-->
मोदींचे एक वर्ष सरले...

मोदींचे एक वर्ष सरले...

रविवार दि. २४ मे २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
मोदींचे एक वर्ष सरले...
--------------------------------------------
एन्ट्रो- नरेंद्र मोदी वा भाजपा सत्तेत आल्याने देशातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात काडीमात्र फरक पडलेला नाही. त्याचे जीणे आणखीनच हालाखीचे झाले. जर या जनतेला नरेंद्र मोदी यांनी काही प्रमाणात दिलासा दिला असता तर गेले वर्ष चांगले गेले बुवा! असे म्हणता आले असते. परंतु नरेंद्र मोदींनी लोकांना स्वप्ने दाखविली एक आणि प्रत्यक्षात करुन दाखविले काही तिसरेच असे म्हणण्याची पाळी आली आहे. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचे, स्वस्ताई या देशात आणण्याचे व विदेशात दडून बसलेला काळा पैसा परत आणण्याचा वादा प्रामुख्याने केला होता. परंतु यातील एकही वादा पूर्ण झालेला नाही. निदान हा वादा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलेही पडलेली नाहीत...जनता त्यांना त्यांच्या या वाद्याचा जाब आता विचारणार आहे... दिल्लीतील जनतेने भाजपाच्या ऐवजी आपला निवडून देऊन राजकीय दणका दिला आहे. पुढील वर्षात भाजपाला आणखी काही असे दणके सहन करावे लागणार आहेत.
----------------------------------------
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी आरुढ झाल्याच्या घटनेला येत्या मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. अर्थात हे वर्ष कसे गेले तेच समजले नाही. कारण या देशातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात काडीमात्र फरक पडलेला नाही. त्याचे जीणे आणखीनच हालाखीचे झाले. जर या जनतेला नरेंद्र मोदी यांनी काही प्रमाणात दिलासा दिला असता तर गेले वर्ष चांगले गेले बुवा! असे म्हणता आले असते. परंतु नरेंद्र मोदींनी लोकांना स्वप्ने दाखविली एक आणि प्रत्यक्षात करुन दाखविले काही तिसरेच असे म्हणण्याची पाळी आली आहे. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचे, स्वस्ताई या देशात आणण्याचे व विदेशात दडून बसलेला काळा पैसा परत आणण्याचा वादा प्रामुख्याने केला होता. परंतु यातील एकही वादा पूर्ण झालेला नाही. निदान हा वादा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलेही पडलेली नाहीत. आपल्या देशातील विदेशात गेलेला काळा पैसा हा आपल्यावरील कलंक आहे हे खरेच आहे. मात्र हा पैसा परत माघारी फिरुन येणे कठीण आहे. नरेंद्र मोदींनी हा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकांना हा पैसा वाटून देण्याचा वादा केला होता. नरेंद्र मोदी निवडणुकीतील आपल्या प्रचार सभेत १२५ कोटी जनतेसमोर बोलतात ते काही खोटे बोलत नाहीत असे समजून त्यांच्यावर जनतेने विश्‍वास टाकला. मोदी जर निवडून आले तर आपल्या प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील अशी आशा   त्यांना होती. आता वर्ष उलटले तरी एकाच्याही खात्यात एक पैसाही जमा न झाल्याने जनतेच्या मनात आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे. काळा पैसा देशात आणण्याच्या बाबतीत मोदींकडे किंवा कुणाकडेही काही जादुची कांडी नाही. परंतु त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी असे काही काळ्या पैशाबाबत चित्र उभे केले की, लोकांना मोदी विदेशातून पैसा आणतील अशी आशा निर्माण झाली. शेवटी ही आशा म्हणजे भ्रमच ठरला. त्याचबरोबर मोदींनी महागाईचा भस्मासूर गाडण्याची भाषा केली होती. स्वस्ताई आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र गेल्या वर्षात तसे काही झाले नाही. सुरुवातीला जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किंमती घसरत होत्या. त्याणउळे पेट्रोल व डिझेल स्वस्त होऊ लागले होते. मोदी भक्तांनी व भाजपाच्या नेत्यांनी बघा मोदी येताच ही घसरण सुरु झाली आता पुढे बघा कशी स्वस्ताई होते ते, असे बरगळायला सुरुवात केली होती. मात्र गेल्या सहा महिन्यात ही परिस्थीती पूर्णपणे बदलत गेली व जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किंमती पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला व पेट्रोल, डिझेल महाग होऊ लागले. खनिज तेलाच्या किंमती उतरत होत्या त्याला काही मोदी जबाबदार नव्हते. तर जागतिक कारणे होती. जनतेची यातून पुन्हा एकदा भाजपा व नरेंद्र मोदींनी फसवणूक केली. मोदी पंतप्रधान होणार या धास्तीने महागाई पळून जाणार अशा जाहिराती केल्या जात होत्या. महागाईने गरीब वर्ग तर आता पूर्णच पिचला गेला आहे. याला अपवाद आहे तो काही प्रमाणात मध्यमवर्गाचा. मध्यम व उच्च मध्यमवर्गाला अच्छे दिन आले ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत. टेलिव्हिजन सेट्स, मोटारी, मोबाईल फोन्स, शॉपिंग मॉल्स यांचा प्रचंड विस्तार झाला तो २००४ ते २०१४ या दहा वर्षात. त्याचा फायदा अर्थातच मुख्यत: मध्यम व उच्चमध्यम वर्गाला झाला. पण जणू ही सुबत्ता आपल्यामुळे आली असा पवित्रा मोदी-शहा-जेटली या त्रिमूर्तीने घेतला आहे. मात्र देशातील गरीब हा अधिक गरीब झाला आहे. मोदींनी निवडणुकीत आणखी एका गोष्टीचा वादा केला होता तो म्हणजे, भ्रष्टाचार निपटण्याचा. हा वादा देखील खोटाच ठरला. भ्रष्टाचार कुठेच कमी झालेला दिसत नाही. नरेंद्र मोदी हे वरच्या पातळीवर भ्रष्टाचार निपटून काढल्याचा दावा करतात. मात्र हे खरे की खोटे हे काळ ठरविणार आहे. या सरकारने घेतलेल्या निर्णयातून भ्रष्टाचार झाला का हे भविष्यात समजणार आहे. लगेचच एका वर्षात ही बाब काही नजरेत येणार नाही. डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार हा त्यांच्या शेवटच्या दोन वर्षात प्रकर्षाने उघड झाला होता, हे विसरता कामा नये. सर्वसामान्य जनतेला आजही सरकारी कामे करण्यासाठी मग तो साधा एखादा कागदपत्र असो, तो मिळविण्यासाठी शंभराची किंवा पाचशेची नोट ही पुढे सरकवावी लागतेच. ही स्थीती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त आपण झालो असे म्हणता येणार नाही. खरे तर मोदींकडे भ्रष्टाचार रोखण्यासाठी जादुची कांडी होती असे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु मोदींभाईंची ही जादुची कांडी अजून काही कार्यान्वित झालेली दिसत नाही. एककीकडे जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार देशातील भांडवलदारांवर सवलतींची बरसात करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जमीन सुधारणा कायदा चसरकारने आणला आहे. या नवीन सुधारणांनुसार सरकारला शेतकर्‍यांच्या जमिनी कमी किंमतीत ताब्यात घेऊन त्या कारखाने उभारण्यासाठी भांंडवलदारांच्या ताब्यात देणे शक्य होणार आहे. यापूर्वीच्या सरकारने शंभर वर्षापूर्वीच्या कायद्यात सुधारणा करुन याबाबतचा नवीन कायदा केला होता त्यात शेतकर्‍यांचे हीत जपण्यात आले होते. देशातील डाव्या पक्षांनीही त्याला म्हणूनच पाठिंबा दिला होता. मात्र आता मोदी सरकारने हा कायदा पूर्णपणे बदलून भांडवलदारांच्या हीताचा केला आहे. त्याचबरोबर सरकारने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना व प्रधानमंत्री विमा योजना या सर्व योजना म्हणजे यापूर्वीच्या सरकारच्याच योजना नव्याने पॅकेजिंग करुन बाजारात आणल्या आहेत. या योजना यापूर्वीही होत्या. यात नव्या सरकारची नाविण्यपूर्ण एकही योजना नाही. अशा प्रकारे मोदी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. पंतप्रधानांनी गेल्या वर्षातील ५० दिवस विदेशात घालविले आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या खर्च आता हजार कोटींच्या घरात गेला आहे. मग हेच मोदी डॉ. मनमोहनसिंग विदेश दौर्‍यावर जात त्यावेळी टीका का करायचे असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन यापूर्वीच्या सरकारवर जे टीकास्त्र सोडले आहे त्यामुळे आपल्या देशाची निंदानालस्तीच होत आहे. विदेशात जाऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे की आपल्या देशातील मागच्या सरकारवर टीका करायची हे जर पंतप्रधानांना समजत नसेल तर त्यांच्या विदेश दौर्‍याचे हसेच होणार आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यामुळे आता सर्वसामान्यंना दिलासा मिळेल व देशात एक वेगळे चित्र निर्माण होईल ही अपेक्षा आता धुळीस मिळाली आहे. या सरकारची कामगिरी पाहता त्यांना काठावरही पास होण्याइतके मार्क मिळणार नाहीत. पाच वर्षासाठी निवडून दिलेल्या या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असेच म्हणावे लागेल...यात नाविण्य असे काहीच ठरले नाही, असेच खेदाने म्हणावेसे वाटते. जनता त्यांना त्यांच्या वाद्याचा जाब आता विचारणार आहे... दिल्लीतील जनतेने भाजपाच्या ऐवजी आपला निवडून देऊन राजकीय दणका दिला आहे. पुढील वर्षात भाजपाला आणखी काही असे दणके सहन करावे लागणार आहेत.
------------------------------------------------------  

0 Response to "मोदींचे एक वर्ष सरले..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel