-->
व्यापमंचा घोटाळा

व्यापमंचा घोटाळा

संपादकीय पान शुक्रवार दि. १० जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
व्यापमंचा घोटाळा
कोणताही घोटाळा म्हटला की, तो करण्याची मक्तेदारी फक्त कॉँग्रसेचीच आहे व कॉँग्रसने देश खड्यात घालत असे अनेक घोटाळे केले, असे निवडणुकीच्या काळात प्रचार सभेत नरेंद्र मोठी सांगत देशभर फिरत होते. कॉँग्रेसने घोटाळे केले व ते करोडो रुपयांचे केले आणि त्यामुळे जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर फेकले ही वस्तुस्थीती काही नाकारता येणार नाही. परंतु घोटाळे करण्याची मक्तेदारी फक्त कॉँग्रेसचीच नाही तर भाजपा देखील घोटाळे करीत आहे. आय.पी.एल.च्या मोदींना पाठीशी घालून त्यांची वकिली करणार्‍या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा एक मोठा घोटाळा ठरणार आहे. त्याचबरोबर राजस्थान सरकारने सरकारी महालच विकून त्याजागी हॉटेल उभारले. यात परत भागिदारी ही ललित मोदी यांचीच होती. हा घोटाळा पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात उघडकीस येईल. आपल्याकडे महाराष्ट्रात चिक्कीच्या घोटाळ्याचे प्रकरण गाजू लागले आहे. मी चिक्कीत काहीच पैसे खाल्ले नाहीत असे सांगणार्‍या पंकजाताईंवर कोणी विश्‍वास ठेवावा? हा देखील एक मोठा घोटाळाच आहे. आता गेल्या महिन्याभरातील मध्यप्रदेशचा व्यवसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं)च्या घोटाळ्याने आजपर्यंत सुमारे ४० जणांचे जीव घेतले आहेत. शिवराजसिंहांच्या कारकिर्दीत मध्यप्रदेशात घडलला घोटाळा उघड्यावर आणणार्‍या अनेकांचा या प्रकरणात बळी गेला आहे. ज्यांच्याकडून या परीक्षेतील निवडीसाठी मोठाल्या रकमा वसूल केल्या असे अनेक विद्यार्थी या मरणार्‍यांच्या यादीत आहेत. शिवाय हा घोटाळा उघड झाल्याने ज्यांना मिळालेल्या नोकर्‍या अडचणीत आल्या, त्यांचेही मृत्यू यात समाविष्ट आहेत. मरणार्‍यांच्या यादीत वैद्यकीय क्षेत्रातील डीन, प्राचार्य, प्राध्यापक, तपास अधिकारी, पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ प्रशासक अशी वजनदार माणसेही समाविष्ट आहेत. शिवाय या प्रकरणातील आरोपींच्या यादीत मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री उमा भारती, गृहमंत्री बाबूलाल गौर अशीही राजकारणातील दिग्गज मंडळी गुंतली आहेत. राज्यपाल यादव यांना या प्रकरणात अटक करण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली होती. प्रत्यक्षात त्यांच्या पदाचे तांत्रिक महात्म्य लक्षात घेऊन सरकारला ती अटक टाळावी लागली होती. एवढी वर्षे चालू असलेला व सरकार आणि प्रशासन यातली मोठमोठी माणसे ज्यात गुंतली आहेत असा हा प्रचंड घोटाळा शिवराजसिंह चौहान यांनी दीर्घकाळ उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि त्या विषयी एक गूढ मौन पाळले. अर्थात त्यांची याला मूक संमंती असावी असेच दिसते. त्यामुळे यातील प्रमुख गुन्हेगार हे शिवराजसिंग चौहान हेच ठरतील. निदान त्यांनी या प्रकरणाकडे डोळेझाक केली असाही आरोप करता येईल. पूर्वी मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असताना त्यांच्या हाताखालील कोणत्याही मंत्र्याने भ्रष्टाचार केला की भाजपाचे नेते त्यावेळी सिंग यांच्यावर शरसंधान सोडत. आता तोच नियम जर शिवराजसिंग चौहान यांना लागू का करु नये असा प्रश्‍न उपस्थित होतो. सारे काही न्यायालयांच्या कक्षेत येत असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही हे मंत्री सांगत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या प्रकरणात बचावाचा हाच पवित्रा अवलंबिला आहे. मात्र पोलीस तपास, अटकसत्र, न्यायालयीन तपासणी असे सारे होत असतानाही या प्रकरणात दरदिवशी एक वा दोन निरपराध माणसे बळी पडताना दिसत आहेत. या प्रकरणाशी संबंध असलेली सारीच माणसे संपविण्याचा आणि स्वत: नामानिराळे राहण्याचा या प्रकरणातील प्रमुख आरोपींचा प्रयत्न आहे. पत्रकार अक्षय सिंह आणि जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अरुण शर्मा यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे आतापर्यंत मध्य प्रदेशातच असलेला हा विषय राष्ट्रीय झाला आहे. अर्थात हे प्रकरण सर्वात जुने आहे. गेल्या आठ वर्षांत शिक्षक, डॉक्टर, फौजदार अशा एकूण एक लाख ४० हजार अपात्र उमेदवारांची भरती झाली आणि त्यासाठी एक हजार कोटी लाटण्यात आले, अशी एक आकडेवारी समोर आली आहे. या घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचा गेल्या तीन वर्षांत मृत्यू झाला आहे. गैरमार्गाने भरती झालेले शिक्षक वर्गात शिकवत आहेत, डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत आणि त्याच मार्गाने अशा मोक्याच्या जागा अडवून बसलेले अनेक कर्मचारी-अधिकारी सरकारी व्यवस्था सांभाळत आहेत. हे सर्व प्रकरण भयावहच आहे. कॉपी करून परीक्षा पास होणे, लाच देऊन नोकरी मिळवणे, मलिदा मिळणार्‍या जागेवर लाच देऊन बदली करून घेणे, हाच राजमार्ग आहे, असा प्रघात पाडण्याचे कर्म व्यापमं घोटाळ्याने केले आहे. सध्या हे प्रकरण बाहेर येण्यामागे त्याला एक राजकारणाची किनार असल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांचे आणि चौहान यांचे संबंध फार चांगले मानले जात नाहीत, त्यामुळे भाजपमध्ये या प्रकरणाचे राजकारण शिजवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापमंमध्ये जे संशयित आहेत, त्यात केवळ भाजपशी जवळीक असलेलेच नाहीत तर चारित्र्य घडवण्याचा ठेका घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरुवात झालेले सुधीर शर्मासारखे लोकही आहेत. एकेकाळी शिक्षक असलेला हा माणूस पुढे खाणसम्राट म्हणून ओळखला जाऊ लागला. या देशात असे सर्व राजकीय पाठिंब्याशिवाय अजिबात शक्य नाही. यामागचे राजकारण बाजूला ठेवा. या घोटाळ्याची जबाबदारी भाजपा टाळूच शकत नाही. कारण सलग तीन वेळा येथे भाजपाची सत्ता आहे व या काळात शिवराजसिंग चौहानच मुख्यमंत्री राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या प्रकरणाची चौकशी सी.बी.आय.मार्फत केली जाणे आवश्यक आहे.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "व्यापमंचा घोटाळा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel