-->
रविवार दि. २९ मार्च २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
राज्यात पुन्हा निवडणूकज्वर
-----------------------------------------------------
एन्ट्रो- राज्यातील बांद्रे व तासगाव या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या जोडीला नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका येथे निवडणुका आल्या आहेत. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही होत असताना राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. राज्यातील या निवडणुक ज्वराविषयी....
--------------------------------------------------------------------- 
राज्यातील बहुतेक भागात आता उष्मा वाढू लागला आहे. मात्र या उष्मातच राजकीय वातावरणही पुन्हा तापू लागले आहे. वांद्रे आणि तासगाव विधानसभेच्या पोटनिवडणुका तसंच नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वंच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजपमध्ये युती झाली तरी खरोखरच मनोमिलन होणार का आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील कलह यामुळे या निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचं कर्करोगाने निधन झालं. ते तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून येत असत. सच्चा, चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांची ओळख होती. सत्तेचे कोणतेही ङ्गायदे न उठवता शेवटपर्यंत सामान्यांसारखं जगणारा हा नेता लोकप्रियतेच्या कसोटीवर अव्वल होता. त्यांच्या निधनामुळे तासगाव विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता. डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात कॉंग्रेसनं उमेदवार दिला; परंतु राष्ट्रवादीनं दिला नाही. आता त्याची परतङ्गेड भाजपने करावी, अशी राष्ट्रवादीची भावना आहे. भाजपचे राज्यस्तरीय नेते राष्ट्रवादीच्या या भावनेशी सहमत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथून आर. आर. यांच्या पत्नी सुमनताईंना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांनी भाजप येथून उमेदवारी देणार नाही असं सांगितलं असलं, तरी भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्षांसह खासदार संजयकाका पाटील, अजित घोरपडे यांना मात्र तासगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपनं लढवावी, असंच वाटतं. भाजपने त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
संजयकाका आणि घोरपडे यांच्यात एकत्र येण्याचं एकमेव कारण आर. आर. होते. आता तेच राहिले नसल्याने दोघांमध्ये दुही निर्माण व्हायला लागली आहे. अर्थात त्याला गेल्या विधानसभा निवडणुकीतील संशयकल्लोळाचं नाट्य कारणीभूत आहे. मागचं नाट्य संजयकाका आणि अजितराव यांच्यात मतभेदाचं कारण व्हायला लागलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचं राज्याच्या राजकारणातील गूळपीठ पाहता आर. आर. यांच्या पत्नी सुमनताई यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्य पातळीवरील भाजपचे नेते संजयकाका आणि अजित घोरपडे यांचं किती ऐकतात, हा खरा प्रश्‍न आहे. आर. आर. यांचा राज्याच्या राजकारणातील प्रामाणिकपणा आणि भाजपच्या दोन नेत्यांमधील प्रामाणिकपणावरून उठलेलं संशयाचं राजकारण हे दोनच मुद्दे तासगाव विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. स्वतः घोरपडे यांनी पोटनिवडणूक लढवणार नाही, असं सांगितलं असलं तरी घोरपडे समर्थक मात्र घोरपडेंनी निवडणूक लढवलीच पाहिजे, असा सूर लावला आहे. त्यांची लढण्याची मानसिकता आणि भाजपच्या वरिष्ठांचा उमेदवार न देण्याचा निर्णय यात काय होतं, घोरपडे-संजयकाका किती आग्रही राहतात, ते बंडखोरीचं धाडस दाखवतात का, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांना संजयकाका, अजितराव यांचं वर्चस्व प्रस्थापित होणं परवडणार नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना आर. आर. यांच्या पत्नीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
वांद्रे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश उर्ङ्ग बाळा सावंत यांचं नुकतंच निधन झालं. या मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मातोश्री हे निवासस्थान आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून सावंत निवडून आले होते. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी ते अर्धसत्य आहे. यापूर्वी या मतदारसंघातून कॉंग्रेसचे जनार्दन चांदूरकर निवडून जात होते. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात पंचरंगी लढत झाली होती. आता या मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असणार नाही. कॉंग्रेसला या मतदारसंघातून उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे नारायण राणे यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची गळ घातली गेली. राणे यांनी पक्षाची विनंती मान्य केली. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून मदत करण्याचं साकडं घातलं. पवार यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्ङ्गे उमेदवार न देण्याचं मान्य केलं. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून दहा हजार मतं मिळाली होती. असं असलं तरी राणे यांच्यापुढे खरं संकट आहे ते एमआयएम या पक्षाचं. गेल्या वेळी या मतदारसंघातून या पक्षाच्या उमेदवाराला २४ हजार मतं मिळाली होती.
शिवसेनेने येथून दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांना उमेदवारी दिली आहे. राणे यांचा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मालवणमध्ये पराभव झाला. त्यांचा मुलगाही लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला. राणे यांचा स्वभाव पाहता त्यांनी निवडून यावं, असं कॉंग्रेसजनांना वाटतं का, हाच खरा प्रश्‍न आहे. अलिकडेच कॉंग्रेसअंतर्गत महत्वाच्या पदांवर अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांची निवड झाली तेव्हा राणे यांनी टीका केली होती. राणे निवडून आले, तर विधानसभेच्या विरोक्षी पक्षनेतेपदावर दावा सांगतील, अशी भीती सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि चव्हाण यांनाही वाटते. चव्हाण, विखे व निरुपम यांच्यांशी राणे कसे जुळवून घेतात, हा प्रश्‍न आहे. त्यातच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरचा दावा राष्ट्रवादीनं अजूनही सोडलेला नाही. अन्य आमदारांना सहयोगी करून आपला पक्ष विधानसभेत सर्वांधिक सदस्य असलेला विरोधी पक्ष आहे, असा दावा राष्ट्रवादी करत आहे. राणे निवडून आले तर कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या आणखी एकानं वाढेल. ते राष्ट्रवादीला चालणार आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यातच राणे यांना पाठिंबा देण्याचं राज ठाकरे यांनी नाकारलं आहे. राणे महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांचं संघटन मजबूत आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात त्यांनी मुंबईतून केली असली तरी वांद्रे मतदारसंघातून निवडणूक जिंकणं तितकंसं सोपं नाही, हे राणे यांनाही माहीत आहे; परंतु रणांगणातून पळ काढणारे नेते म्हणून त्यांची ओळख नाही. लढाऊ नेते ही त्यांची प्रतिमा आहे.
लवकरच निवडणुकीला सामोरी जाणारी नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांच्या ताब्यात आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत गणेश नाईक आणि त्यांचा मुलगा संजीव हे दोघंही पराभूत झाले. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. गावांची थेट महानगरपालिका झालेली तसंच स्वतःचं धरण असलेली ही महानगरपालिका. राष्ट्रवादीत राहायचं की कमळ हाती घ्यायचं याबाबत नाईक यांचं दोन महिने तळ्यात मळ्यात चाललं होतं. आता त्यांनी राष्ट्रवादीत राहण्याचं ठरवलं आहे. या महानगरपालिकेच्या १११ जागा आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेबरोबरच भारतीय रिपब्लिकन पक्षाशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने या भागात चांगलं यश मिळवलं. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या मंदा म्हात्रे यांच्यासाठीही या महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचं नवी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचं स्वप्न आहे. मुंबई, ठाणे महानगरपालिकेबरोबरच नव्या मुंबईवर शिवसेनेचं लक्ष आहे. सेना नेते विजय चौगुले यांच्यावर अलिकडेच एक गंभीर गुन्हा दाखल होऊनही त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन शिवसेनेनं त्यांना दूर केलेलं नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडं नवी मुंबईची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेदरम्यान युती झाली तरी खर्‍या अर्थाने मनोमिलन होते की नाही यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये येथे विळ्या-भोपळ्याचं सख्य आहे. शेतकापही यावेळी या निवड़णुकीत मोठ्या जोमाने उतरत आहे.
मुंबईनंतर महाराष्ट्रात शिवसेनेला सर्वांत अगोदर भगवा ङ्गडकवण्यात यश मिळालं ते औरंगाबादेत. सध्याही या महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता असली, तरी विरोधी पक्षांमध्ये जेवढा वाद नाही तेवढा वाद या दोन मित्रपक्षांमध्ये आहे. दानवे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचं पूर्वी जाहीर केलं होतं. आता त्यांना कार्यकर्त्यांना नवी भूमिका समजावून सांगावी लागणार आहे. दुसरीकडे औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातही शीतयुद्ध आहे. भाजप आणि शिवसेनेतील मतभेद, शिवसेनेतील अंतर्गत नाराजी या वातावरणाचा राजकीय ङ्गायदा उठवण्याची शक्ती कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये नाही. औरंगाबादमध्ये ११३ जागांसाठी २२ एप्रिलला मतदान होत आहे. औरंगाबादवरची सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान शिवसेनेपुढं आहे तर भाजपपुढे जागा वाढवण्याचं. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला इथं मरगळ झटकून उभं राहण्याचं आव्हान पेलावं लागेल. शिवाय सर्व पक्षांना इथे एमआयएमचं आव्हानही पेलावं लागेल. एकंदरीत, राज्यात नव्याने निवडणूकज्वर अनुभवायला मिळत असून त्यातून अनेक नवी समीकरणं जन्म घेण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel