-->
संपादकीय पान बुधवार दि. ०४ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
लष्करी सामर्थ्याचे दर्शन 
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर तसेच सामर्थ्य वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषत: शस्त्रास्त्रनिर्मितीबाबत आपण अधिकाधिक स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर तेजस या हलक्या लढाऊ विमानाचे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणे ही अतिशय महत्त्वाची घटना ठरते. सध्या भारतीय वायूसेनेत प्रशिक्षणासाठी जी विमाने वापरली जातात ती रशियन बनावटीची आहेत. या विमानातच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण द्यावे लागत असे. परंतु अलीकडे भारताने अधिक स्वदेशी तंत्राचा वापर करत विमाननिर्मितीवर भर दिला आहे. जग्वारसारख्या विमानांची निर्मिती हे त्याचे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत भारतात हलक्या लढाऊ विमानांच्या निर्मितीची आवश्यकता समोर येत होती. आपण सध्या परदेशातून विकत घेत असलेल्या कमी वजनाच्या विमानांची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ती विकत घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत आहे. भारताच्या दृष्टीने अशा विमानांची निर्मिती करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. ही विमाने किती उंचीवरून उडू शकतील, वाळवंटी प्रदेशात, कारगिलसारख्या पहाडी प्रदेशात, जम्मू-काश्मीरसारख्या प्रदेशात, अंदमान-निकोबार ही बेटे तसेच अरूणाचल प्रदेश अशी भौगोलिक विविधता असलेल्या ठिकाणीती आपले कर्तव्य चोख बजावतील का, हा खरा प्रश्‍न असतो. ही भौगोलिक विविधता लक्षात घेऊन त्यातील प्रत्येक भागासाठी स्वतंत्र हलक्या लढाऊ विमानांची निर्मिती करणे भारतासारख्या देशाला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे सर्व क्षेत्रांसाठी वापरात येऊ शकेल अशा विमानांची निर्मिती गरजेची ठरते. हे लक्षात घेऊन तेजसचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. या विमानाच्या निर्मितीसाठी १२ ते १५ वर्षांचा अवधी लागला. यासाठी लागलेली जवळपास ४० ते ५० टक्के सामग्री भारतीय बनावटीची आहे. सध्या या पध्दतीचे संपूर्णत: विदेशी विमान खरेदी करायचे तर त्याची किंमत ५०० कोटी रूपये इतकी आहे. अशा वेळी खरेदीनंतर काही कारणांनी हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले तर ५०० कोटी रूपयांचा खर्च वाया जातो. आणखी एक बाब म्हणजे ऐन युध्दाच्या काळात अशा विमानांची निर्मिती करणारे देश विमानांच्या किंमती वाढवतात असा अनुभव आहे. कारगिल युध्दाच्या वेळी भारताला या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. हे टाळण्यासाठी आपल्याच देशात अशा विमानांची निर्मिती महत्त्वाची ठरते. त्या दृष्टीनेही तेजसची निर्मिती हे महत्त्वाचे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. तेजस हे नव्या जमान्यातील लढाऊ विमान आहे. ङ्गार हलक्या वजनाचे असण्याबरोबर या विमानातील इंजिन जास्त सामर्थ्यवान आहे. शस्त्रास्त्रे घेऊन जाणे तसेच उड्डाण करण्याबाबत हे विमान त्याच्या आधीच्या रशियाच्या मिग-२१ या लढाऊ विमानापेक्षा चांगले असल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, हवेत इंधन भरण्याची क्षमता आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता अजून नसली तरी वर्षाच्या अखेरीपर्यंत ती निर्माण केली जाणार आहे. हे स्वदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान असल्याने हवाई दल आणि भारतासाठी ती गोष्ट ऐतिहासिक मानावी लागेल. परदेशांशी सुरक्षाविषयक व्यवहार हे ङ्गार संवेदनशील आणि परस्परसंबंध प्रभावित करण्यापर्यंत असतात. त्याचप्रमाणे असे व्यवहार महागडेही ठरतात. अर्थात आपल्या संरक्षण व्यवस्थेच्या मजबुतीसाठी परदेशी उपकरणांच्या खरेदीपासून पूर्ण बचाव करता येऊ शकत नाही. पण, जो देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित मंगल यान ही ज्या देशाची मोठी उपलब्धी आहे त्याने ठरवले तर सुरक्षेच्या पातळीवर परदेशांवरचे अवलंबित्त्व कमी करु शकेल. त्यादृष्टीने तेजसमुळे केवळ भारताची प्रतिमाच बदलणार नाही तर सुरक्षा क्षेत्रातील स्वदेशीकरणालाही गती मिळणार आहे. रशियाने बनवलेले मिग-२१ हे लढाऊ विमान आता जुने झाले असून त्याची जागा तेजस हे विमान घेणार आहे. स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान बनवण्याच्या प्रकल्पासाठी आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. डीआरडीओ आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या या प्रकल्पावर एकूण  ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च होतील, असा अंदाज आहे. हे विमान एलसीए-एसपी वर्गातील असून अशा प्रकारची विमाने गेल्या ३२ वर्षांपासून हवाई दलात सहभागी होण्याच्या प्रतीक्षेत होती. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी तेजस या विमानाची चाचणी घेण्यात आली होती. या विमानामध्ये सर्व अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. आधुनिक युद्धतंत्रामध्ये आवश्यक असणारी साधनसामग्रीही यामध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या विमानाच्या हवेतल्या हवेत इंधन भरणे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागणे अशा प्रकारच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. तेजसप्रमाणेच मार्च महिन्यापर्यंत स्वदेशी बनावटीची, हलक्या वजनाची आणखी दोन विमाने हवाई दलामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तेजस विमानाने पाच वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जोरदार भरारी घेऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे. तेजस विमानाची लांबी १३.२० मीटर असून त्याचे वजन ५,६८० किलोग्रॅम आहे. शस्त्रास्त्रे ठेवल्यानंतर हे वजन ९,५०० किलोग्रॅम इतके होईल. १.८ मेक असा या विमानाचा सुपरसॉनिक वेग असेल. तीन हजार किलोमीटरपर्यंत हे विमान मारा करु शकेल. हवाई दलाच्या मोहिमा लक्षात घेऊन या विमानामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. समुद्राच्या वरचा भाग, राजस्थानातील वाळवंट, जम्मू-काश्मीर आणि  इशान्येकडील पर्वतीय भागांमध्ये भारतासमोर येणार्‍या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यात हे विमान सक्षम असेल. या विमानाची चाचणी घेण्यासाठी आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक उड्डाणे करण्यात आली. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तेजस विमानाची किंमत सुमारे २०० कोटी रुपये असून ती जगातील अशा प्रकारच्या विमानांपेक्षा सर्वात स्वस्त आहे. हे विमान वेगाने उड्डाण करण्यासाठी ओळखले जाते. तथापि, आधुनिक काळानुसार त्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये असली तरी युद्धासाठी जाण्यास अजून हे विमान पूर्णपणे तयार नाही.  सुमारे १२० तेजस विमाने दाखल करणे हे भारतीय हवाई दलाचे उद्दिष्ट आहे. शत्रूशी लढा देण्यासाठी अशी विमाने शत्रूच्या विमानांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली ठरतील यात शंका नाही.
-------------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel