-->
संपादकीय पान गुरुवार दि. ९ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
धूळवादळाचे संकट
अवकाळी पाऊस व त्यानंतर अचानक सुरु झालेला उष्मा यामुळे लोक हैराण झाले असताना आता धुळीचे वादळ आले आहे. पश्‍चिमेकडील वार्‍याबरोबर आखाती देशांकडून येणार्‍या धूलिकणांच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रावर धुळीच्या वादळाचे सावट आले आहे. उन्हाची ताप वाढली असताना भर दुपारी धुक्यासारखे वातावरण अनुभवायला मिळत आहे. दोन ते तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या धुळीच्या वादळामुळे वातावरण दूषित झाले असून, त्याचा उन्हाळी पिके, फळबागा, मानवी आरोग्य, प्राणी, पक्ष्यांवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अरब आणि आखाती देशांमध्ये धुळीची वादळे तयार होतात. त्यामुळे हवेमध्ये मिसळलेले धुळीचे कण वार्‍याच्या प्रवाहाबरोबर वाहत येतात. पश्‍चिमेच्या दिशेने वाहणार्‍या वार्‍यांमुळे हे धूलिकण दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाना या भागाकडे वाहत असतात. पश्‍चिम किनारपट्टीलगतच्या भागात दरवर्षी अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असते, तसेच या कालावधीमध्ये मुंबई आणि गुजरातच्या भागातही कमी-अधिक प्रमाणात वातावरण धूळ पसरल्याचे नेहमी दिसून येते. सध्या वार्‍याची दिशा महाराष्ट्राकडे असल्याने ठाणे, पालघर, रायगडसह कोकण; तर नाशिक, कोपरगाव, नगर, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात धूलिकण आले आहेत. २०१२ साली मुंबईमध्ये अशाच प्रकारे आलेल्या धूलिकणांमुळे वातावरण प्रदूषित झाले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पश्‍चिम वारे संयुक्त अरब अमिरतीच्या वाळवंटावरून वाहताना मातीचे कण घेऊन ओमनकडे येत आहेत. ओमनमध्ये सध्या कोरडे वातावरण असून, तापमान ४० अंशांपर्यंत पोचले आहे. येथे एप्रिलमध्यात उन्हाळ्यास प्रारंभ होऊन तो ऑक्टोबरपर्यंत चालतो. ओमन ते भारतचा समुद्रकिनार्‍या दरम्यान अरबी समुद्रावर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ओमनकडील वारे थेट भारताकडे वाहत आहेत. हे वारे येताना धूलकण घेऊन येत असल्याने, गेले दोन दिवस संपूर्ण दिवसभर धूलकणांचा पट्टा होता. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या धूळवादळाचा इशारा सरकारतर्फे देण्यात आला आहे. धुळीचे वादळ हा नैसर्गिक आपत्तीचाच प्रकार आहे. धूलिकणांमुळे हवा दूषित होते, तसेच या हवेमध्ये काही रासायनिक घटक असण्याची शक्यता असते. ही धूळ जमिनीवर येऊन पिकांवर, मानवी आरोग्यावर, प्राणी, पक्ष्यांवर त्याचे परिणाम होऊ शकतात. या दूषित हवेमुळे माणसे व प्राणी, पक्ष्यांना संसर्ग होऊन आजार वाढू शकतात, तसेच उन्हाळी पिके आणि फळबागांवर धूळ साचल्याने त्यावर रोग आणि किडीची वाढ होऊ शकते. शेतकर्‍यांनी पिकांची निरीक्षणे करून, कीड रोग वाढल्यास आवश्यकतेनुसार बुरशी व कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र सरकारचे कृषी खाते याबाबत काही मार्गदर्शन शेतकर्‍यांना करताना दिसत नाहीत.
पश्‍चिमेकडून येणार्‍या वार्‍याबरोबर अरब व आखाती देशांतून धूलिकण वाहून आणले जातात. या वार्‍याची दिशा साधारणतः दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियानाकडे असते. मात्र, या वर्षी दिशा बदलून ती महाराष्ट्राकडे असल्याने हवेतील धूलिकण वाढले आहेत. वालुकाकणांपेक्षा धूलिकण आकारमानाने सूक्ष्म असले, तरी सामान्यतः धुळी वादळे आणि वालुकावादळे यांच्यात भेदभाव केला जात नाही. उ. अमेरिका, सहारा, ईजिप्त, अरेबिया, इराक, इराण, पाकिस्तान, थरचे वाळवंट, उत्तर भारत, चीन, गोबीचे वाळवंट, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांवर ही वादळे निर्माण होतात. अमेरिकेत त्यांना सरसकट धुळी वादळे म्हणतात, आफ्रिकेत सरसकट वालुकावादळे म्हणतात, तर आशियात ती जेथे निर्माण होतात तेथील भूपृष्ठ असेल त्या प्रमाणे धुळी वादळ किंवा वालुकावादळ असे म्हणतात. धुळी वादळे किंवा वालुकावादळे यांसारख्या आविष्कारांचा फार मोठ्या क्षेत्रावर प्रभाव पडतो. या कारणामुळे वारा नसलेल्या शुष्क तप्त क्षेत्रांवर उन्हाळ्यात दुपारी धुळीची जी छोटी वातचक्रे किंवा लहान आवर्त निर्माण होतात, त्यांची गणना धुळी वादळात केली जात नाही. चक्राकार गतीने फिरणार्‍या वार्‍यांचा वेग ताशी १५ ते ८० किमी. असतो. केंद्रभागी वातावरणीय दाब बराच कमी असतो. अशा लहान स्वरूपाच्या भोवर्‍यात कोरड्या जमिनीवरची धूळ, डबर, दगडांचे लहान तुकडे, वाळूचे कण भूपृष्ठापासून बर्‍याच उंच पातळीपर्यंत उचलले जातात. धुळी वादळांमुळे भुसभुशीत जमिनीची फार मोठ्या प्रमाणावर धूप होते व अनिष्ट ठिकाणी धुळीचे थर जमा होतात. मार्च १९०१ मध्ये सहारा वाळवंटावर निर्माण झालेल्या वालुकावादळांमुळे १,८०,००० टनांपेक्षा अधिक धूळ यूरोपखंडावर जाऊन पडली आणि तितकीच धूळ भूमध्यसागरात पडली होती. उत्तर अमेरिकेच्या मध्यवर्ती सखल विभागात सुमारे ८० वर्षांपूर्वी अवर्षणाच्या काळात अनेक धुळी वादळे होऊन एक मोठे राष्ट्रीय संकट उभे राहिले होते. यामुळे वातवरणीय दृश्यमानता मंदावते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. विमान वाहतुकीला तर धुळीची वादळे अत्यंत धोक्याची असतात. धुळीचे दाट झोत हवेत फेकले गेल्यामुळे व वातावरणात धूलिकण दीर्घकालापर्यंत राहिल्यामुळे विस्तीर्ण भूपृष्ठावर येणार्‍या सौर प्रारणात घट होते. हजारो चौ.किमी. क्षेत्रातील हवामानावर त्यामुळे परिणाम होऊ शकतो. दाट धुळी वादळात दृश्यमानता इतकी कमी होते की, ५ मी. पेक्षा दूर अंतरावरच्या वस्तूसुद्धा स्पष्ट दिसत नाहीत. भुसभुशीत जमीन, धुळीचा किंवा वाळूचा भरपूर पुरवठा होईल असे क्षेत्र, दीर्घकालपर्यंत पावसाचा अभाव, भूपृष्ठावरील धूळ किंवा वाळू स्थानभ्रष्ट होईल इतके प्रबल पृष्ठभागीय वारे आणि ऊर्ध्व दिशेने संक्षोभजन्य वायुप्रवाह निर्माण करण्याइतपत वातावरणीय अस्थैर्य या गोष्टी धुळी वादळे निर्माण होण्यास आवश्यक असतात. सहारा व गोबी या वाळवंटांवर कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे विस्तृत क्षेत्रावर उग्र वालुकावादळे निर्माण होतात. काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्या ठिकाणची रंगीत धूलिकणमिश्रित हवा दूरस्थ अभिसारी चक्रवातात ओढली जाते. त्यामुळे कधीकधी काही ठिकाणी मातकट किंवा लाल रंगाचा पाऊस पडतो. सहारातील धूळ अनेकदा यूरोपमध्ये पडणार्‍या लाल पावसात आढळते. असेच आविष्कार उत्तर अमेरिका, चीन, ऑस्ट्रोलियात क्वचित घडून येतात. सौदी अरेबिया-इराक-इराण-पाकिस्तान ह्या विशाल पट्‌ट्यात अतिशुष्क हवेमुळे सातत्याने धुळीचे आवरण आढळतात. आता हे नैसर्गिक संकट आपल्यावरही आले आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आपण यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
--------------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel