-->
मोदींना घरचा आहेर

मोदींना घरचा आहेर

संपादकीय पान शनिवार दि. २७ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मोदींना घरचा आहेर
देशात आणीबाणीसारखे वातावरण असल्याची जोरदार टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्या आठवडयात केल्यानंतर भाजपामध्ये वादळ उठले आहडे. ज्या जेष्ठांना मोदींनी सत्तेत डावलले आहे त्यांनी आता त्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यासारखी स्थिती आहे. अडवाणींचे हे वादळ घोंगावत असतानाच भाजपाचे दुसरे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर पक्षातील ७० वर्षापुढील नेत्यांना अडगळीत टाकले. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांचा समावेश आहे. त्यावरून ज्येष्ठ नेत्यांमध्ये मोदींबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी अडवाणी व जोशींना तिकीट तरी मिळाले मात्र, सिन्हा यांना तर लोकसभेचे तिकीटही नाकारले गेले होते. माजी केंद्रीय अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांना डॉ. मनमोहन सरकार व नरेंद्र मोदी सरकारमध्ये काय फरक आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर सिन्हा म्हणाले की, २६ मे २०१४ नंतर केंद्रातील विद्यमान राज्यकर्त्यांना ७५ वर्षावरील व्यक्ती बिनकामाची वाटत आहे. या व्यक्तींचा मेंदू मेलेलाच असतो, या व्यक्ती काम करू शकत नाहीत, अशी त्यांची ठाम धारणा झाली आहे. आपलाही समावेश त्यात केला आहे. यातून त्यांनी प्रत्यक्षरीत्या मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेची चिरफाड करताना सिन्हा म्हणाले की, भारताला जगातील चांगला देश बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लक्ष केंद्रित करा. त्यानंतर जगातील कंपन्या स्वत:हून येथे गुंतवणूक करण्यासाठी हजर होतील, असा सल्ला त्यांनी दिला. रस्ते बांधणी करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीवरील आयात कर कमी करण्याचा निर्णय आपण अर्थमंत्री असताना घेतला होता. त्यामुळे देशातील महामार्ग उभारणीला मोठया प्रमाणात चालना मिळाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. देशात सध्या गाजत असलेल्या ललितगेट प्रकरणाबाबत अप्रत्यक्षपणे बोलताना ते म्हणाले की, सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यायला हवी. येत्या पावसाळी अधिवेशनात चांगले कामकाज व्हायला हवे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी विरोधकांकडे जाऊन चर्चा करावी. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज फलदायी ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन भू-संपादन अध्यादेश व माल व सेवा विधेयक (जीएसटी) ही महत्त्वाची विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत. ही विधेयके मंजूर व्हायची असल्यास विरोधकांची गरज लागणार आहे. विरोधकांचा विरोध कमी होणे त्यासाठी गरजेचे आहे. अर्थव्यवस्थेची वाढ सांख्यिकीदृष्टया वाढताना दिसत असली तरी ती प्रत्यक्षात परावर्तित होत नसून देशाच्या विकासासाठी अद्याप बरेच काही करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यशवंत सिन्हा यांनी केले. सिन्हा हे स्वत: मोदी मंत्रिमंडळात नसले तरी त्यांचे चिरंजीव जयंत सिन्हा हे अर्थराज्यमंत्री आहेत. सांख्यिकीदृष्टया अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर आली आहे; मात्र प्रत्यक्षात ती दिसत नसल्याचे कारण म्हणजे आम्ही त्याबाबतची बदलेली रचना होय, असे कारणही त्यांनी दिले. या मुद्दयावर चर्चा करण्याची गरज असून अर्थव्यवस्था रुळावर आल्याची तुलना करू शकणारे सक्षम आकडे असायला हवेत, असा आग्रही त्यांनी यावेळी धरला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन दराची मोजपट्टी मोदी सरकारने सत्तेवर येताच बदलली. याबाबत ते म्हणाले की, भारताचा विकास दर ७.५ अथवा ८ टक्के असेल, असे आपल्याला केवळ गेल्या वेळच्या आकडयांच्या तुलनेवरच म्हणता येणार नाही. तर त्यासाठी सदोष मोजपट्टीची गरज आहे. ही बदलण्यात आलेली पद्धत देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारालाही अद्याप उमगलेली नाही, अशा शब्दात त्यांनी अरविंद सुब्रमण्यन यांच्यावरही टीका केली. रिझर्व्ह बँकेकडून पाहिजे त्या प्रमाणात व्याजदर कपात होत नाही, असेही ते म्हणाले. आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख करत सिन्हा यांनी अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालान यांच्यात योग्य समन्वय होता, असे नमूद करत त्यांनी सध्याच्या स्थितीत दोन संस्थांमध्ये असलेल्या मतभेदाचाही उल्लेख केला. सिन्हा यांचे सध्याचे हे वक्तव्य व दोन दिवसांपूर्वी अडवाणी यांनी व्यक्त केलेली मते म्हणजे सत्तेत त्यांना वाटा न दिल्यामुळे नैराश्येतून केलेली आहेत, असे मत भाजपातील मोदी समर्थक व्यक्त करतीलही. मात्र अशा प्रकारे त्यांची हे मत विचारात घेणे चुकीचे ठरेल. कारण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देण्याची क्षमता मोदी समर्थकांकडे नाही. अडवाणी काय किंवा सिन्हा काय या दोघांनाही मंत्रीपद न दिल्याने ते नाराज असणे आपण समजू शकतो, मात्र त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याच्या मनात घर करुन आहे. आज भाजपात सर्व काही काम एकच व्यक्ती करते आहे असे कुणालाही वाटू शकते. कारण कोणत्याही बाबतीत मोदी यांच्या छबीलाच फोकस करण्यात येते. सध्या मोदींची चलती आहे त्यामुळे फारसे कुणी बोलायला धजावत नाही. मात्र एकदा का बिहार निडणुकीनंतर फासे फिरायला लागले की, हेच सइर्व जण मोदींच्या विरोधात जायला मागेपुढे पाहाणार नाहीत. सध्या मोदींना घरचा आहेर अडवाणी व सिन्हा यांनी दिला आहे. मात्र त्यांची संख्या हळूहळू वाढत जाईल, यात काहीच शंका नाही.
----------------------------------------------------

0 Response to "मोदींना घरचा आहेर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel