-->
विज्ञान ऋषी

विज्ञान ऋषी

संपादकीय पान बुधवार दि. २९ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विज्ञान ऋषी
संशोधक, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जी. अब्दु कलाम यांच्या जाण्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती गेल्याची भावना व्यक्त होत आहे. तसे पाहिले तर यातील अनेकांना कलाम प्रत्यक्ष भेटलेही नसतील, टी.व्ही.वर त्यांची दिसणारी एका सोज्वळ माणसाची छबी, त्यांची विज्ञानदृष्टी, पारदर्शी व्यक्तीमत्व, ८०च्या वयातही लहान मुलांमध्ये मिसळण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे ते या देशातील प्रत्येकाला भावले होते. एका नावाड्याचा मुलगा कष्ट करुन, कर्ज काढून शिक्षण घेऊन एक वैज्ञानिक होतो, राष्ट्रपती या सर्वोच्चपदी पोहोचतो हे कलाम यांच्या दृष्टीने जसे अभिमानास्पद होते तसेच देशातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी निश्‍चितच होते. क्षेपणास्त्रात त्यांनी केलेल्या अजस्त्र कामगिरीबद्दल त्यांना जनतेने मिसाईल मॅन ही पदवी बहाल केली. अशा प्रकारे एखाद्या शास्त्रज्ञानाला जनतेने एकादी पदवी बहाल करणे फारच कमी लोकांच्या नशिबी येते. पोखरण येथे केलेल्या अणूचाचण्या यशस्वी व्हव्यात यासाठी त्यांनी सर्व व्यूहरचना आखली होती व त्यात ते यशस्वी झाले होते. अणूचाचण्या त्यांनी केल्या असल्या तरीही त्यांच्यात मनात विद्धंसकवृत्ती नव्हती. अणूचा उपयोग हा नेहमीच शांततेसाठीच झाला पाहिजे व अणूउर्जा जगाला मदतकारक ठरणारी आहे या ठाम मताचे ते होते. बालपणी त्यांना रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागला. जगातील मुलांना असा प्रकारे कधी अडचणी येऊ नयेत यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते. त्यासाठीच त्यांना अणूउर्जेचे महत्व वाटे. इस्त्रोमध्ये कार्यरत असताना आपण स्वत: आपले तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे, यात त्यांनी अनेकदा यशही मिळविले. भारताच्या २०२० चा विकासाचा आराखडा त्यांनी तयार केला खरा परंतु त्याला राजकीय पाठबळ न लाभल्याने हे पुस्तकात राहिले. विज्ञानासारख्या विषयाचे ते अभ्यासक असूनही त्यांना तामीळ कविता आणि वीणा वादन हे त्यांचे छंद होते. शेवटपर्यंत ते छंद त्यांनी जोपासले. राष्ट्रपदी ते पोहोचले तरीही सर्वसामान्यात सहजरित्या मिसळत यातून त्यांच्या मनमिळावू स्वभावाचे दर्शन होत असे. आपल्या देशाला महासत्ता बनविण्याचे सर्वात प्रथम स्वप्न दाखविले. मुळातच कलाम हे पंडित नेहरुंसारखे स्वप्नाळू होते. कलाम यांनी देशाला महासत्तेचे स्वप्न दाखवून देशातील तरुणांचे स्फुलिंग जागृत केले. कलाम हे काही राजकीय व्यक्ती नव्हते. ते एक शास्त्रज्ञ आणि या देशाचे भले व्हावे यासाठी झटणारे तसेच तरुणांना काही तरी नवीन दिले पाहिजे याची उर्मी बाळगणारे होते. कलाम यांचे देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. कारण त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती असलेले राजकीय नेते त्यांच्या जोडीला लाभले नाहीत. असे असले तरीही कलाम हे हार मानणारे नव्हते. आपल्या देशाला पुढे नेण्याचे स्वप्न उराशी बाळगले ते शेवटपर्यंत. आपल्यादृष्टीने त्यासाठी जे त्यांना व्यक्तीश: करणे शक्य होते ते करीत राहिले. देशाला, विशेषत: तरुणांना नव्या दिशेने विचार करायला लावायचे अद्भुत सामर्थ्य त्यांच्याकडे होते. त्यांच्या या सामर्थ्याला अधिष्ठान होते ते विज्ञानावरील श्रद्धेचेे आणि तळमळीने काम करण्याचेेे. कलाम यांची तळमळ लोकांना आकृष्ट करीत होती. त्यांच्याकडील ऊर्जा आश्‍चर्यकारक अशीच होती. देशाला प्रगतिपथावर कसे नेता येईल हाच विचार त्यांना सतत भेडसावित होता. महासत्ता बनणे भारताला सहज शक्य आहे, फक्त विचारांची दिशा बदलली पाहिजे, असे त्यांना वाटत असे. महासत्ता हे त्यांच्यासाठी दिवास्वप्न नव्हते. राष्ट्रपतीपदी गेल्यावर कोणतीही व्यक्ती ही सर्वसामान्य जनतेपासून दुरावते. परंतु कलामांचे मात्र असे झाले नाही. कलामांइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही राष्ट्रपतीच्या वाट्याला आली नसेल. समाजातील सर्व थरातील लोकायर्पंत पोहोचण्याची किमया त्यांच्या स्वभावात होती. असे म्हटले जाते की, शास्त्रज्ञ हे एकलकोंडे असतात, समाजापासून अलिप्त राहाणे पसंत करणारे असतात. आपल्या विषयात मग्न असतात. परंतु कलामांचे नेमके उलटे होते. कलामांसारख्ये व्यक्तीमत्व हे सहजच समाजात मिसळू शकत असे.  मुलांमध्ये ते सहजरित्या रमत. आपण एवढे मोठे शास्त्रज्ञ आहोत, आपण राष्ट्रपती आहोत याचे त्यांनी कधीच समाजात दाखवून दिले नाही. यातच त्यांचे मोठेपणा होता. पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षा ज्ञानाचा अहंकार फार मोठा असतो. या अहंकाराचा वारा त्यांना कधीही लागला नाही. राष्ट्रपती भवनात प्रवेश करताना त्यांनी एका बॅगेसह प्रवेश केला होता. पाच वर्षानंतर ते या पदावरुन मुक्त झाल्यावरही त्यांच्यासोबत हीच एकमेव बॅग होती. त्यांच्यासारख्या माणसाला पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी लाभली असती तर चांगलेच होते. परंतु त्यांची पुन्हा निवड न झाल्याबद्दल त्यांनी काही कटूता बाळगली नाही. आपले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी राष्ट्रपतीपदावरुन पायउतार झाल्यावर सुरु ठेवले. विशेषत: तरुणांना मार्गदर्शन करण्यात त्यांना विशेष रस असे. ज्ञानदानाचे हे काम त्यांना विशेष महत्वाचे वाटे. त्यामुळे नियतीनेही त्यांना हेच काम करीत असताना पैगंबराकडे बोलावून घेतले. कलाम यांच्या जाण्याने आपण एक सर्वधर्मसमभाव मानणारा, विज्ञानवादी ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. आपल्या देशाचे फार मोठे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "विज्ञान ऋषी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel