-->
संपादकीय पान बुधवार दि. १८ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अभूतपूर्व तरीही अपेक्षितच
विधान परिषदेच्या इतिहासात सोमवारी एक अभूतपूर्व अशी घटना घडली. ही घटना जरी अभूतपूर्व असली तरीही अपेक्षितच होती. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव भाजपाच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाला. अविश्वास ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शेकाप व अन्य ४ अशा ४५ सदस्यांनी मते टाकली; तर ठरावाच्या विरोधात कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व लोकभारती अशा २२ सदस्यांनी मतदान केले. शिवसेनेने अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडली खरी, परंतु प्रत्यक्ष मतदानावेळी ते तटस्थ राहिले. सभापती देशमुख यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांची निवड घोषित न करून पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित व अन्य २४ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर तब्बल चार तास चर्चा झाली. चर्चेअंती जेव्हा ठराव मताला टाकला तेव्हा त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २८, भाजपाच्या १२, शेकापचे १ तसेच नागो गाणार, रामनाथ मोते, दत्तात्रय सावंत, अपूर्व हिरे या शिक्षक आमदारांनी पाठिंबा दिला. ठरावाच्या विरोधात कॉंग्रेसचे २०, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे व लोकभारतीचे कपिल पाटील अशा २२ सदस्यांनी मतदान केले. विजय सावंत हे सदस्य अनुपस्थित होते, तर शिवसेनेच्या ७ सदस्यांसह अपक्ष सदस्य श्रीकांत देशपांडे हे तटस्थ राहिले. उपसभापती वसंत डावखरे हे पीठासीन असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. अविश्वास ठरावावरील चर्चेच्या निमित्ताने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर टीकास्त्र सोडले, एकमेकांना चिमटे घेतले, वेळप्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढले. यामुळे काहीवेळा सभागृहात हास्याची लकेर उठली, तर काही क्षण तणाव निर्माण झाला. भाजपाने राष्ट्रवादीवर या ठरावाच्या निमित्ताने विश्‍वास दर्शविल्याने राज्यात आता नवीन समिकरणे तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु सध्या तरी यात काही तथ्य नाही असेच दिसते. कारण कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे व शिवसेना-भाजपाचे जे कुरघोडीचे व परस्परांवर मात करण्याचे राजकारण सुरु असते त्याच हा एक भाग होता असे म्हणता येईल. कॉँग्रेसचा देखील फाजिल आविश्‍वास त्यांंना नडला आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे २८ संख्याबळ पाहता खरे तर राष्ट्रवादीला ताबडतोब विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवे होते. मात्र, त्या पदावर माणिकराव ठाकरे यांनी दावा केला. आणि याबाबतचा निर्णय भिजत ठेवण्यात आला. या प्रकारात शिवाजीराव देशमुख यांची काहीच चूक नाही वा त्यांचा दोष नाही. पंढरपूरच्या विठ्ठलावर आमचा राग नसून तेथील बडव्यांवर आहे. शिवाजीरावांना चुकीचे सल्ले देणार्‍या कॉंग्रेस नेत्यांवर आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी पृथ्वी मिसाइल कुठे कुठे फिरत होते, राज्य कोणी घालवले, राजकारणाचे कुरूक्षेत्र कोणी बनविले? असे सवाल करत, कॉंग्रेसचा इतिहास उगाळला तर बर्‍याच गोष्टी बाहेर पडतील, असा सुनिल तटकरे यांनी दिलेला इशारा याबाबत पुरेसा ठरावा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार असताना देखील ५ एप्रिल १९७९ रोजी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष गजाननराव गरुड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. कॉंग्रेसने बहिष्कार टाकल्याने तो बहुमताने मंजूर झाला होता. सोमवारच्या अविश्‍वास ठरावावरून विधान परिषदेत आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या मुद्द्यावर विशेषतः कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी आणि भाजपला धारेवर धरले. यानिमित्ताने युती सरकारमधील भाजप आणि शिवसेनेतील दुफळी उघड झाली. राजकारणाचा हा भाग झाला. नागपूर अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्ष नेतेपद देण्यावरून वाद झाला होता. विधान परिषदेत सर्वाधिक सदस्यसंख्या असल्याने आपल्यालाच विरोधी पक्ष नेतेपद मिळावे, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी तशी मागणीही केली होती. मात्र, सभापतींनी याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे अनुच्छेद १८३ (ग) आणि विधान परिषद नियम ११ अन्वये अविश्‍वासाचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दाखल करणे भाग पडले. कॉँग्रेस आता राष्ट्रवादीची भाजपाशी कशी हात मिळवणी आहे हे उगाळत बसेल. शिवाजीरावांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात ठराव आणू नये असे भावनिक आवाहनही कॉँग्रेसने करुन पाहिले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. परंतु शिवाजीरावांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर कुणाचा राग असण्याचे कारण नाही. परंतु कॉँग्रेस पक्षावर व त्यांच्या ध्येयधोरणांवर अनेकांची टीका होती आणि ती रास्तच होती. सभापतीपदी असतानाही देशमुख यांनी कॉँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यांचे हे वर्तन सर्व संकेतांना धुडकाविणारे असेच होते. त्यामुळे शिवाजीरावांना पायउतार करण्याची पाळी सभागृहावर आली. अशा प्रकारे एका ज्येष्ठ सदस्यावर ही पाळी यावी हे वाईटच. परंतु ही पाळी शिवाजीरावांनी ओढावून गेतली ही सर्वात दुदैवी बाब आहे. कॉँग्रेस पक्ष सध्या सत्ता गेल्यामुळे नैराष्येच्या गर्तेत गेला आहे. त्यामुळे असलेली सत्ता तरी टिकवावी अशी इच्छा बाळगून विधानपरिषदेतील सभापतीपद टिकवावे व एक तरी लाल दिव्याची गाडी आपल्यापाशी राहावी अशी त्याची इच्छा होती. परंतु

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel