-->
संपादकीय पान सोमवार दि. १८ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अस्मानी आणि सुल्तानी
सध्या रायगड जिल्ह्याला अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही प्रश्‍नांनी घेरले आहे. एकीकडे काही तालुक्यात दुष्काळाची स्थिती असताना टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाने काही तालुक्यांना घेरले आहे. या दोन्ही स्थीतींमुळे शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. राज्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात दुष्काळाचे प्रमाण कमी असले तरीही एवढा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही दुष्काळाने काही तालुके ग्रासणे हे आपल्या नियोजनकर्त्यांचे पापा आहे असेच म्हणावे लागेल. मागील आठ दिवसापुर्वी जिल्हयात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुन्हा जिल्हयात अवकाळी पाऊस कोसळला. त्यात वादळी पाऊसही मोठ्या प्रमाणात बरसल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. पावसाळ्यापुर्वी मे महिन्यात घरांची दुरुस्ती, पेंढा भरणे व लाकूड फाटा गोळा करणार्‍या नागरिकांचे  हाल झाले. तसेच विट भट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांसह व्यवसायिकदेखील चिंताग्रस्त झाले. जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, कर्जत, पनवेल आदी तालुक्यांत शुक्रवारी ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली व वादळी वारा वाहू लागला होता. त्यानंतर वादळी वार्‍यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासहदेखील ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरु होण्याच्या अगोदर ग्रामीण भागात घरांच्या कौलांची दुरुस्ती करणे, नवीन कौले लावणे, पेंढा भरून ठेवणे, ओले असलेला लाकूड फाटा उन्हात सुकविणे अशी कामे सुरु असताना अवकाळी पावसाने अचानक बरसल्याने नागरिकांची धावपळ उडाली. माणगांवमध्ये काही ठिकाणी वादळी वार्‍याने झाडे कोसळली. तसेच कित्येक तास विज पुरवठा खंडीत झाला होता. त्यातच अनेक ठिकाणी लग्नांची, हळदीची धावपळ असताना अचानकपणे पाऊस आल्याने मंडपात एकच धावपळ उडाली. गेली काही दिवस रायगडकर उकाड्यानं हैराण झाले होते. पावसाच्या शिडकाव्यामुळं काही नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे उकाडा आणखी वाढणार आहे. जिल्हयात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने काहींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे मासेमारी करताना अडचण होत असल्याने मासेमारीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भिती कोळी समाजाला निर्माण झाली आहे. आंबा काजू पिकांचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी काही भागात तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. पावसाळ्याला अजून महिना बाकी असतानाच राज्यातील टँकरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून सध्या १६०० गावे आणि २००० वाड्यांना सुमारे दोन हजार टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी याच काळात सुमारे ५०६ टँकर होते आता त्यात सुमारे चार पटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात सध्या तीव्र उन्हाळा आहे तर काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले असले तरी गेल्या वर्षापेक्षा यंदा राज्यातील गावांत तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून महिन्याचा कालावधी बाकी असतानाच उदभवलेल्या परस्थितीला सामोरे जाण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५०६ टॅकर लावण्यात आले होते तर सध्या १६०० गावांना आणि दोन हजार वाड्यांना सुमारे दोन हजार टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चार पटीने वाढ झालेल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक  १४१२ टँकर्स एकट्या मराठवाड्यात असून त्याखालोखाल ३४१ टँकर्स नाशिक विभागात तर कोकणात ८३, अमरावती ५४, पुणे विभागात ६२ टँकर्स पाणी पुरवठा करीत असून सर्वात कमी म्हणजे पाच टँकर्स नागपूर विभागात आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास ५१० गावे आणि ११५८ वाड्यांसाठी ५०६ टँकर होते. एकीकडे हा दुष्काळी वातावरण असताना समाधानाची बाब म्हणजे यंदा पाऊस वेळेत सुरु होण्याची शक्यता आहे. केरळात यावेळी बहुदा ३० मे पर्यंत मन्सून येईल व झपाट्याने राज्याच्या आठवड्याभरात पोहोचेल असा अंदाज आहे. हे जर खरे झाले तर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळेल. यावेळी पावसाळा लवकरच असेल असा अंदाज जो व्यक्त होत आहे त्याला निसर्गही दुजोरा दित आहे. कारण समुद्रात सध्या तुफान आले आहे. लाटांनी रौद्र रुप धारण केले आहे. त्याचबरोबर धुळीची वावटळे उठत आहेत. पावसाची तयारी करुन सरकारी यंत्रणा सज्ज करण्यासाठी बैठका सुरु झाल्या आहेत. रायगड जिल्हा हा समुद्रकिनारी असल्याने विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. अर्थात अशा प्रकारच्या कितीही बैठका झाल्या तरी एखादे पावसाळी संकट उभे राहाते त्यावेळी जिल्ह्यातील प्रशासन हे ठप्प झाल्याचे चित्र दरवर्षी पहावयास मिळते. अतिवृष्टी, पूर परिस्थितीत सरकारी यंत्रणा व संपर्क यंत्रणा कोलमडलेली पहावयास मिळते. ज्या भागात उधाणामुळे खारभूमीचे बंधारे फूटून पाणी आतमध्ये घुसते त्यावेळी त्या गावात तातडीने मदत कार्य पोहोचणे गरजेचे असते. यंदा तर २७ दिवस मोठी उधारभरती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी किनारपट्टीवरील गावांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते. तसेच तेथे शासकीय मदत तत्परतेने पोहोचणे गरजेचे असते. यंदाच्या पावसात तरी शासकीय यंत्रणा वेगात तत्परतेने कामे करील अशी अपेक्षा करु या.
-------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel