-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २७ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मराठी चित्रपटांचे यश
बासस्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या झालेल्या घोषणेत कोर्ट या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित मराठी चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ जाहीर झाले. त्याचबरोबर किल्ला, एलिझाबेथ एकादशी, ख्वाडा या मराठी चित्रपटांनी तसेच मित्रा या लघुपटानेही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली. मराठी चित्रपट गेल्या काही वर्षात कात टाकून त्याचा परीघ विस्तारला असल्याचे जे गेल्या काही वर्षांपासून चित्र दिसत होते त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यात आणखी एक लक्षणीय बाब नोंद करण्यासारखी आहे व ती म्हणजे, ज्या फॅँड्री या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला, त्याचा दिग्दर्शक नागराज मंजुळे याच पहिलाच चित्रपट होता. कोर्ट देखील चैतन्य ताम्हणेंचा पहिलाच चित्रपट आहे. नागराज व चैतन्य दोघेही तरुण आहेत. दोन्ही चित्रपटांचे विषय हे लोकप्रिय वर्गातले नाहीत. दोन्ही चित्रपटांमध्ये बहुतांशी कलाकारांभोवतीही लोकप्रियतेचे वलयही नाही. कोर्टमध्ये आपल्या न्यायव्यवस्थेचे चित्रण तर फँड्रीमध्ये जातिव्यवस्थेच्या उतरंडीविषयीचे भाष्य आहे. असे विषय असलेल्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही एक प्रकारे उंचावलेल्या प्रेक्षकांच्या अभिरुचीचा व आपला मराठी सिनेमा चाकोरीतून बाहेर येत असल्याचे द्योतक आहे. सन्मान करणारी घटना आहे. कोर्ट हा चित्रपट अद्याप व्यावसायिकदृष्ट्‌या प्रदर्शित व्हायचा आहे; पण आजवरच्या अनेक महोत्सवांमधून या चित्रपटाला फँड्रीसारखीच जाणकार रसिकांची मान्यता मिळाली आहे. महोत्सवांमध्ये गाजणार्‍या चित्रपटालाही खरे तर आता मराठी प्रेक्षकवर्ग उचलून धरू लागला आहे. यातील सबटायटल्समुळे तो चित्रपट प्रादेशिक सीमा ओलांडू लागला आहे. पंढरपुरातल्या स्थानिक बालकलाकारांना घेऊन एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला होता. हरिश्चंद्राची फॅक्टरीनंतर चार वर्षांनी दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या या चित्रपटाने लहान मुलांचे अस्पर्शित विश्व प्रकाशात आणले होते. किल्ला या अविनाश अरुण दिग्दर्शित चित्रपटाचेही तसेच. ताम्हणे यांच्याप्रमाणेच अविनाश अरुण यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. एलिझाबेथ एकादशी, किल्ला या दोन्ही चित्रपटांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट बालचित्रपट आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्याने मराठी चित्रपटांचा संख्येच्या दृष्टीनेही राष्ट्रीय पातळीवर दबदबा वाढला आहे. त्यात ख्वाडा या चित्रपटाने आणि मित्रा या लघुपटानेही पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या यादीत भर घातली आहे. तसे पाहता, मधला काळ मराठी चित्रपटांसाठी फारसा उत्साहवर्धक नव्हता. मात्र, नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटाला आशयसमृद्धतेबरोबरच ग्लॅमरच्याही जगात आघाडीवर आणायला सुरुवात केली आहे. हिंदीतील अनेक दिग्गज निर्माते म्हणून का होईना, पण मराठी चित्रपटसृष्टीत गुंतवणूक करू लागले आहेत. याशिवाय मराठीतील कलाकार आता हिंदीमध्ये केवळ चपराशी, हवालदार, घरगडी या भूमिकांपुरते मर्यादित न राहता प्रमुख भूमिका साकारू लागले आहेत. अनुराग कश्यपच्या हंटरमधील सई ताम्हणकर व राधिका आपटे या दोघींच्या मध्यवर्ती भूमिका असणे, हे याचे ताजे उदाहरण आहे. व्यावसायिकदृष्ट्‌या शंभर योजनेपुढे असलेल्या बॉलीवूडच्या स्पर्धेत टिकाव धरत मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये आर्थिक यशाचे गणित जमवत आहेत, ही समाधानाची बाब आहेच. मात्र, मराठी चित्रपटांना आशयाचा दर्जा उंचावण्याबरोबरच प्रेक्षकांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरचे स्थान मिळवण्याचे आव्हान येत्या काळात पेलायचे आहे. अर्थात, अस्तित्वाचा प्रश्न कायमचा निकाली निघण्यासाठी मराठी चित्रपटांना आर्थिक बळकटी येणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. ही बळकटी कसेही करून चित्रपट काढायचा आणि परतावा मिळवायचा एवढा माफक उद्देश असलेल्या निर्मात्यांकडून नव्हे, तर चित्रपट माध्यमाची जाण आणि कलाभान असलेल्या निर्मात्यांमुळेच येऊ शकते. तसेच हॉलीवूड काय किंवा बॉलीवूड काय, दोन्ही चित्रपटसृष्टींचा आधार कुणी टॉम क्रुझ किंवा सलमान खानसारखा स्टार नव्हे, तर चित्रपट माध्यमाची पुरेपूर जाण असणारे निर्माते आहेत, याचे भान चित्रपटसृष्टीला ठेवावे लागणार आहे. फँड्रीला एका मोठ्या वाहिनीचे पाठबळ मिळाले होते, मात्र अनेक दर्जेदार मराठी चित्रपट निर्माता आणि वितरकांच्या पातळीवर दुर्लक्षितच राहिले. मराठी चित्रपटांची लंगडी बाजू सक्षम झाल्यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद द्विगुणित होईल आणि बॉलीवूडशी स्पर्धा करताना पिच्छा न सोडणारा खोलवर रुजलेला न्यूनगंडही मनातून जाईल. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी आपली कात टाकली आहे. तमाशाप्रधान चित्रपटांच्या साच्यातून बाहेर येऊन तरुण पिढीच्या दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांमधून विविध विषय हाताळण्यास सुरुवात केली. याची सुरुवात श्‍वास या चित्रपटाने झाली असे म्हणता येईल. आता गेल्या दशकात अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार पटकाविलेतर आहेतच शिवाय अनेक चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले आहेत. मराठी चित्रपट उत्पन्नाचा दहा कोटीचा पल्ला गाठू शकतो ही बाब स्वप्नवत वाटत होती. मात्र ते आता शक्य झाले आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपट आता नव्याने भरारी घेऊ शकतो. दक्षिणेतील चित्रपट ज्या प्रकारे आपले देशातील चित्रपट निर्मिती उद्योगावर आपले अधिराज्य गाजवितात तसा काळ मराठी चित्रपटांना पुढील दहा वर्षात यायला हवा. मराठी चित्रपटांची सध्या ज्या गतीने वाटचाल सुरु आहे ते पाहता हा काळ मराठी चित्रपटांना काही लांब नाही. पुढील काळात काही चांगल्या मराठी चित्रपटांच्या कथानकांवरुन हिंदी चित्रपट बेतले जातील तो एक मराठी चित्रपटसृष्टीचा मोठा विजय असेल.
------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel