-->
योगचे जागतिक मार्केटिंग

योगचे जागतिक मार्केटिंग

संपादकीय पान मंगळवार दि. २३ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
योगचे जागतिक मार्केटिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजर आहेत. रविवारी झालेल्या योग दिनाचे त्यांनी केलेेले मार्केटिंग पाहता आता हे पुन्हा एकदा सिध्द झाले. यापूर्वी मोदींनी निवडणुकांचे योग्य मार्केटिंग करुन सत्ता काबीज केली होती. ज्या प्रकारे निवडणुकांच्या काळात त्यांनी प्रसार माध्यमे व सोशल मिडियला हाताशी धरुन आपल्या बाजूने एक प्रकारचा माहोल तयार केला त्या धर्तीवर योगाचे मार्केटिंग केले गेले. रविवारच्या सकाळी व गेले चार दिवस योगावर चर्चा, बातम्या पेरुन संपूर्ण देशाचे मन योगाकडे वळविण्यात आले. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा दिवस भारतात नवे सरकार कसा साजरा करेल याबाबत उत्सुकता होती. मात्र मोदींनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपले मार्केटिंगचे कौशल्य पूर्णपणे पणाला लावले व देशात योगाची एका दिवसासाठी का होईना जनजागृती केली. खरे तर योग हे काही मोदींनी जगात पोहोचविले नाही. गेल्या सव्वाशे वर्षांत रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती, रमण महर्षी, अरविंद, अय्यंगार या योगमहर्षींनी योग जगात नेला. निरामय आयुष्य कसे जगावे याचा मूलमंत्र योगच्या निमित्ताने जगाला दिला. अर्थात या महापुरुषांनी ज्यावेळी योग जगात नेले त्यावेळी सध्यासारखे मार्केटिंगचे कौशल्य प्रगत झाले नव्हते. त्यांना त्याची गरजही वाटली नाही. उलट त्यांनी चांगले जीवनमान जगण्यासाठी घरगुती पातळीवर केला जाणारा उपचार म्हणून योग जनतेला शिकविला. असो. जगात अशा प्रकारे योग पोहोचविणार्‍या या महान व्यक्ती व नरेंद्र मोदी यांच्या जमीन-आसमानचा फरक आहे. आपले शरीर हे एक यंत्र आहे. हे यंत्र जर प्रभावीपणे चालले पाहिजे असे वाटत असेल तर त्याला चलन-वलन सातत्याने दिले पाहिजे. योगच्या प्रकारामुळे आपल्या शरिराला चांगलाच व्यायाम मिळतो व आपण सुदृढ राहू शकतो. योग केल्याने मनस्वास्थ सुधारते, माणूस चांगल्या रितीने काम करु शकतो. परिणामी त्याच्या हातून चांगल्या गोष्टी घडतात. आज आपल्याला जे जाती-धर्मातले हेवेदावे दिसतात त्यावर नियंत्रण जर ठेवायचे असेल तर जे अनेक उपाय आहे त्यात योगाला प्राधान्याचे स्थान द्यावे लागेल. योग हा कोणत्याच धर्माची मक्तेदारी नाही, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने याबाबत बराच उहापोह करण्यात आला. मोदी सरकारने यात पुढाकार घेतला म्हणून कॉँग्रेसने टोकाला जाऊन त्यावर टीकाही केली. हे देखील चुकीचे आहे. काही मुस्लिम संघटनांनी योग हा मुस्लिमविरोधी असल्याचे सांगून या वादात आणखी भर टाकली. अर्थातच असे होण्यामागे काही कारणेही आहेत. सत्तेत आल्यावर मोदी सरकारने विविध धर्मातील तेढ वाढविण्यासाठी पावले उचलली. घर वापसीसारखे अनावश्यक कार्यक्रम हाती घेणार्‍या अतिकेरी हिंदु संघटनांना पाठिशी घातले. त्याचा परिणम असा झाला की, मोदींनी काहीही केले तरी ते हिंदू धर्माच्या प्रचारासाठी व प्रसाराठी करीत असल्याचे चित्र तयार होते. मोदी सरकारने सत्तेवर येताच धर्म, संस्कृती व प्राचीन वारसा यांना साद घातल्याने योग दिनही तसा टीकेचा विषय बनला. आज देशातील ७० टक्के जनतेला एकवेळचे पुरेसे अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी योग काय कामाचा? असा उत्पन्न केलेला सवालही काही चुकीचा नाही. एक बाब स्पष्टच आहे की, रविवारच्या योग दिनात सहभागी झालेली जनता ही प्रामुख्याने मध्यमवर्गीय होती. गेल्या काही वर्षात याच वर्गात जिमला जाण्याचे किंवा योगाच्या क्लासचा जाण्याचे ग्लॅमर निर्माण केले. सध्या आपल्या देशात या मध्यमवर्गीयांची मोठी बाजारपेठ आहे. या वर्गाची लोकसंख्या ३५ कोटींहून जास्त आहे. म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी किंवा संपूर्ण युरोपात असलेल्या जनतेच्या लोकसंख्ये एवढी भरते. आपल्याकडील मध्यमवर्गीयांची ही बाजारपेठ विस्तारच चालली आहे. याच वर्गाने मोदींच्या निवडणूक पूर्व भाषणांवर प्रभावित होऊन त्यांना एकगठ्ठा मते दिली होती. आता देखील मोदींनी याच वर्गाला प्रभावित करण्यासाठी योग दिनाचा योग साधला. सोशल मिडीयावर रविवारच्या या घटनेने एवढा प्रभाव टाकला होता की देशात एखादा उत्सवच साजरा झाला की काय असे वाटावे. अर्थातच योग दिनात सहभागी झालेले किती जण दररोज योग करतात व आपले शरीर सृदृढ ठेवण्याचा प्रयत्न करतात हे भविष्यात पहाणे आवश्यक ठरेल. अर्थात या योग दिनाच्या निमित्ताने योगाभ्यासाला आता राजमान्यता प्राप्त झाली आहे. आजवर योगाला ही राजमान्यता नव्हती. यातून भविष्यात काही चांगले घडेल असे अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिनावर मोहोर उठवताना, योग ही प्राचीन भारतीय परंपरा असली तरी तिची आज जगाच्या एकूणच बदलत चाललेल्या जीवनशैलीला नितांत गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले. य अगोदरही योग जगात पोहोचलाच होता. परंतु त्याचे अशा प्रकारचे प्रभावी मार्केटिंग झाले नव्हते. मोदींनी हे मार्केटिंग केले. आता जनतेने एक दिवसाचाच उत्सव म्हणून योगाकडे न पाहता स्वत:च्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज योगासने करणे गरजेचे आहे.
----------------------------------------------------

0 Response to "योगचे जागतिक मार्केटिंग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel