-->
भाजपातील खदखद

भाजपातील खदखद

संपादकीय पान सोमवार दि. २२ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भाजपातील खदखद
देशात गेल्या तीस वर्षात प्रथमच एकाच पक्षाला म्हणजे भाजपाला संपूर्ण बहुमत मिळूनही त्यांचे सर्व काही आलबेल आहे असे नव्हे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधीरशाहीच्या कारभाराला अनेक मंत्री कंटाळले आहेत परंतु याबाबत उघडपणे बोलण्याची अजून कोणाची हिंमत होत नाही. अर्थात नजिकच्या काळात भाजपामधील ही खदखद उफाळून बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राम जेठमलानी यांनी सर्वात पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली. नरेंद्र मोदी हे विदेशातील पैसा भारतात आणण्याविषयी काहीच प्रयत्न करीत नाहीत असे सांगत आपला त्यांच्यावरचा विश्‍वास उडाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व माजी केंद्रीय निर्गुतवणूक मंत्री अरुण शौरी यांनी देखील मोदींच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता माजी उपपंतप्रधान व एकेकाळचे मोदी यांचे कट्टर समर्थक लालकृष्ण अडवाणी यांनी देखील मोदींचे नाव न घेता तीर मारला आहे. ललित मोदी प्रकरणावरून मोदी सरकारच्या भोवती टीकेचे मोहोळ उठले असतानाच अडवाणी यांनी आणीबाणीला चार दशके पुरी होण्याचे निमित्त साधून मोदी सरकारवर लोकशाहीच्या तात्विक मुद्याचा आधार घेऊन तोफ डागली आहे. लोकशाही चिरडून टाकू शकणार्‍या शक्ती आज जास्त प्रबळ झाल्या आहेत, असे अडवाणी यांचे प्रतिपादन आहे. पण तेवढ्यावरच थांबले तर ते अडवाणी कसले? सध्याचे राजकीय नेतृत्व प्रगल्भ नाही, असे म्हणता येणार नाही, पण या नेतृत्वात ज्या काही त्रुटी आहेत, त्यामुळे विश्वास वाटावा अशी स्थिती नाही, असाही शालजोडीतला टोला अडवाणी यांनी लगावला आहे. अडवाणी यांनी दिलेल्या या मुलाखतीचा अन्वथार्थ दोन प्रकारे लावणे गरजेचे आहे. भाजपामधील मोदी यांचे समर्थक हे अरुण शौरी, जेठमलानी व अडवाणी यांची टीका ही नैराश्यातून झाली असेल व त्यांना सत्तेत वाटा न मिळल्याने त्यांनी हे वक्तव्य केले असावे असे बोसतीलही. मात्र केवळ अशा प्रकारे या तिघांना कमी लेखून भाजपामधील खदखद कुणाला दाबता येणार नाही.नरेंद्र मोदी यांना नेतृत्वपदी बसवण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्णयाला अडवाणी यांचा ठाम विरोध होता. पंतप्रधान होण्याच्या अडवाणी यांच्या मनिषेला पूर्ण विराम देणारा हा निर्णय असल्याने तो पचवणे त्यांना कठीण गेले आणि तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यातच निवडणूक जिंकून नेतृत्व हाती येताच पक्षातील अडवाणी गटाची कोंडी करण्याचे डावपेच मोदी खेळू लागले. निवडणुकीआधीच गोवा येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस न जाऊन मोदी यांच्या निवडीला अडवाणी यांनी विरोध दर्शवला, तेव्हा दिल्लीतील त्यांच्या घरासमोर मोदी समर्थकांनी निदर्शने केली होती. पक्षाबाहेरच्याच नव्हे, तर भाजपातीलही विरोधकांना गप बसविण्यासाठी मोदी काय करू शकतात, याची ही चुणूक होती. अडवाणी यांची नाराजी आपण समजू शकतो, कारण सत्तेचा आलेला घास त्यांच्या तोंडातून मोदींनी काढून घेतला आहे. त्यामुळे अडवाणी हे संप्तत आहेत. सध्या आपल्या हाती सत्तेच्या चाव्या नाहीत याची त्यांना खंत आहे. त्यामुळे त्यांचा भाजपामध्ये असलेला समर्थकांचा मोठा गट नाराज आहे. मोदींनी आपल्या पक्षातील विरोधकांना अतिशय वाईट रितीने बाजूला सारले आहे. अडवाणी यांचे वय झाले आहे त्यामुळे त्यांनी बाजूला व्हावे असे म्हणणे सोपे आहे परंतु त्यांना खड्यासारखे बाजूला सारणेही योग्य नव्हे. शेवटी अडवाणी यांनी आणीबाणीच्या निमित्ताने मुलाखत देऊन आपल्या मनातील खंत व्यक्त केली. अर्थात अजूनही मोदींच्या विरोधात पक्षात बंडखोरीचे वातावरण उफाळून यायला काही काळ जाईल, याचे कारण म्हणजे येत्या वर्षात येऊ घातलेली बिहारची निवडणूक. भाजपा ही निवडणूक पुन्हा एकदा मोदींना प्रोजेक्ट करुन लढविणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बिहारमध्ये यावेळी भाजपाच्या विरोधात कॉँग्रेससह समाजवादी पार्टी, लालू यादव यांचा पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे मोदींना ही निवडणूक जिंकणे काही सोपे जाणार नाही. तसेच गेल्या वर्षात भाजपाच्या व मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. अशा स्थितीत जर मोदींनी ही निवडणूक जिंकून बिहार काबीज केले तर तो त्यांचा मोठा विजय असेल. किंवा त्यांना निसटता विजय मिळाल्यास ते बचावले जातील. मात्र जर भाजपाचा पराभव झाला तर मात्र मोदींच्या विरोधात बंडांचे वारे वाहू लागतील, हे नक्की.  भारतात संघाला हिंदू राष्ट्र आणायचे आहे. त्यासाठी संघाची राजकीय आघाडी म्हणून आधी जनसंघ व नंतर भाजपा निवणुकीच्या राजकारणात सामील होत आले आहेत. विकासाच्या नावाने मते मागणारे हेच भाजपावाले आता देशात हिंदुराष्ट्राचा अजेंडा तयार करीत आहेत. अर्थात आपल्याकडे सर्वधर्मसमभावाची बीजे एवढी खोलवर रुजली आहेत की एकाच धर्माच्या अधिपत्याखाली आपला देश येऊ शकत नाही. भाजपा देशात विकास करण्याऐवजी विविध धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाने देशाचा विकास साधला जाऊ शकत नाही.
---------------------------------------------

0 Response to "भाजपातील खदखद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel