-->
संपादकीय पान गुरुवार दि. २६ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मालवणी धूमशान
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे नारायण राणे यांच्याबरोबरच एमआयएमनेही उमेदवार उभा केल्यामुळे ही निवडणूक आता मोठी चुरशीची होणार आहे. शिवसेनेने दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नीला तिकिट दिले आहे. शिवसेनेने आपल्या उमेदवाराचा अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केले. त्यापुढे एक पाऊल टाकून  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या राणे यांना मातोश्रीच्या अंगणातच नियतीचा न्याय मिळावा, यासाठी शिवसेनेने प्रचाराची सर्व तंत्रमंत्र अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. एमआयएमने आपली लढत कॉंग्रेसच्या नारायण राणे यांच्याशी नसून शिवसेनेशी असल्याचे सांगत मुस्लिम मते एकगठ्ठा मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहेत व ही मते आजवर कॉँग्रेसच्या पारड्यात पडत आली होती. त्यामुळेच नेहमी मातोश्री असलेल्या मतदारसंघात अनेकदा कॉँग्रेसचा उमेदवार विजयी व्हायचा अशी परिस्थिती होती. मात्र स्वर्गीय बाळा सावंत यांनी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना अनेक कामे केली आणि त्याची प्रचिती म्हणून त्यांना मुस्लिमांची मते मिळाली. त्यामुळे वांद्रे मतदारसंघातील विजयाचे श्रेय शिवसेनेपेक्षा बाळा सावंत यांचे वैयक्तीकच जास्त होते. आता बाळा सावंत यांच्या पत्नीला सहानभूतीच्या लाटेत काही मते पडतीलही. मात्र शिवसेनेच्या पदरात ही जागा सहजरित्या पडेल असे नव्हे. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाजतगाजत भरला. एवढेच नव्हे तर या मतदारसंघाशी आपली नाळ असल्याचे सांगत याच मुंबईतून नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाल्याचे सांगितले. नेमक्या याच गोष्टीचा वापर प्रचाराचे सूत्र म्हणून शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आयकर विभागाच्या लिपीकापासून नगरसेवक, आमदार, मंत्री व मुख्यमंत्री केले तेच नारायण राणे कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी पदे भोगत कोकणातच आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. आता शिवसेना आणि बाळासाहेबांशी गद्दारी करणार्‍या राणे यांना कॉंग्रेसनेच राजकीयदृष्टया संपविण्यासाठी मातोश्रीच्या अंगणात पाठवले असून हा नियतीचा न्याय असल्याचे सेनेचे नेते मतदारांच्या मनात बिंबविण्याचे काम करत आहेत. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याकडे या मतदारसंघाच्या प्रचाराची सूत्रे आहेत. आमदार संजय पोतनीस यांच्यासह सेनेच्या नेत्यांवर गल्लीबोळ पिंजून काढून शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या नारायण राणे यांना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी नियतीनेच त्यांना येथे लढण्याची बुद्धी दिल्याचा मुद्दा मतदारांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. ज्या राणे यांना शिवसेनेने मोठे केले मानाची सर्व पदे दिली तेच कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर टप्प्या टप्प्याने संपत आले व वाद्रे पूर्व मतदारसंघात त्यांची राजकीय कारकीर्द संपेल असा विश्वास शिवसेनेचे नेते व्यक्त केरीत आहेत. या मतदारसंघात सुमारे ८० हजार मुस्लिम मतदार असून गेल्यावेळी एमआयएमला तेवीस हजार मते मिळाली होती तर सेनेच्या प्रकाश सावंत यांना ४१ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थान फारसे नाही. कॉँग्रेसचा मात्र हा पूर्वीपासून म्हणजे सुनिल दत्त खासदार असल्यापासून बालेकिल्ला समजला जात होता. मात्र कालांतराने कॉँग्रेसची या मतदारसंघातली मते कमी होत गेली. शिवसेनेसाठी ही लढाई म्हणजे प्रतिष्ठेची आहे तर नारायण राणेंसाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. उमेदवारी अर्ज भरताना राणे यांनी मोठया प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले हे त्याचे द्योतक होते. परंतु अर्ज भरताना गर्दी जमविली की उमेदवार विजयी होतो असे नव्हे. मात्र एक बाब आहे की, नेहमी सत्तेच्या फेर्‍यात व गटबाजीत अडकलेली कॉंग्रेस यावेळी मात्र राणेंचा अर्ज भरताना एकसंघ दिसत होती. कारण यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे बडे नेते माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, संजय निरुपम, नसिम खान, कृपाशंकर सिंग, प्रिया दत्त, शीतल म्हात्रे, संजय दत्त आदी नेतेमंडळी उपस्थित होती. तसेच सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड, संजय पाटील हे राष्ट्रवादीचे नेतेही आवर्जून होते. त्यामुळे यावेळी ही जागा जिंकण्यासाठी कॉँग्रेस आपली सर्व ताकद पणाला लावेल असे दिसते. राणे यांच्यासाठी ही लढाई अस्तिवाबरोबर प्रतिष्ठेची आहे. कुडाळमधील पराभवामुळे त्यांना मोठा राजकीय धक्का बसला होता. आता मात्र शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात राणे यांनी पोटनिवडणूक लढविण्याचे धाडस केले आहे. अर्थात अशा प्रकारचे डॅशिंग राजकारण हे राणेच करु शकतात. तसे पाहता या मतदारसंघाशी त्यांचेे जुने संबंध आहेत. कोकणातून मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांचे वास्तव्य खेरवाडी परिसरात होते. त्यामुळे राणे हे काही बाहेरचे नाहीत. मात्र कॉँग्रेसची काही मते ही एमआयआमला जाण्याचा धोका असल्याने त्याचा त्यांना किती तोटा होतो हे पहावे लागेल. काहींच्या मते या फुटीचा फायदा राणेंना होऊ शकतो. एमएमआयचे वारीस पठाण यांनी तर आमची लढत केवळ शिवसेनेशी असल्याचे सांगून मुस्लिम आरक्षणासह सेना-भाजपने केलेल्या वेगवेगळ्या फसवणुकीमुळे लोक एमआयएमलाच निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. पठाण यांच्या मत विभाजनाचा फायदा राणेंना होतो की नाही ते पहावे लागेल. एकूणच पाहता वाद्रेची ही निवडणूक मोठी चुरशीची ठरणार आहे. शिवसेना-भाजपा यांच्यासाठी मोठी कसोटी ठरेल. कारण ही पोटनिवडणूक शिवसेना हरले तर सत्ताधार्‍यांना मोठाच धक्काच असेल व यातून कॉँग्रेसला पुन्हा बळ प्राप्त होईल. या निवडणुकीच्या निमित्ताने मालवणी धूमशानचा प्रयोग पहायला मिळेल.
---------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel