प्रयोग झाला आहे. हे नवीन शहर वसविताना सिंगापूर आणि जपानची मदत घेतली जात असून यानिमित्ताने स्मार्ट शहराचे एक मॉडेलच म्हणजे सिंगापूरसारखे शहर उभे राहील, असे म्हटले जाते आहे. त्या शेतजमिनीवर ५० मजली खासगी आणि १५ मजली सरकारी इमारती उभ्या राहणार आहेत. चार राष्ट्रीय महामार्ग, एक राष्ट्रीय जलमार्ग, ग्रँट ट्रंक रेल्वेमार्ग, वेगाने वाढणारे विमानतळ, महत्त्वाचे बंदर असे त्याचे स्वरुप आहे. चंद्राबाबू नायडू यांनी नेहमीच नाविण्याचा शोध लावून आपले राज्य कसे संपन्न होईल ते पाहिले आहे. हैद्राबाद हे शहर आता त्यांच्यासाठी केवळ दहा वर्षेच राजधानी म्हणून ठेवता येणार आहे. त्यामुळे आता त्यांना आपल्या नवीन मंत्रालयाचा संसार लवकर उभारावा लागेल. तत्यादृष्टीने त्यांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. हे शहर देशातील नव्हे तर जगातील एक अत्याधिुनक शहर ओळखले जाते असे त्यांचे स्वप्न आहे. अर्थात याते ते यशस्वी होतील याती काही शंका नाही. कारण यापूर्वी त्यांनी आंध्रप्रदेशात करुन दाखविल्या आहेत. हे शहर म्हणजे आंध्रला पडलेले एक स्वप्न आहे. अर्थात ते सत्यात उतरविण्याचे काम चंद्राबाबू नायडू करतील. त्यानिमित्ताने आपल्या देशातील एक नवीन शहर जगाच्या नकाशावर येईल.
-----------------------------------------------------------------

0 Response to "आंध्रचे नवे स्वप्न"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel