-->
संपादकीय पान-अग्रलेख--२१ऑक्टोबर २०१३साठी--
--------------------------------
दुनिया झुकती है.. झुकानेवावा चाहिये...
-----------------------
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन महिनेही पूर्ण झाले नसताना देशात अंधश्रध्देव्दारे एक मोठा बळी दिला जातोय. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या बलिदानातून समाजाने कोणताही बोध घेतलेला नाही असेच खेदाने म्हणावेे लागत आहे. उत्तरप्रदेशाची राजधानी असलेल्या लखनौपासून १०० कि.मी. अंतरावरील उमराव जिल्ह्यात एका देवळच्या जवळ एक हजार टन सोन्याचा साठा असल्याचे स्वप्न एका साधुला पडले आणि त्याच्या स्वप्नावर विश्‍वास ठेवून पुरातत्व खात्याने सोन्याच्या उत्खननाला सुरुवात देखील केली. अर्थातच हे उत्खनन सुरु करण्यापूर्वी हे स्वप्न खरे ठरावे यासाठी पुजाही घालण्यात आली. एव्हवी पुरातत्व खाते ऐतिहासिक इमारतींवर कोठे जरा ओरखडा जरी काढावयाचा झाला तरी त्याला परवानगी देत नाही. इथे मात्र एका साधुच्या स्वप्नावर विश्‍वास ठेवून चक्क उत्खनन सुरु केले. जवळपास महिनाभर खणण्याचे हे काम सुरु राहिल. त्यानंतर काही फूट खाली सोन्याचा साठा जो पूर्वी दडवून ठेवला आहे त्याच शोध लागेल, असे सांगितले जात आहे. यामुळे या भागात सध्या मोठी रेलचेल सुरु झाली आहे. सर्वात पहिले म्हणजे टी.व्ही. चॅनेल्सनी इथे आपला डेरा टाकून इथून थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था सुरु केली आहे. वृत्तपत्रेही याच्या बातम्या रंगवून लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. या वातावरण निर्मितीमुळे त्या परिसरास जत्रेचे स्वरुप आले आहे. खाण्या-पिण्याचे स्टॉल्स अनेकांनी टाकले आहे. गावागावातून लोकांच्या रांगा या खजिन्याच्या शोधासाठी लागल्या आहेत. इथे मोठी गर्दी झाल्याने अर्थातच यासाठी क़डक बंदोबस्त ठेवणे हे आलेच. सध्याचे इथले वातावरण, त्याला मिळणारी प्रसिध्दी पाहता आपण कोणत्या जगात वावरत आहोत असे वाटेल. विज्ञाननिष्ठ भारतीयांची खचितच या घटनेने शरमेने मान खाली जाईल. परंतु असे आपल्याकडे आता लोक फार कमी राहिलेे असल्याने अंधश्रध्देला खतपाणी घालणार्‍या घटना फार घडत आहेत. देशातील सरकारकडे असलेला अधिकृत सोन्याचा साठा ५५८ टन आहे. आणि त्या साधुच्या सांगण्यानुसार येते एक हजार टन सोने सापडेल. आज जगात फक्त आठच देश आहेत की ज्यांच्याकडे एक हजार टनाहून सोने जास्त आहे. आपल्याकडे सोन्याचा एवढा हव्यास असूनही आपल्या देशाकडे एक हजार टन सोने नाही. परंतु या साधुमहाराजांचे स्वप्न खरे झाले तर आपण त्या आठ देशांच्या पंक्तीत जाऊन बसू. सध्याच्या बाजारमूल्यानुसार या सोन्याची किंमत सुमारे तीन लाख कोटी रुपये भरते. आपल्या सरकारचे आर्थिक अंदाजपत्रक पाहता ही रक्कम तशी काही मोठी नाही. परंतु एका साधुच्या स्वप्नावर विश्‍वास ठेवून केंद्र तसेच राज्य सरकारने व सरकारी यंत्रणेने सोन्याचे उत्खनन करावी ही घटनाच मुळे अंधश्रध्देला खतपाणी घालणारी आहे. त्यामुऴे असे हे अंधश्रध्देलाच खतपाणी घालणारे सरकार अंधश्रध्देच्या विरोधात लढणार कसे? महाराष्ट्रासारख्या पुरोगामी असल्याचा आव आणणार्‍या राज्यात अंधश्रध्दा विरोधी विधेयक १७ वर्षे संमंत झालेे नव्हते. शेवटी हा कायदा येण्यासाठी डॉ. दाभोलकरांचा बळी जावा लागला. महाराष्ट्राची ही तर्‍हा तर उत्तरप्रदेशासारख्या मागास राज्यात तर अंधश्रध्देची पूर्णबजबजपुरीच माजलेली आहे. निदान सोने शोधण्याच्या घटनेने तरी हे सिद्द झाले आहे आणि त्याहून सर्वात दुख:त बाब म्हणजे केंद्र व राज्य सरकारच यात सहभागी झाली आहे. महाराष्ट्रानंतर हा कायदा सर्व राज्यात जाईल व एकूणच अंधश्रध्देच्या नावाखाली लोकांची जी पिळवणूक होते त्याला अटकाव होईल अशी समजूत बाळगणे आता चुकीचे ठरले आहे. अनेक देवळात वा किल्यात पूर्वी युध्दाच्या काळात दडवून ठेवलेला सोन्याचा वा मौल्यवान वस्तूंंचा साठा सापडू शकतो. त्याकाळी आपल्याकडे स्वीस बँकांसारखी पैसे दडवून ठेवण्यासारखी सोय नव्हती. त्याकाळी युध्दात पराभव झाल्यावर देवळात वा किल्याच्या आवारात आपली साधनसंपत्ती सुरक्षित राहावी यासाठी पुरुन ठेवण्याची पध्दत होती. दोन वर्षापूर्वी मीनाक्षीपुरम या तामीळनाडूतील देवळातही असलेले अब्जावधी रुपयांचे सोने मोजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी देखील ठराविक एक दरवाजा उघडला तर सर्व नाश होईल अशी अफवा पसरविण्यात आली होती. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांच्यातील रेख अतिशय फुसट आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. अनेकांना जी श्रध्दा वाटते ती अंधश्रध्दाही असू शकते. तर अनेक अंधश्रद्धा या श्रध्दा म्हणूनही आपल्याकडे असल्याचे दिसते. परंतु सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत या अंधश्रध्देचा बळी करुन नाडत किंवा पिळवणूक नाही तोपर्यंत काही आक्षेप आसण्याचे काही कारण नाही. गेल्या दोन दशकात आपण आर्थिक उदारीकरणानंतर जागतिकीकरणाची वाट धरली. यात खरे तर आपली दृष्टी बदलायला पाहिजे होती. आपण अधिक शास्त्रीय, वैद्यानिक दृष्टीकोन बाळगणारे व्हायला पाहिजे होतो. परंतु झाले उलटेच. नवीन पिढीला सद्याच्या आर्थिक सुधारणांमुळे असुरक्षित वाटावयास लागल्याने झटपट पैसा मिळविण्याचा ध्यास लागला. यातून त्याचे आयुष्य अस्थिर झाले आणि त्यातून तो अंधश्रध्दांकडे वळला असावा. सोने उत्खनानाच्या या घटनेत मात्र सरकारच अंधश्रध्देत सहभागी झाले आहे. आणि साधुचे स्वप्न खरेच होणार असे गृहीत धरुन खणायला निघाले आहे. हे सर्वात धोकायदायक आहे. दुनिया झुकी है, झुकानेवाला चाहिये... हेच खरे.
--------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel