-->
पंजाबमधील इशारा

पंजाबमधील इशारा

संपादकीय पान गुरुवार दि. ३० जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पंजाबमधील इशारा
पाकिस्तान सीमेजवळील पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात सैनिकांच्या वेषात आलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे दीनानगर पोलीस ठाण्यासह एका बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलीस अधिकार्‍यासह आठ जणांचा मृत्यू झाला. सुमारे १२ तासांच्या या थरारक मोहिमेत सुरक्षा दलांनी प्रतिहल्ला चढवून तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले. ही घटना घडली असतानाच माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांची निधन झाले आणि पंजाबवरील या हल्याचे सर्व लक्ष विचलीत झाले. कलाम यांच्या निधनामुळे संपूर्ण देश धक्यातून सावरला जात असताना आपल्याला पंजाबमधील हा हल्ला गंभीरतेने घ्यावा लागणार आहे. स्वातंत्र्य दिन जवळ आलेला असताना झालेल्या या हल्ल्यानंतर विशेषत: पंजाब व जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या हल्ल्याची कार्यपद्धती अलीकडेच जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्‌यांसारखीच असल्यामुळे संशयाची सुई पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा (एलईटी) किंवा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या संघटनांकडे वळली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये जवळजवळ २५ वर्षानंतर दहशतवादाचे पुनरागमन झाले आहे. ८०च्या दशकात पंजाबी फुटीरतावादी अतिरेक्यांनी केवळ पंजाबलाच नव्हे तर देशातील अनेक भागात आपल्या दहशतवादी कृत्याने दहशत निर्माण केली होती. शेवटी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुवर्णमंदीरात दडून बसलेल्या अतिरेक्यांना टिपून मारण्यासाठी सुवर्णमंदीरात लष्कर घुसविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचनंतर या दहशतवाद्यांनी इंदिरा गांधींचे प्राण घेङतले. आता त्या काळातील दहशतवादाची पुन्हा आठवण सोमवारच्या घटनेनंतर जागी झाली आहे. दहशतवादी हे जम्मू व पठाणकोट किंवा जम्मू जिल्ह्यातील चाक हिरा दरम्यानच्या कुंपणरहित सीमेवरून भारतात शिरले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी तीन नागरिक, तसेच पंजाब प्रांतीय सेवेचे अधिकारी असलेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग, दोन गृहरक्षक आणि दोन पोलिसांना ठार मारले. दिनापूर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेले बलजित सिंग यांचे वडीलही १९८४ मध्ये पंजाबी अतिरेक्यांच्या हिंसाचारात मरण पावले होते. मात्र, या चकमकी दरम्यान पोलिस आणि लष्करामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. दरम्यान, पोलिसांनी लष्कराची मदत घेतली नाही. त्यामुळेच हे ऑपरेशन लांबले व तब्बल १२ तास चालले अशी चर्चा आहे. असा प्रकारची आपल्याकडील पोलिस व लष्करातील सन्मवयाचा अभाव ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरावी. घटनास्थळी आलेल्या लष्कराची मदत पोलिसांनी घेतली नाही. दहदशवाद्यांनी ठाण्यात घुसताच पोलिस कर्मचारी रामलाल आणि संतरी यांना गोळी मारली. पोलिसांना काय होतेय, हे कळायच्या आताच मुख्त्यार सिंह यांनाही दहशवाद्यांनी गोळी घातली. नंतर पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या होमगार्ड कक्षात दहशवादी पोहोचले आणि ३ होमगार्डंना त्यांनी मारले. अर्थात पंजाब पोलिसांना गुप्तचर संस्थांकडून एक दिवस अगोदर सावधानतेचा इशारा देण्यात आला होता व दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे बजाविण्यात आले होते. दहशतवादी शाळा, सरकारी कार्यालय सक्ष्य करु शकतात असे या इशार्‍यात म्हटले होते. अर्थात हा हल्ला म्हणजे अतिरेक्यांनी भारतीय सार्वभौमत्वाला दिलेले एक मोठे आव्हान ठरावे. यापूर्वी मुंबईत दहा अतिरेक्यांनी पंचतारांकित हॉटेलात घुसून अशा प्रकारचे आव्हान आठ वर्षांपूर्वी दिले होते. त्यावेळी नऊ अतिरेक्यांना कंठस्नान घालून एका अतिरेक्याला अटक करण्यात यश आले होतो. पकडण्यात आलेल्या कसाबला न्यायकक्षेत उभे करुन त्याला फाशी देण्यात आली होती. आता मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी याकूब मेमनला फाशी देण्याची प्रक्रिया सुरु असताना अतिरेक्यांनी हा हल्ला करणे म्हणजे सरकारला एक मोठे आव्हान देण्याचा प्रकार आहे. सरकारने या इशार्‍याकडे गांभीर्याने पाहून त्याबाबत पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासूनचा हा पहिला मोठा हल्ला आहे. अतिरेक्यांनी अशा प्रकारे हल्ला करुन आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखविली आहे. सरकार याचा मुकाबला कसा करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांपूर्वी कॉँग्रेस सरकार ज्या नरमाईने पाकिस्तानशी वागते आहे त्यावर टीका करीत असत. त्यावेळी ते पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची भाषा करीत. आता नरेंद्र मोदी व भाजपा आता सत्तेत आले आहेत. आणि आता पाकिस्तानला त्यांच्या भाषेतील कडक धडा शिकविण्याची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यात पाकिस्तानने अनेक वेळा आपल्या सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. यात आपले जवानही धारातिर्थी पडले. आपल्या जवानांनीही त्यांच्या सैनिकांना सडेतोड उत्तर दिले. परंतु अशा प्रकारच्या चकमकी या सीमेवर होतच असतात. भाजपा ज्यावेळी विरोधात असताना चोख उत्तर देण्याचे जे आश्‍वासन देत होता त्याचे काय झाले? आता त्याची वेळ आली आहे. सरकार चोख उत्तर देणार म्हणजे नेमके काय करणार की यापूर्वीच्याच सरकारप्रमाणे हे देखील सरकार वागणार, याचे उत्तर या जनतेला आता हवे आहे. अतिरेक्यांना जर जरब बसविली नाही तर ८० साली जे पंजाबात झाले त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, याची आठवण सरकारने ठेवावी. अतिरेक्यांनी सरकारला अशा प्रकारे पंबाजमध्ये हल्ला करुन एक मोठा इशारा दिला आहे. आता सरकार त्याला कसे प्रत्यूत्तर करते त्यावर अतिरेकी कारवायांना जरब बसू शकते, याची दखल सरकारने घ्यावी.
-----------------------------------------------------------------------------    

0 Response to "पंजाबमधील इशारा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel