-->
मोदींना गुजरातमधून आव्हान

मोदींना गुजरातमधून आव्हान

संपादकीय पान शनिवार दि. २९ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मोदींना गुजरातमधून आव्हान
गुजरातमध्ये अवघ्या २२ वर्षीय हिर्दीक पटेलने पटेल समाजाचा मागासवर्गीयात समावेश करण्याच्या मागणीसाठी आयोजित केलेला लाखोंचा जनसमुदाय पाहिला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या होम पिचवर दिलेले एक मोठे आव्हानच आहे असे म्हणता येईल. खरे तर पटेल समाज आर्थिकदृष्ट्या सधन, व्यापार-उद्योगात आपला चांगला जम बसलेला समाज म्हणून केवळ गुजरातमध्येच नाही तर जगात प्रसिद्द आहे. त्यामुळे या आंदोलनामागे काहीतरी राजकीय ताकद पणाला लावली गेली आहे हे स्पष्टच आहे. पटेल समाज हा पूर्वी कॉँग्रेसकडे होता. मात्र नंतर त्याने आपली मते भाजपाच्या पारड्यात टाकण्यास मदत केली आणि या समाजाला भाजपानेही गृहीत धरण्यास सुरुवात केली. या आंदोलनाचे नेतृत्व एका तरुणाकडे असावे आणि त्याने यावेळी केलेल्या भाषणात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे गुजरातमध्ये कमळ फुलू न देण्याची केलेली घोषणा भाजपाला व मोदींना अस्वस्थ करणारी निश्‍चितच ठरावी. मात्र मोदी तसे दाखविणार नाहीत. कारण त्यांचा स्वभाव पाहता ते पटेल समाजाच्या मागण्या त्यांच्यापुढे झुकून मान्य करतील असे नाही. बरे सध्याच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल या देखील याच समाजाच्या आहेत. त्यामुळे नेमके यामागे कोणते राजकारण शिजते आहे व त्यामागे कोण आहे की, भाजपामधलाच एक गट आहे याचा अंदाज यायला अजून काही काळ जाईल. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या या समाजाने आरक्षणाचा मुद्दा लावून धरावा यामागे नेमके सामाजिक कारण काय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पटेल समाजाला आरक्षण हे नोकर्‍यांसाठी नको आहे. कारण त्यांच्या समाजात नोकर्‍या करणारे फारच कमी आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या या समाजाला शिक्षणात आरक्षण पाहिजे आहे. आपल्या समाजातील लोकांना गुणवत्तेच्या आधारावर शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने या समाजात आरक्षणाची जाणीव निर्माण झाली आहे. आम्हाला आरक्षण द्या नाहीतर सध्या असलेले सर्वच आरक्षण रद्द करा अशी त्यांनी केलेली घोषणा वरकरणी पाहता आकर्षक असली तरी पटेल समाजाच्या तोंडी उच्चवर्णीयांचीच भाषा आहे, हे विसरता येणार नाही. पटेल समाज हा आर्थिकदृष्टया जसा मजबूत आहे तसेच त्यांच्या घराघरात एखादा कुणीतरी विदेशात असतोच. बरे तेथेही तो काही नोकरी करीत नाही तर व्यवसायच करीत असतो. १९८५ साली ज्यावेळी राखीव जागांच्या विरोधात आंदोलन झाले त्यावेळी या आंदोलनात पटेल मंडळी पुढाकारानेच होती आणि आता त्यांना आरक्षण पाहिजे आहे. आता त्यांची मानसिकता आणखी बिघडली आहे याचे कारण म्हणजे पटेल समाजाला सत्तेत पुरेसा वाटा मोदींच्या काळात मिळालेला नाही. केशुभाई पटेल मुख्यमंत्री असेपर्यंत ही मंडळी आपला माणूस मुख्यमंत्रीपदी आहे म्हणून खूष होती. त्यानंतर मोदींच्या काळात त्यांचे नेतृत्व करणारे हिरेन पंड्या यांचा खून झाला आणि हा समाज पुन्हा एकदा सत्तेच्या बाहेर फेकला गेला. मोदींनी या समाजाची मते फक्त घेतली सत्तेत वाटा देताना हातचे राखले. आनंदीबाई पटेल या आपल्या समाजाच्या असल्या तरीही त्या मोदींचे प्यादे असल्याची ठाम भावना पटेल समाजात आहे. मेहसाना, सौराष्ट्र व राजस्थानला लागून असलेला भाग येथे पटेलांचे वर्चस्व आहे. या भागातील एकूण लोकसंख्येत त्यांचा ३३ टक्याहून जास्त वाटा आहे. अशा या गुजरातचा हा उत्तर भाग येतो. बडोदा व त्यांच्या भोवतीच्या चार जिल्ह्यात पटेलांची संख्या जवळपास नगण्यच आहे. त्यामुळे या भागात पटेलांचे आंदोलन दिसत नाही. मात्र हार्दिक पटेल हा सौराष्ट्रातला आहे. परंतु अचानक पटेलांना हा नेता गवसला कसा, असा प्रश्‍नच आहे. त्याने जमविलेली लाखो माणसे ही नेमको कोणी पाठविली होती या देखील प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. या निमित्ताने मात्र पटेल समाजाने आपला प्रश्‍न सत्ताधार्‍यांपुढे मांडला. अर्थातच त्यांची मागणी काही मान्य करणे शक्य नाही. सर्वांचेच आरक्षण काढून टाकणे शक्य होणार नाही. मात्र या निमित्ताने आपल्या सध्याच्या चौकडीला धडका देण्याचा डाव भाजपा करीत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कॉँग्रेसने पटेलांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. सध्या आपण सत्तेत नाही त्यामुळे पाठिंबा द्यायला काय हरकत आहे, अशी कॉँग्रेसची भूमिका असावी. अर्थातच कॉँग्रेसची मागणी ही दुटप्पी आहे. अर्थात सध्या त्यांच्या पाठिंब्याला काहीच अर्थ नाही, हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा. पटेल समाजाने आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन नरेंद्र मोदींना व भाजपाला आव्हान दिले आहे. मोदींना देशव्यापी विरोध वाढत आहे, त्याचाच हा एक भाग आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "मोदींना गुजरातमधून आव्हान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel