-->
संपादकीय पान गुरुवार दि. ०५ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
हे तर ईर्र् ऽऽऽ रुग्णालय
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे राज्यातील पहिले ई- हॉस्पिटल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत हा प्रयोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाने अलिबागची निवड केली त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन जरुर करावेसे वाटते. मात्र हे अभिनंदन करीत असताना अगोदर या जिल्हा रुग्णालयात किमान सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे याची जाण सरकारने ठेवणे गरजेचे आहे. अगोदर रुग्णांसाठी चांगल्या आरोग्य सोयी-सुविधा पुरवून नंतर त्याला आधुनिकतेचा टच देण्यासाठी ई रुग्णालयात त्याचे रुपांतर करणे शहाणपणाचे ठरले असते. मात्र सरकारी कारभार हा उलटा सुरु आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची घोर निराशा होते आहे. त्यामुळे सध्या अलिबागचे रुग्णालय हे ई ऽऽऽ रुग्णालय ठरले आहे.  खरे तर या ई ऽऽऽ पणा संपविण्याचे काम प्राधान्यतेने केले पाहिजे. कृषीवलने सहा महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात गैरसोयी कशा आहेत याची एक मालिकाच प्रसिध्द केली होती. मात्र आजवर गेल्या सहा महिन्यात आम्ही जे प्रश्‍न मांडले होते त्यात काडीमात्र सुधारणा झाली नाही वा आम्ही प्रसिध्द केलेल्या बातम्या चुकीच्या आहेत असे सांगण्याची हिंमतही झाली नाही. वाचकांनी आमच्या या मालिकेले भरभरुन पाठिंबा दिला होता. शेकडो रुग्णांची या रुग्णालयात आलेल्या वाईट अनुभवांची आठवण करुन देणारी पत्रे आमच्या कार्यालयात आली होती. त्याला आम्ही प्रसिध्दी दिली मात्र रुग्णालयाचे प्रशासन वा आरोग्य खाते तेरी भी चूप मेरी भी चूप अशा थाटात होते. आता ई रुग्णालयाच्या निमित्ताने येथील सेवांची कशा प्रकारे एैशी की तैशी झाली आहे त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. कोणत्याही जिल्ह रुग्णालयात सर्वात महत्वाची बाब पाहिजे ती म्हणजे सिटी स्कॅन मशिनची सुविधा. हीच सोय या रुग्णालयात उपलब्ध नाही. इकडे पूर्वी असलेले सिटी स्कॅन मशिन हे माणगावला हलविण्यात आले. माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला हे मशिन हलविण्यामागे कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. बरे मशिन माणगावला हलविले असले तरी तेथे ते मशिन चालविणारा तंत्रज्ञ तेथे उपलब्ध नाही. हा तंत्रज्ञ अलिबागला आहे आणि मशिन माणगावला. बरे माणगावला मशिन आहे तर तंत्रज्ञ नाही, अशा फेर्‍यात रुग्णाचे मात्र हाल चालू आहेत. अलिबागच्या रुग्णालयात अत्याधुनिक सिटी स्कॅन मशिन येणार अशी अफवा गेले सहा महिने चालू आहे. हे अत्याधिुनक मशिन कधी येणार याचा पत्ता कुणालाच नाही. सध्या मात्र अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला सिटी स्कॅॅनसाठी वडखळ किंवा पनवेलला जावे लागते. यात पैसे जास्त मोजावे लागतातच शिवाय वेळही जातो. यात रुग्णाचा रोग औषध उपचाराअभावी गंभीर होऊन तो दगाविण्याच धोका वाढतो.प्रामुख्याने अलिबागला अपघात झाल्यावर आलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यावर सिटी स्कॅन मशिनने तपासणी केल्यावर उपचार करावा लागतो. अशा प्रकारच्या पेशन्टचे फारच हाल होतात. सिटी स्कॅन मशिनच्या बरोबरीने या रुग्णालयातील एक्सरे मशिनही गेले आठवडाभर बंद आहे. खरे तर अशा अत्यंत गरजेची मशिन बंद पडणार नाहीत याची खात्री रुग्णालयाने घेणे गरजेचे आहे. येथे असणार्‍या गरम पाण्याचा तर मोठा गंमतीशीर किस्साच आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना गरम पाणी मिळावे व इंधन बचतही व्हावी या हेतूने सौर बंब रुग्णालयाच्या गच्चीवर बसविण्यात आले. अर्थातच ही घटना स्वागतार्ह म्हटली पाहिजे. कारण यातून गरम पाणी मिळणार होते व इंधनाचीही मोठी बचत होणार होती. परंतु कसलेही नियोजन नसले की चांगल्या बाबींचा कसा बोजवार्‍या वाजते हे या रुग्णालयातून शिकावे. रुग्णालयाच्या गच्चीवर सौर बंब बसविल्यावर नंतर लक्षात आले की, पावसाळ्यातील गळती थांबविण्यासाठी गच्चीवर पत्रे घालणेचे आवश्यक आहे. झाले लगेचच पत्रे घालण्यात आले आणि शेवटी गरम पाणी इतिहास जमा झाले. असा हा रुग्णालयाचा कारभार. आता म्हणे गिझर बसविण्यात येणार आहेत. पण मग सौर बंबांसाठी खर्च केलातच कशाला? असा प्रश्‍न उपस्थित होतो. जनतेच्या या पैशाची अशा प्रकारे राख रांगोळी सुरु आहे. येथे रक्त पेढी आहे मात्र रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होत नाही अशी अनेकदा तक्रार असते. शेवटी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त आणण्यासाठी धावपळ करावी लागते. येथील ओ.पी.डी. मध्ये संध्याकाळी अनेकदा डॉक्टरच उपलब्ध नसतात हा रुग्णांना येणारा अनुभव आता नित्याचाच झाला आहे. त्याशिवाय औषधांचा तुटवडा भासणे, रुग्णांची ऑपरेशन वेळेत न होणे व ऑपरेशन झाल्यावर रुग्णांना बाहेरुन औषधे घेऊन येण्याचा आग्रह धरणे या अनुभवांमुळे येथील रुग्ण हैराण होतात. कर्मचार्‍यांच्या प्रामुख्याने नर्सच्या निवासस्थांनी दुर्दशा तर सांगता येणार नाही अशा स्थितीतली आहे. असे हे रुग्णालय सुधारण्याची तातडीने गरज आहे त्या सुधारणा न करता ई रुग्णालय करणे म्हणजे मुर्खपणाच म्हटला पाहिजे. अलिकडेच हे रुग्णालय चांगले केले. त्याची चांगली डागडुजी करण्यात आली. स्पार्टेक टाईल्स बसवून त्याचा दिमाखदारपणा वाढविण्यात आला, त्याबद्दल सरकारला धन्यवाद दिलेच पाहिजेत. आता त्यातील रुग्णांच्या सोयी-सुविधा सुधारण्याची गरज आहे.
---------------------------------------------------------        

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel