-->
अन्न तुटवड्याचे संकट

अन्न तुटवड्याचे संकट

संपादकीय पान मंगळवार दि. २ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अन्न तुटवड्याचे संकट
स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे नेहमी अन्नाचा तुटवडा भासे. मात्र पंजाबमध्ये हरित क्रांती झाल्यावर हळूहळू हे चित्र पालटत गेले व आपण गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकवू लागलो. पूर्वी आपल्याला अमेरिकेहून गहू आयात करावा लागत असे. अर्थात ही परिस्थिती बदलली व आपण शेजारच्या देशांना अन्नाची निर्यात करु लागलो. आपल्या देशातील प्रत्येकाला पुरेसे अन्न मिळाल्यावर आपण निर्यात करु लागलो. त्यानंतर मागच्या कॉँग्रेसच्या सरकारने अन्नधान्याची सुरक्षा देण्याची हमी घेतली. दारिद्—य रेषेखालील प्रत्येकाला दरमहा ३५ किलो अन्न कमी किंमतीत देऊन कोणीही या देशात भूके राहाणार नाही याची हमी देण्यात आली. परंतु गेल्या वर्षातील अवकाळी पाऊस, दुष्काळ याचे चटके आता भोगावे लागणार आहेत असे दिसते. यंदा आपल्याकडे अन्नधान्याचे उत्पादन कमी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभर पुरेल इतकेही उत्पादन झाले नसल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागासमोर बिकट आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील जनतेच्या आहारात प्रामुख्याने गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी या धान्यांचा जास्तीत जास्त वापर होतो. त्याचप्रमाणे मका आणि कडधान्यांनाही प्राधान्य दिले जाते. मात्र, या धान्यांच्या तुलनेत गहू, तांदूळ, ज्वारी यांचे आहारातील प्रमाण ९० टक्के इतके असते. या धान्यांचे उत्पादन घटल्यामुळे आयात करण्याशिवाय अन्य कोणाताही पर्याय आपल्यापुढे राहाणार नाही, असेच दिसते. मागील तीन वर्षांपासून राज्यात निर्माण झालेला दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींमुळे रब्बी व खरीप हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यांचे उत्पादन घटले आहे. गव्हाचे उत्पादन एकूण गरजेच्या ५२.४३ लाख टन इतके कमी झाले आहे, तर तांदूळ ११ लाख ४५ हजार टन इतका कमी उत्पादित झाला आहे. ज्वारीचे मात्र १३ लाख ५५ हजार टन गरज असताना २४ लाख ८२ हजार टन उत्पादन झाले आहे. तर, एकूण तृणधान्याच्या उत्पादनात एकूण गरजेच्या १६ लाख ८० हजार मेट्रिक टन इतकी तूट झाली आहे. राज्याची १ जानेवारी २०१५ ची लोकसंख्या ११ कोटी ८४ लाख, ३५ हजार होती. राज्याला या लोकसंख्येनुसार १३० लाख ८४ हजार टन अन्नधान्य वर्षाला लागते. २०१३-१४ या वर्षात ११४ लाख ४ हजार टन अन्नधान्याचे एकूण उत्पादन झाले. त्यामुळे यंदा १६ लाख ८० हजार टन तुटवडा जाणवणार आहे. लहरी हवामानामुळे अन्नधान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागते. अशावेळी गुणवत्ताधारक बियाणे, उत्पादित मालाला रास्त भाव मिळाला तरच अन्नधान्याचे उत्पादन आणि त्यावरील क्षेत्र वाढण्यास मदत होईल. राज्यात सर्व प्रकारची पिके घेतली जात नसली तरीही त्याचेही उत्पादन वाढवता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मागील दोन- तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अन्नधान्य उत्पादन घटले. कृषीचा विकासदर उणे झाला आहे. अशा स्थितीत राज्यातील सरकार आता नेमकी कशी पावले उचलते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. ही स्थिती केवळ अन्नधान्याची नाही तर फळबागांचीही झाली आहे. यंदा आंबा, काजू व नारळ या कोकणातील रोख रक्कम देणारी पिकांची कामगिरीही निराशाजनक आहे. आंब्याचे उत्पादन ५० टक्यांनी घसरले आहे. कोकणातील आंब्याचे उत्पादन यंदा उतरण्याचे प्रमुख कारण म्हणजे अवकाळी पाऊस. या पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडले आहेत व काही ठिकाणी किड पडली आहे. त्यामुळे यावर्षी आंबा उत्पादक हैराण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने आत्महत्याही केली होती. कोकणातील ही शेतकर्‍याची पहिलीच आत्महत्या असली तरी ही घटना निराशेत भर घालणारी आहे. आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार चालढकल करीत आहे. गेल्या वर्षात नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील ११७ लाख हेक्टर पीक क्षेत्र बाधीत झाले आहे. व येथे धान्य पिकविणारे ९९ लाख शेतकरी बाधीत झाले आहेत. सरकार आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करीत असल्याचे सांगते मात्र प्रत्यक्षात त्याची कारवाही काही होत नाही. पिकांचे बियाणे देखील उपलब्ध करुन दिले जात नाही. तर अनेकदा हे बियाणे चांगल्या दर्ज्याचे नसते असे आढळले आहे. यंदा पावसाळा चांगला असेल असे वर्तमान जाहीर झाले असले तरीही मान्सूनची अजून चांगली प्रगती केलेली नाही, असे दिसते. कारण सुरुवातीला मान्सून केरळात १ जूनला दाखल होण्याची अंंदाज होता. परंतु ही आशा आता मावळली आहे. पावसाळा केरळात येऊन थडकण्यास अजून तीन ते चार दिवस लागतील असा अंदाज आता व्यक्त होत आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट असून विदर्भातील पारा दररोज चढत आहे. यंदा बहुदा हा पारा उचांकाचा नवीन विक्रम करील अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सध्या जनतेची होणारी अंगाची लाही थांबविण्याकरीता मुसळधार पाऊस पडणे गरजेचे आहे. राज्यात मान्सूनला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. यंदा तरी पाऊस चांगला पडेल अशी अपेक्षा व्यक्त करु या. यंदा चांगला व नियमीत पाऊस झाल्यास दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळेलच शिवाय चांगल्या पिकाचीही यंदा अपेक्षा करता येईल.
----------------------------------------------------    

Related Posts

0 Response to "अन्न तुटवड्याचे संकट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel