-->
ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यासाठी...

ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यासाठी...

संपादकीय पान मंगळवार दि. २७ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यासाठी...
देशात आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास प्रारंभ झाल्यापासून आता तब्बल दीड दशक ओलांडले आहे. त्यापूर्वी आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारुन जगात एक नवा पायंडा पाडला होता. हळूहळू आता आपण मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. असे करताना आपला भर हा प्रामुख्याने औद्योगिकीकरणावर राहिला. यात काही चूक होती असे नव्हे. कारण त्यामुळे आपल्याकडे लाखो हातांना रोजगार मिळाला. मात्र असे करताना आपण ग्रामीण भागाकडे पूर्ण दुर्लक्षच केले. अगदी शरद पवारांसारखे दूरदृष्टी असलेले कृषीमंत्री आपल्याला प्रदीर्घ काळ लाभले. परंतु ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यास काही मदत झाली नाही. आता एकूणच जगात मंदीचे चित्र असताना आपण आपल्या ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देऊन तेथून अनेक नवीन रोजगार तयार करु शकतो. यासाठी एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुसरीकडे ग्रामीण भागातील कौशल्याचा पुरेपुर उपयोग करुन घेऊ शकतो. यासाठी चीनने केलेल्या ग्रामीण भागातील क्रांतीचा विचार करुन तशा प्रकारचे मॉडेल आपल्याकडे राबविता येऊ शकते. अर्थातच या मॉडेलचा पाया इंटरनेट हेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची हाक दिली देशातील ग्रामीण भाग ब्रॉडबँव्दारे जोडण्याची योजना जाहीर केली. यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो, असे मोदींचे म्हणणे आहे. मात्र हा कायापालट होणार हे मोदींसह कोणीही सांगत नाही, ही दुदैवाची बाब आहे. मात्र ई कॉमर्सच्या बळावर चीनमधील अनेक गावांत कशी क्रांती करण्यात आली हे आपण पाहिले पाहिजे. चीनमधील या गावांना तबाओ म्हणतात. आज ही गावे ई कॉमर्सची प्रमुख केंद्रे झाली आहेत. त्यासाठी चीनची ई कॉमर्समधील एक मोठी कंपनी अलिबाबाचे सहकार्य घेण्यात आले आहे. गेल्या वर्षात यातून या ग्रामीण भागात सुमारे तीन लाख रोजगार निर्माण करण्यात आले. २०१३ साली प्रायोगिक तत्वावर केवळ २० गावांमध्ये याव्दारे कामाला सुरुवात झाली. यातून आता या गावांची संख्या २११वर पोहोचली आहे. या गावातील सुमरे ७० हजार उत्पादक आपली उत्पादने केवळ चीनच्या कानाकोपर्‍यात नव्हे तर जगात विकत आहेत. यातून ग्रामीण भागाने आपली एक मोठी बाजाररपेठ निर्माण केली व चीनच्या शहरातील लोक ग्रामीण भागातील विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. आपल्यासारखे चीनमध्येही ग्रामीण भागातील तरुण शेती करण्यास फारसे उत्सुक नाहीत. परंतु त्यांच्याकडे ग्रामीण भागासाठी लागणारी काही कौशल्ये आहेत त्याचा उपयोग या ई कॉमर्सच्या माध्यमातून करण्यात येतो. या ई कॉमर्सच्या साईटवर अनेक तरुणांनी आपली ई दुकाने थाटली आहेत. अगदी मर्यादीत उत्पादन व अतिशय स्वस्त माल ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. परंतु त्यांचे हे उत्पादन जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही जाऊ शकत असल्याने त्यांची बाजारपेठ मोठी आहे. यातून त्यांची उलाढाल चांगली होते. अनेकदा त्यांचा माल शहरातील दुकानदारही खरेदी करतात व आपल्या दुकानात जास्त किंमतीला विकतात. अलिबाबा या वेबसाईटने त्यांना गरज भासेल तर आर्थिक सहाय्यही देण्यास सुरुवात केली आहे. यातील एका डोंगफांग या गावाचे उदाहरण पाहाण्यासारखे आहे. या गावात अतिशय स्वस्तातले फर्निचर बनविण्याचा उद्योग आहे. येथील जवळपास प्रत्येक घरात फर्निचर तयार केले जाते. त्यांना आता देशाच्या कानाकोपर्‍यातून फर्निचरची ऑर्डर येते. आता हे गाव फर्निचरचे गाव म्हणून ओळखले जाते. आता त्यांच्याकडे एवढी मोठी मागणी येते की, मालवाहतूक करणर्‍या ४० कंपन्यांनीही या गावात आपली दुकाने थाटली आहेत. आणखी एका गावाचे वैशिष्ट्‌य हे पाव तयार करण्याचे होते. आता त्यांच्या पाव हा अनेक भागात जातो. यातून त्यांचा व्यवसाय कित्येक पटीने वाढला व गावात रोजगाराचे एक नवे साधान यातून तयार झाले. आपल्याकडे ग्रामीण भागाच्या रोजगारासाठी व तेथील कौशल्य विकसीत करावी या हेतूने खादी ग्रामोद्योगची स्थापना करण्यात आली. मात्र यांचे काम कमी व नोकरशाही जास्त अशी स्थिती झाली. त्याउलट मिलांनी स्थापन केलेल्या लिज्जत पापड उद्योगाचे कामकाज उत्तम चालले, यातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध झाला. याचे कारण ही संस्था नोकरशाहीच्या जंजाळात अडकली नाही व व्यवसायिकदृष्ट्‌या चालविली गेली. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला उपलब्ध कौशल्यांचा उपयोग करुन आपण कशी चालना देऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण चीनने आपल्याला घालून दिले आहे. यातून आपम धडा घेऊन काम करु शकतो. आपल्याकडे ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या कौशल्याचा व साधनसामुग्रीचा वापर करुन आपण मोठे रोजगार तयार करु शकतो. यासाठी डिजिटल इंडिया असण्याची गरज नाही. फक्त इच्छाशक्ती हवी, एवढेच.
--------------------------------------------------------------------------

0 Response to "ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यासाठी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel