-->
लोकसंख्यावाढीचे वास्तव

लोकसंख्यावाढीचे वास्तव

संपादकीय पान शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लोकसंख्यावाढीचे वास्तव
गेल्या काही वर्षात आपल्याकडे असे एक चित्र निर्माण केले गेले होते की, मुस्लिम हे आपली देशातील लोकसंख्या वाढविण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न करीत आहेत व त्यामुळे अशी एक स्थिती येईल की हिंदू हे अल्पसंख्यांक असतील व मुस्लिम हे बहुसंख्य होती. मात्र हिंदुत्ववाद्यांच्या या दाव्याला छेद देणारा अहवाल जनगणणेतून प्रसिध्द झालेल्या आकडेवारीत बारे आला आहे. हिंदुत्ववादी सध्या देशात सत्तास्थानी आहेत, मात्र ते मुस्लिमांबाबत अशा प्रकारचे अनेक गैरसमजुती पसरवून आपल्या हंदुत्वाची पाळेमुळे घट्ट करीत आहेत. मध्यंतरी भाजपाच्या एका खासदारानेच वक्तव्य केलेच होते की, हिंदुंनी या देशात दहा मुले पैदा करावीत. असे केल्यानेच आपले भवितव्य उज्वल आहे. अर्थात भरपूर मुले पैदा केल्याने आपले भवितव्य उज्वल नव्हे तर रसातळाला जाणार आहे, हे वास्तव गेल्या पिढीतील आपल्याकडील हिंदूना समजल्याने त्यांनी एक किंवा दोन मुलांपुरता संसार मर्यादीत ठेवला. परिणामी अनेकांना आपली आर्थिक उन्नती करणे शक्य झाले. मात्र याऊलट आपल्याकडे अल्पसंख्यांकांमध्ये जशी जनजागृती होत जाईल, जसे शिक्षणाचे प्रमाण वाढत जाईल तसे त्यांच्यातही एक किंवा दोन मुलांचा पर्याय स्वीकारला जाईल. गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत अत्यल्प वाढले आहे. यातून धीमेगतीने का होईना मुस्लिमांमध्ये आपला संसार मर्यादीत ठेवण्याबाबत आता जनजागृती होऊ लागली आहे असेच दिसते. त्यामुळे पुढील काही वर्षांनी हिंदू अल्पसंख्यांकात जातील ही हिंदुत्ववाद्यांची भीती निरर्थक ठरते. तसेच देशात जनगणना सुरू झाल्यापासून गेल्या ११० वर्षांत एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण प्रथमच ८० टक्यांच्या खाली गेले आहे. सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची जी धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाने जारी केली, त्यावरून हे चित्र समोर आले. हम दो, उनके ग्यारह असे सांगत हिंदुत्ववादी संघटना देशातील मुस्लिमांची लोकसंख्या पद्धतशीरपणे वाढविण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा प्रचार करीत असल्या तरी वस्तुस्थितीतशी सुसंगत असे नाही, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. आकडेवारीवरून असे दिसते की, सर्वच धर्मांच्या समाजांमध्ये लोकसंख्या वाढीचे दशवार्षिक प्रमाण घटत असले तरी हिंदुंच्या तुलनेत मुस्लिमांमधील ही घट अधिक वेगाने होत आहे. गेल्या तीन दशकांमध्येही अशीच स्थिती होती. तसेच मुस्लिमांमधील जननप्रमाणही हिंदूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात कमी होत असल्याचे ही आकडेवारी सांगते. २००१ ते २०११ या दशकात इतर सर्व धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण अत्यल्प घटले असले तरी फक्त मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण वाढले आहे. जनगणनेच्या या ताज्या आकडेवारीनुसार, गणनेच्या १० वर्षांच्या काळात, हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्यांनी, शिखांचे ०.२ टक्यांनी व बौद्धांचे ०.१ टक्याने घटले आहे. याउलट मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.८ टक्याने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन धर्मियांच्या या प्रमाणात फारसा फरक पडलेला नाही. २०११ मध्ये देशाची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी होती. त्यात हिंदूचे प्रमाण ७९.८ टक्के होते. गेल्या १० वर्षांत हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्याने कमी झाल्याने देशात हिंदूंची टक्केवारी प्रथमच ८० टक्यांच्या खाली गेली आहे. याआधीही सरकार जनगणनेतील अशी धर्मनिहाय आकडेवारी जाहीर करीत असे. आता मात्र जनगणनेनंतर चार वर्षांनी व बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आकडेवारी जाहीर करण्याच्या मोदी सरकारच्या हेतूबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. बिहारमध्ये एकूण २४३ पैकी किमान ५० मतदारसंघांत निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकेल एवढी मुस्लिम लोकसंख्या आहे. २००१ च्या जनगणनेतील आकडेवोरीवरून मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेने अधिक दराने वाढत असल्याचे चित्र समोर आल्याने मोठा वाद झाला होता. वस्तुत: तशी स्थिती नव्हती. कारण ज्या १९९१च्या जनगणनेशी तुलना केली गेली त्यावेळी फुटीरवादी कारवायांच्या अशांत वातावरणामुळे मुस्लिम बहुल जम्मू-काश्मीरमध्ये शिरगणती केली नव्हती. मुला व मुलींच्या प्रमाणात फक्त शीख समाज हा मागे आहे. ख्रिश्‍चन समाजात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. तसेच ५० टक्के ख्रिश्‍चनधर्मीय हे तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश या चार राज्यात केंद्रीत झाले आहेत आणि ही चारही राज्ये दक्षिणेतील आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या ही आपली मोठी बाजारपेठ आहे. यातील ३५ कोटी लोकांची मध्यमवर्गीयांची बाजारपेठ ही अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी आहे आणि याच बाजारपेठेवर विकसीत देशांची नजर आहे. आपल्याला आपली लोकसंख्या कोणत्या धर्मियांची आहे याचा विचार करण्यापेक्षा त्यांची क्रय शक्ती कशी वाढेल याकडे पाहिल्यास आपला जगात दबदबा राहाणार आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "लोकसंख्यावाढीचे वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel