-->
कांदा बुरे दिन दाखविणार

कांदा बुरे दिन दाखविणार

संपादकीय पान बुधवार दि. १९ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कांदा बुरे दिन दाखविणार
अवकाळी पाऊस व सध्या पावसाने दाखविलेला ठेंगा यामुळे कांद्याने पुन्हा एकदा राज्यकर्त्यांचा वांद्या करुन टाकला आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिन दाखविण्याची घोषणा केली होती हे खरे असले तरीही कांदा सर्वांना बुरे दिन दाखविणार हे स्पष्टच आहे. कांद्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची गेले महिनाभर आवक सरासरी ९० ते १०० गाड्याच राहिली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात आणखी २० टक्के वाढ होणार आहे. १५ सप्टेंबरनंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येईपर्यंत कांद्याचे दर ८० रुपये किलोच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या कांदा देशात ६० ते ८० रुपये किलो या दरांपर्यंत चढला आहे. बाजारातील आवक मंदावल्याने रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याने गृहिणींनी रडवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याने पन्नाशी पार केली असून, किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे घरगुती बजेट कोलमडले असून, हॉटेलांमध्येही कांद्याबाबत हात आखडता घेतला जात आहे. सध्या श्रावण असल्यामुळे तुलनेने कांद्याची मागणी कमीच आहे. मात्र एकदा का श्रावण संपला की कांद्याची मागणी पुर्ववत होईल व कांदा पुन्हा नव्याने चढती कमान गाठेल अशी अपेक्षा बाजारातील दलाल मंडळी करीत आहेत. कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी कांदा चढ्या दराने विकला गेला. येवला व अंदरसूल बाजार समित्यांमध्ये तर पाच हजार रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली. आतापर्यंतचा हंगामातील हा सर्वोच्च दर आहे. जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सटाणा, उमराणा, मनमाड या बाजार समित्यांमध्येही कांद्याला प्रति क्विंटल सरासरी ४४०० रुपये भाव मिळाला. यंदा पावसाच्या अनिश्‍चितपणामुळे दिल्याने लाल कांद्याची लागवड अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे दिवाळीत येणारा लाल कांदा यंदा फारसा उपलब्ध होणार नाही. परिणामी दिवाळी व दिवाळीनंतरही कांद्याची दरवाढ टिकून राहणार आहे. सध्या मोठे शेतकरी व व्यापार्‍यांनी साठवलेला कांदा बाजारात येत असून, साठेबाजीचाही परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत आहे. अर्थात ही स्थिती संपूर्ण देशात आहे. कांद्याने दिल्लीकरांना पुरते रडवले असून, देशाच्या राजधानीत कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या कांदा उत्पादक राज्यांमधून चढ्या दराने आवक होत असल्यामुळे हे दर चढल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या या स्थितीचा फायदा अर्थातच साठेबाज नेहमीप्रमाणे उठवित आहेत. मात्र त्यांच्यावर वचक निर्माण करण्यास सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार अच्छे दिन काही दाखवू शकणार नाही हे नक्की. नैसर्गिक आपत्तीमुळे या किंमती चढत आहेत हे वास्तव असले तरीही सट्टेबाज या गोंधळात हात धुवून घेत आहेत त्यांना आळा घालण्याचे काम तरी सरकार करु शकते. ते काही राज्य व केंद्र सरकारकडून होत नाही हे आता दिसून आले आहे. एकीकडे कांदा जसा वांदा करणार आहे तसेच अपुर्‍या पावसामुळे देशावर दुष्काळाचे सावट असल्याने चालू वर्षी धान्यउत्पादनात मोठी घट नोंदविली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १.२३ कोटी टनाने धान्याचे उत्पादन कमी झाले आहे. अर्थात ही मोठी चिंतेची बाब असून सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे. यंदा कृषी उत्पादनात ऊसाच्या पिकावर काही परिणाम झालेला नाही. मात्र अन्य धान्य उत्पादनांवर मोठा परिणाम झाला आहे. यात सर्वाधिक उत्पादन डाळींचे घटले आहे. देशातील डाळींचे उत्पादन २० लाख टनांनी घटल्याने गरीबांचे एक चांगले जीवनसत्व देणारे धान्यच आता महागाईच्या गर्तेत सापडणार आहे. देशातील गव्हाचे उत्पादनही ०.६९ कोटी टनांनी कमी नोंदविले गेले. गेल्या वर्षी देशात पाऊस सरासरी १२ टक्के कमी झाला. यंदा देखील समाधानकारक पाऊस होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा स्थितीत सरकारने धान्यांचे व कृषी पिकांचे उत्पादन कमी झाल्यास त्यावर कशी मात करावयाची याची आपकालीन योजना आखली पाहीजे. अन्यथा सट्टेबाज व साठेबाज बाजारपेठेवर कब्जा मिळवतील व जनतेला महागाईचा भीषण सामना करावा लागेल. कांदा आता कमी पिकल्यामुळे आत्तापासून आयात करण्यासाठी सरकारला पावले उचलावी लागणार आहेत. पाकिस्तानच्या कांद्यातील वरचे कवच हे काळे आहे, त्यामुळे तेथून कांदा आयात करणे काही शहाणपणाचे नाही. इजिप्तहून आणलेल्या कांद्याचाही दर्ज्या काही चांगला नाही. त्यामुळे प्राययोगिक तत्वावर इजिप्तहून आणलेला कांदा परत पाठवून द्यावा लागला आहे. नाफेडने दहा हजार टन कांदा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत मात्र या निविदा भरण्यासाठी कुणी पुढे आलेले नाही. त्यामुळे कांदा आणखीनच वांदा करणार हे नक्की.
---------------------------------------------------------  

0 Response to "कांदा बुरे दिन दाखविणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel