-->
संपादकीय पान गुरुवार दि. २६ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
नागरी सेवा परीक्षेचा बदलता चेहरा
------------------------------------
नागरी सेवा परीक्षा म्हणजे आय.ए.एस.चा गेल्या काही वर्षात चेहरामोहरा पार बदलत चालला आहे, ही एक समाधानाची बाब म्हटली पाहिजे. ऐकेकाळी ही परीक्षा म्हणजे एका ठरावीक वर्गाची किंवा समाजाची मक्तेदारी असल्याची स्स्थिती होती. परंतु आता तशी स्थीती राहिलेली नाही आणि सर्व समाजघटकातील मुले आता या परीक्षेत उत्तीर्ण होऊ लागली आहेत. प्रादेशिक भाषेतून ही परीक्षा देण्याची परवानगी मिळाल्यावर १९८९ साली संपूर्ण भारतातून तिसर्‍या क्रमांकाने यशस्वी झालेले भूषण गगराणी यांच्यामुळे या परीक्षेबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वप्रथम चर्चा सुरू झाली. त्याअगोदर अनेक मराठी मुले या परीक्षेत यशस्वी झाली होती. मात्र गगराणी यांचे वेगळेपण असे की त्यांनी ही संपूर्ण परीक्षा मराठी माध्यमातून देऊन हे यश मिळविले होते. गगराणी यांच्यानंतर मराठी माध्यमातून परीक्षा देऊन अनेक अधिकारी यशस्वी झाले. प्रादेशिक भाषा निवडीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली. यानंतर गेल्या काही वर्षांत या परीक्षेची तयारी करून यशस्वी झालेले बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. कारण त्यांना शासकीय नोकरीचे आकर्षण आहे. ही नोकरी आपणास स्थैर्य व प्रतिष्ठा मिळवून देते. तसेच समाजात सन्मान मिळतो यामुळेच मराठवाडा, खान्देश, विदर्भातून अनेक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. तुलनेने विकसित असलेल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण व पुणे, मुंबई, ठाणे या शहरी भागात या परीक्षेविषयी तितकेसे आकर्षण नाही. कारण तेथे खासगी क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत खासगी क्षेत्राला मंदीचा फटका बसल्यामुळे इंजिनिअर, डॉक्टर असलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. त्यामुळे या परीक्षेकडे ग्रामीण भागातील अनेक मुले एक चांगली संधी म्हणून पाहातात. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर अनेक निर्णय घेतले गेले. विभागीय स्तरापर्यंत मार्गदर्शन केंद्रांची निर्मिती झाली. ग्रामीण, निमशहरी व शहरी भागातून अनेक विद्यार्थी या केंद्रात मार्गदर्शन घेऊ लागले. विद्यार्थ्यांच्या निवासाची व मासिक भत्त्याची सोय झाली. आज महाराष्ट्रात कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अमरावती येथे राज्य शासनाकडून स्पर्धा परीक्षा केंद्र चालवली जातात. महाराष्ट्रात या परीक्षांचे मार्गदर्शन करणार्‌या अनेक संस्था जिल्हावार उभ्या राहिल्या. या संस्थांमुळे या परीक्षेबद्दलची सूक्ष्म माहिती सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळू लागली. पूर्वी ही माहिती यशस्वी उमेदवारांना व काही समूहांना या खासगी संस्थांमधून मार्गदर्शन घेऊन यशस्वी होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे. अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय समूहांना मिळणार्‍या आरक्षणामुळेही यशस्वी होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र शासनाकडून राज्य लोकसेवा आयोगाद्वारे होणार्‍या परीक्षेत महिलांना आरक्षणाची तरतूद असल्याने महिलांचे प्रमाण वाढले आहे. मात्र केंद्रीय स्तरावर अशा आरक्षणाची गरज आहे. आज दुर्गम भागातदेखील इंटरनेट, टीव्ही चॅनल्स व वृत्तपत्रे पोहोचल्याने ही परीक्षा देऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सर्वदूर पोहोचली आहे. इंटरनेटचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे. एका बाजूला ग्रामीण भागातील मुलांचा या परीक्षेत वाढलेला टक्का दिसत असला तरी मुस्लिम व महिलांचे लोकसंख्येच्या प्रमाणात या परीक्षेत असलेले स्थान अत्यंत नगण्य दिसते. दरवर्षी अंतिम यादीत मुस्लिमांचे प्रमाण एक ते दीड टक्क्याच्या दरम्यान आहे. मात्र या वर्षीच्या निकालात ते तीन टक्के एवढे झाले आहे. मुस्लिम व महिलांमध्ये या परीक्षेविषयी हवी तेवढी जाणीव-जागृती झाली नाही. पूर्वी अंतिम निकालात एक ते दोन मुली दिसायच्या, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. दरवर्षीच्या अंतिम निकालात दीडशे ते दोनशे मुली उत्तीर्ण होत आहेत. आरक्षण व सामाजिक जाणीव-जागृतीच्या माध्यमातून हे प्रमाण वाढविता येऊ शकते. एकूणच पाहता नागरी सेवा परीक्षेचा चेहरा गेल्या काही वर्षात बदलला आहे. यातून तळागाळातील मुले जर एका जिद्दीने यात आली तर पुढील काळात ते चांगल्या इर्षेने देशसेवा करु शकतील असे वाटते.
--------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel