-->
संपादकीय पान बुधवार दि. २५ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
रुसलेला वरुणराज
-----------------------------
मृग नक्षत्र आता सरले तरी महाराष्ट्रात कुठेही पावसाचा टिपूस नाही. पेरणीसाठी तयार होऊन पडलेली शेते, भकास माळराने व बोडखे डोंगर, पाण्याने तळ गाठलेली धरणे आणि विहिरी, भयंकर दुष्काळाच्या भीतीने हवालदिल झालेला शेतकरी, हे महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातील चित्र आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ २० टक्के पाणी शिल्लक आहे. तो साठा शहरांना आणखी महिनाभरच पुरेल, असा अंदाज आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पिण्याचे पाणी व चार्‍याची अभूतपूर्व समस्या निर्माण होऊ शकते. रायगड जिल्ह्यात भात लागवडीखाली मोठे क्षेत्र येते. सुमारे एक लाख २४ हजार हेक्टर भागात भात लागवड केली जाते. यातील १० टक्के भागात धुळवाफेची तर मोठ्या प्रमाणावर नांगरी पेरणी झालेली आहे. येत्या दोन दिवसात रुसलेला वरुणराज बरसला नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट येणार आहे. मृग कोरडा जाण्याचा अनुभव तसा शेतकर्‍यांना नवा नाही. पण हवामान विभागानेच यंदा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाच आहे. मॉन्सून दाखल झाला खरा; पण त्यात जोर नाही. मध्यंतरी अरबी समुद्रात वादळ आले आणि पावसाळा पुढे ढकलला गेला. माघारी गेलेला हा पाऊस आठवड्याभरात परतेल अशी अपेक्षा होती. मात्र तो काही अजून परतलेला नाही. आषाढी एकादशीला पाऊस येतोच, असा अनुभव असल्याने आता सर्वांच्या नजरा तिकडे लागल्या आहेत. गेले वर्ष वगळता त्यापूर्वीच्या दोन वर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर मागील हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा कोरड्या दुष्काळाचे संकट राज्यावर घोंगावते आहे. कोकणात शेतकर्‍यांनी नेहमीप्रमाणे भातलावणी केली आहे. कोल्हापूर विभागात धूळ पेरणी करण्याचा जुगार खेळला आहे, तर खानदेशात उपलब्ध पाण्यावर कपाशीची लागवड केली. पण मृगाने अंतर दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. नाशिक, मराठवाडा व विदर्भात तर पावसाने शेतकर्‍यांना खरिपाची चाहूलही लागू दिली नाही. येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही तर नाही तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील साठा केवळ महिनाभर पुरणारा असल्याने राज्यातील नागरी भागात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये २०१२ च्या जूनमध्ये केवळ १३ टक्के साठा होता; पण यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने मोठ्या शहरांमधील नागरिकही संभाव्य पाणीटंचाईच्या भीतीने हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमध्ये २० टक्के साठा शिल्लक असला तरी त्यातील २० प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. या प्रकल्पांमध्ये भीमा, उजनी, घोड, मुळशी (पुणे), टेमघर, पुणेगाव, पालखेड, मुकणे, भावली, वाघाड, तिसगाव (नाशिक), पोथरा (भंडारा), बाघ कालीसरार (भंडारा), सीना वेळेगाव, निम्न तेरणा (उस्मानाबाद), मांजरा (बीड), पूर्णा सिद्धेश्‍वर (परभणी), वैतरणा (ठाणे), विहार (मुंबई) यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीत १२ हजार कोटी रुपये राज्य शासनाने खर्च केले होते. आता पुन्हा राज्यात दुष्काळी चित्र निर्माण होते की काय, अशी परिस्थिती असल्याने प्रशासन धास्तावले आहे. दुसरीकडे राज्यात टँकरने पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. १ हजार ४६४ गावे, ३ हजार ६८७ वाडयांवर १ हजार ४५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धरणांमधील पाणीसाठाही कमीकमी होत आहे. राज्यातील धरणांमध्ये आता सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे. त्यात मोठया, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा समावेश आहे.  मोठया धरणांचा विचार करता कोकणात ३४ टक्के, मराठवाडयात २५ टक्के, नागपूर विभागत ४६ तर अमरावती विभागात ३६ टक्के, नाशिक १४ टक्के, पुणो १३ टक्के  असा जलसाठा शिल्लक आहे. यावेळी हवामान खात्याने अल् निओच्या संकटाचा इशारा देऊन पाऊस कमी पडेल असा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजावर अनेकदा विश्‍वास ठेवणे कठीण असते. मात्र यावेळी त्यांचा हा अंदाज खरा ठरणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. शेतीचे यंदाचे आपत्कालीन नियोजन शेतकर्‍यांना समजावून सांगण्यात व त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याचा फारसा प्रयत्न अद्याप झालेला नाही. पावसाची समस्या अधिक उग्र झाल्यास शेतकर्‍यांना हंगाम वाचविण्यासाठी पीकबदल करणे अपरिहार्य होणार आहे. यासाठी बियाणे व खत पुरवठाही महत्त्वाचा आहे. सद्यःस्थितीत कृषी विभागाने संभाव्य आपत्ती ज्या भागात जास्त तीव्र असू शकेल, त्या ठिकाणी गावोगावी जागृती करण्यास प्रथम प्राधान्य द्यायला हवे. तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावात काय परिस्थिती उद्भवू शकते, तुमचा शेतावरील पाऊस अंदाजे कसा असेल आणि त्यानुसार कोणती पिके घ्यावीत, हे कृषी विभागाने शेतकर्‍यांपुढे मांडायला हवे. मात्र, सध्या सर्व यंत्रणा संभाव्य आपत्तीकडे स्तब्धपणे पाहत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय पातळीवरूनही अद्याप नियोजनाचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे फारशा हालचाली झालेल्या नाहीत. ही मरगळ झटकायला हवी. येत्या तीन-चार महिन्यांत पाणी साठवण, भूजल पुनर्भरण आणि काटेकोर पाणी वापराचे आव्हान आपण कसे पेलतो, यावर त्या पुढील आठ महिन्यांचे भवितव्य ठरणार आहे. फक्त शासनावर विसंबून न राहता शेतकरी व नागरिकांनाही पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी, साठविण्यासाठी, जिरविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
-------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel