-->
अधिवेशन गाजणार

अधिवेशन गाजणार

संपादकीय पान सोमवार दि. १३ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अधिवेशन गाजणार
आजपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी कसोटी या अधिवेशनात लागणार आहे. सरकारला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही तर अनेक समस्यांनी व घोटाळ्यांनी घेरले आहे. या सरकारकडून राज्यातील जनतेच्या प्रामुख्याने दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना मोठ्या आशा व अपेक्षा होत्या. मात्र या सर्व अपेक्षांचा भंग या सरकारने केला आहे. केवळ एका वर्षाच्या आतच या सरकारच्या लोकप्रियतेच्या आलेख घसरला आहे. केंद्रातील मोदी सरकारने देखील अशाच मोठ्या आश्‍वासनांची यादी जनतेला सादर केली होती. त्याची पूर्तता होईल असे जनतेने गृहीत धरले होेते. परंतु नरेंद्र मोदींनी जसा अपेक्षाभंग केला त्याच धर्तीवर राज्यात घडत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेएवढा पावसाळा झाला नाही. त्यामुळे यावेळी दुष्काळाची तीव्रता जास्त असणार होती. निवडणुकीच्या धामधुमीनंतर नवे सरकार सत्तेत आले व त्यांनी नव्या जोमाने काम करुन दुष्काळ निवारणासाठी झटून काम करावयास हवे होते. एका झटक्यात हे सरकार दुष्काळ संपवू शकत नाही हे वास्तव असले तरीही त्यादृष्टीने पावले देखील टाकण्यात आली नाहीत. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, विनोद तावडे व बबनराव लोणीकर यांच्यावरील बनावट पदव्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या अमेरिकावारीत विमान उड्डाणास लागलेला विलंब या मुद्यांसह विरोधक या अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरतील व सत्ताधार्‍यांना जेरीस आणतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यावेळचे अधिवेशन गाजणार हे नक्की. नव्या दमाचे व भाजपाचे सर्वात प्रथम सरकार आल्याने सर्व मंत्री उत्साहात कामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा होती. सुरुवातीला राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा त्यानंतर शिवसेनेने सत्तास्पर्श करण्यासाठी भाजपाची केलेली मनधरणी हे सर्व प्रकार पाहिल्यावर हे सरकार काही धड चालणार नाही असेच वाटत होते. परंतु नवीन सरकारला सर्वात प्रथम काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि मगच त्यांच्यावर टीका करणे योग्य ठरेल, त्यानुसार हे सरकार कॉँग्रेसच्या सरकारपेक्षा काही वेगळे करुन दाखवेल अशी अपेक्षा राहिलेली नाही. आज राज्यात शेतकर्‍यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, शेतकरी आपले जीवन कसेबसे जगत आहे. त्यामुळे या शेतकर्‍याला दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. उलट शेतकर्‍यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. मोदी यांचे केंद्र सरकार मात्र आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची आकडेवारी लपवित आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्याएवजी राज्य सरकार सावकारांच्या कर्जावरील व्याजाचा दर वाढविण्याचा विचार करीत आहे. त्यावरुन हे सरकार यापूर्वीच्या सरकारप्रमाणेच शेतकर्‍यांशी निदर्यपणे वागणार हे सुचित होते. घोटाळे करण्यात केवळ कॉंग्रेस नाही तर आम्हीही पटाईत आहोत असे भाजपाने आता दाखवून दिले आहे. पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा बाहेर आला आणि हे सिद्द झाले. पाच लाख  रुपयांवरील कोणतीही वस्तूंची खरेदी करावयाची असेल तर ई टेंडरिंग केलेच पाहिजे असा सरकारी आदेश असताना पंकजाताईंनी नियमबाह्य खरेदी केली. त्याचा चेक हा वैयक्तिक नावाने खात्यात गेला. पंकजाताईंनी या सर्व बाबींचे पत्रकारपरिषदेत ज्या तर्‍हेने समर्थन केले ते पाहाताना त्या भाजपाच्या की कॉँग्रेसच्या भ्रष्टमंत्री आहेत असा प्रश्‍न पडावा. शेवटी कॉँग्रेस व भाजपा यांच्यात काहीच फरक नाही, हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आता पुन्हा सिद्द होऊ लागले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पदव्यांच्या प्रश्‍नाने यावेळी विरोधकांना चांगलेच हत्यार मिळवून दिले आहे. चक्क शिक्षणमंत्री बोगस विद्यापीठाची पदवी धारण केलेले आहेत तर लोणीकर यांचीही पदवी बोगसच आहे. केंद्र सरकारने दिल्लीतील कायदा मंत्री तोमार यांच्या बोगस पदवी प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकले. आता भाजपा आपल्या मंत्र्यांच्या बाबतीत हाच नियम लावणार का, असा सवाल आहे. त्याचबरोबर अमेरिकावारीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकारी उशीरा आल्याने दीड तास विमान उशीरा सुटले. सुरुवातीला हा तांत्रिक दोषामुळे उशीर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यात काही खरे नाही. कारण एअर इंडियाच्या सांगण्यानुसार हे सरकारी अधिकारी उशीरा आल्यानेच विमानस विलंब झाला. यामुले सत्ताधार्‍यांच्या विरोधात तोफ डागण्याची संधी विरोधकांना आयती उपलब्ध झाली आहे. हे सरकार आपण मोठे पारदर्शी आहोत असे दाखविते खरे परंतु त्यांचा व्यवहार मात्र तसा नाही. चिक्की प्रकरणाने हे तर दाखवूनच दिले आहे. त्याचबरोबर विमानाच्या विलंबनामुळे सरकारी अधिकार्‍यांसाठी संपूर्ण विमान व त्याच्यातील प्रवासी वेठीस धरले गेले. जर कुणी एखादा सर्वसामान्य प्रवासी असता तर हे विमान थांबविले गेले असते का, असा सवाल आहे. विरोधी पक्ष यावेळी या सर्व प्रकरणांवर आक्रमक होणार हे आता नक्की आहे. कारण सरकार ज्या प्रकारे काम करीत आहे हे पाहिल्यास त्यांनी विरोधकांच्या हाती कोलित काढून दिले आहे. सरकारच्या कामकाजाच्या पध्दतीमुळे विरोधकांना आपोआप बळ लाभले आहे. सरकारलाही याची कल्पना आली आहे. त्यामुळे सरकारने सर्व अधिकार्‍यांना अधिवेशनाच्या काळात हजर राहाण्याचे लेखी आदेश दिले आहेत. सरकारची पाचावर धारण बसल्याची कल्पना यावरुन येते. एकूणच पाहता यावेळचे अधिवेशन गाजणार हे नक्की.
--------------------------------------------------------------------------  

0 Response to "अधिवेशन गाजणार "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel