-->
नवे सरकार, नवे घोटाळे!

नवे सरकार, नवे घोटाळे!

रविवार दि. २८ जून २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
नवे सरकार, नवे घोटाळे!
----------------------------------------
एन्ट्रो- भाजपामधील गटबाजीही आता छुप्यामार्गाने उफाळून वर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या विरोधी गटात असलेल्या विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्यावरच गंडांतर येण्यासाठी नेमक्या त्यांच्या विरोधात बातम्या पेरण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. पूर्वी जसे कॉँग्रेसमध्ये विविध गटांमध्ये सत्तेतील ओढाताणीत राजकारण केले जायचे तसेच राजकारण आता भाजपामध्ये सुरु आहे. म्हणूनच तावडे व मुंडे यांच्या विरोधात बातम्या येण्यामागे राजकारण आहे असे बोलले जाते त्यात तथ्य आहे असे म्हणता येऊ शकते. असो. एकूणच पाहता यापूर्वीच्या सरकारच्या धर्तीवर सध्याच्या नवीन सरकारची पावले पडत आहेत, हे नक्की. सरकार नवीन आले, परंतु सर्व धोरणे, वागणे (आणि आता घोटाळेही) जुनेच राहिले आहेत. त्यामुळे सरकार बदलले असल्याचे काहीच जाणवत नाही. एकूणच काय नवे सरकार, नवे घोटाळे!
--------------------------------------------
केंद्रात व राज्यातील सरकारची नव्याची नवलाई आता संपली आहे. यापूर्वीच्या कॉँग्रेसच्या सरकारचे राज्यात करोडो रुपयांचे घोटाळे झाले होते. नरेंद्र मोदींनी घोटाळ्याबाबत निवडणूक प्रचारात जोरदारपणे मुद्दा लावून धरला होता. अशा प्रकारचे घोटाळे होणार नाहीत व पारदर्शी व्यवहार आपला केंद्रात व राज्यात असेल असे आश्‍वासन दिले होते. आता मात्र प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर कॉँग्रसेच्याच धर्तीवर नवीन सरकार चालत आहे असे दिसते. केंद्रातील सरकारने बनावट पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदा मंत्री तोमर यांना जेलची थेट हवा दाखविली आणि आपण काही तरी मोठे करुन दाखविले असे भासविले. मात्र दुसरीकडे आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बनावट पदवी प्रकरणी न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली आहे. म्हणजे अशाच प्रकारची बोगस पदवी संपादन केल्याप्रकरणी स्मृती इराणी संकटात येणार आहेत. आपच्या मंत्र्याला धडा शिकवायला म्हणून भाजपाने पावले उचलली खरी परंतु त्यांच्याच गळ्याशी हे प्रकरण आता येणार हे नक्की. केंद्रातील बनावट पदवी प्रकरण गाजत असताना महाराष्ट्रातही बोगस पदव्यांचे प्रकरण बाहेर आले आणि फडणवीस मंत्रिमंडळाचा खरा चेहरा जनतेपुढे आला. राज्यातील पाणीपुवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची देखील पदवी बोगस आहे तसेच निवडणुक शपथपत्रात त्यांनी लग्नाविषयी खोटी माहिती सादर केल्याचे उघड झाले आहे. त्यापाठोपाठ उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे पदवी प्रकरण बाहेर आले. विनोद तावडे यांनी पुण्याच्या ज्ञानेश्‍वर विद्यापीठातून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केला आहे. मात्र या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नाही. त्यामुळे या विद्यापीठाने दिलेल्या पदव्या या बोगस ठरतात. त्यामुळे तावडे हे काही अभियांत्रिकेतील पदवीधारक नाहीत. अर्थातच ही पदवी लावणे हा गुन्हा आहे, कारण तावडे हे कोणत्याही पदवीपात्र परिक्षेला बसू शकणार नाहीत तसेच पदवीपात्र नोकरीसाठी त्यांचा अर्जही वैध ठरु शकणार नाही. एकूणच पाहता तावडे यांना हे प्रकरण भोवण्याची शक्यता असताना पंकजा मुंडे यांचा २०६ कोटी रुपयांचा घोटाळा कॉँग्रेसने बाहेर काढला आहे. ना खाएंगे, ना खाने देंगे अशी आश्वासने आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारची द्वाही देत राज्यात सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अवघ्या आठ महिन्यांच्या आतच मोठ्या घोटाळ्याच्या आरोपात अडकले आहे असे दिसते. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांची चिक्की, डिशेस, चटया आणि वह्या- पुस्तके खरेदी करून मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यासाठी एकाच दिवसात तब्बल २४ अध्यादेश काढल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे पंकजा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. कॉंग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबतची लेखी तक्रार केली असून या घोटाळ्याची एसीबी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र सकृतदर्शनी या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. तीन लाखांच्यावर होणारी खरेदी ई-निविदांमार्फत व्हावी, असा आदेश डिसेंबर २०१४ मध्येच राज्य सरकारने दिला असताना मुंडे यांच्या विभागाने कोणतीही निविदा न काढता तब्बल २०६ कोटींची खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. पंकजा मुंडे यांच्यावरील या घोटाळ्याच्या आरोपामुळे भाजपप्रणित युती सरकारला मोठा धक्का बसला आहे. विनोद तावडे यांची पदवी बोगस असल्याचे प्रकरण अजून शांत झाले नसताना भाजपच्या पहिल्या फळीतील मंत्र्यांवर झालेला हा दुसरा मोठा आरोप आहे. विशेष म्हणजे विरोधक सक्रिय झाल्याचे हे संकेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. दरम्यान, या घोटाळ्यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच पंकजा मुंडे यांनी इ-मेलद्वारे खुलासा केला आहे. मी कोणतेही नियम धाब्यावर बसवले नाहीत. अधिकृत दर उपलब्ध असल्याने ई-निविदा काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व कंत्राटे मान्यता प्राप्त संस्थांनाच देण्यात आली आहेत. भ्रष्टाचार टाळण्यासाठी मी गतीशील निर्णय घेतले आहेत. गेली दोन वर्षे माझे कुटुंब प्रचंड तणावातून (वडिल गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे) जात आहे. मुलाची प्रकृती ठिक नसल्यामुळे मी मायेची सावली देण्यासाठी थोडी सुटी घेतली आहे, असे त्यांनी लंडनहून पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. मंत्र्यांकडील बनावट पदव्या असोत किंवा पंकजा मुंडेंवर झालेला हा आरोप असो, यातील वास्तव बाहेर यायला काही काळ लागेल मात्र यामुळे फडणवीस सरकार बदनाम व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईत मालवणी येथे झालेल्या विषारी दारुकांडात तब्बल शंभरच्यावर बळी गेले आहेत. सरकारने मात्र फुटकळ काही अटका करुन व नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण मिटविले आहे. खरे तर मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असल्याने त्यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे. परंतु नुकसानभरपाई दिली की आपली जबाबदारी संपली असे जर मुख्यमंत्री समजत असले तर ती चुकीची समजूत आहे. मुंबईसारख्या उपनगरात मृत्यूचे तांडव घडते व सरकार निक्रियपणे हातावर हात ठेवून बसले आहे. मुख्यमंत्र्याकडे गृहखाते आहे परंतु त्या खात्यावर त्यांचे नियंत्रणच नाही असे या घटनेवरुन दिसते. भाजपामधील गटबाजीही आता छुप्यामार्गाने उफाळून वर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या विरोधी गटात असलेल्या विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्यावरच गंडांतर येण्यासाठी नेमक्या त्यांच्या विरोधात बातम्या पेरण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. पूर्वी जसे कॉँग्रेसमध्ये विविध गटांमध्ये सत्तेतील ओढाताणीत राजकारण केले जायचे तसेच राजकारण आता भाजपामध्ये सुरु आहे. म्हणूनच तावडे व मुंडे यांच्या विरोधात बातम्या येण्यामागे राजकारण आहे असे बोलले जाते त्यात तथ्य आहे असे म्हणता येऊ शकते. असो. एकूणच पाहता यापूर्वीच्या सरकारच्या धर्तीवर सध्याच्या नवीन सरकारची पावले पडत आहेत, हे नक्की. सरकार नवीन आले, परंतु सर्व धोरणे, वागणे (आता घोटाळेही) जुनेच राहिले आहेत. त्यामुळे सरकार बदलले असल्याचे काहीच जाणवत नाही. एकूणच काय नवे सरकार, नवे घोटाळे!
----------------------------------------------  

0 Response to "नवे सरकार, नवे घोटाळे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel