-->
संपादकीय पान बुधवार दि. २५ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
नारायणरावांच्या गुजरातवरील टीकेचा अर्थ
--------------------------------------
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुजरात सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. ही टीका काय आहे ते आपण नंतर पाहू. मात्र नारायणरावांनी गुजरात सरकारवर केलेल्या या टीकेचा अर्थ स्पष्ट आहे की, नारायण राणे हे भाजपामध्ये जाणार नाहीत. याचा अर्थ ते कॉँग्रसेमध्येच राहाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ. निलेश राणे यांचा दारुण पराभव झाल्यावर राणे कॉँग्रेस पक्षावर तसेच सहकारी पक्ष राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज झाले होते. यातून ते कॉँग्रेस पक्ष सोडून भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. परंतु त्यांना जसे कॉँग्रेसमध्ये शत्रू आहेत तसेच भाजपामध्येही त्यांचा प्रवेश होऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्नशील होते. त्यातून राणेंच्या भाजपा प्रवेशात अनेकांनी खोडा घातल्याच्या बातम्या होत्या. ते खरे देखील होते. आता मात्र त्यांनी नरेंद्र मोदींच्या गुजरातवर व तेथील मॉडेलवर टीका केल्याने ते काही भाजपात जात नाहीत हे स्पष्ट झाले आहे. अर्थात नारायण राणे बोलले ते काही खोटे बोललेले नाहीत. यापूर्वी देखील त्यांनी गुजरात सरकारच्या विकासाच्या भोपळा फोडून वास्तव जनतेपुढे मांडले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी वस्तुस्थिती जनतेपुढे मांडली आहे. गुजरातच्या विकासाचा नेहमी डांगोरा पिटला जातो. पण राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाच्या कर्जाचे प्रमाण गुजरातमध्ये २६ टक्के असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण १७ टक्के आहे. आणखी एक टक्का कर्जाचे प्रमाण वाढल्यास गुजरात दिवाळखोरीत निघेल, असे नारायण राणे म्हणतात ते खरेच आहे.  उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचा दावा करत गुजरातच्या विकासाच्या दाव्याचा फुगाच फोडला. महाराष्ट्राचे एकूण स्थूल उत्पन्न १३ लाख ७० हजार कोटी असताना गुजरातचे उत्पन्न निम्मे म्हणजे सहा लाख ७२ हजार कोटी आहे. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी ४८ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. शिक्षण, साक्षरता, मानवी विकास निर्देशांक आणि दरडोई उत्पन्न या सार्‍यांमध्येच गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. ही सारी आकडेवारी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. राज्यात कामगारांना सरासरी २०० ते २५० रुपये उत्पन्न मिळते. गुजरातमध्ये ते फक्त ६० रुपये आहे. मग गुजरात महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर कसा, असा सवालही राणे यांनी केला. उद्योगधंदे वाढावेत व पर्यायाने रोजगाराच्या संधी वाढाव्यात म्हणून राज्य शासन प्राधान्य देते. उद्योगांसाठी नव्या धोरणांमध्ये उद्योगांना विविध सवलती देण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रे, अन्नप्रक्रिया आणि किरकोळ उद्योग या क्षेत्रांसाठी सरकार लवकरच नवीन धोरण जाहीर करणार आहे. या नव्या धोरणांमुळे उद्योगांना चालना मिळेल हे खरेच आहे. चांगला नफा मिळाल्याशिवाय उद्योजक कारखाने सुरू करण्यास तयार होत नाहीत. याशिवाय सुरक्षा महत्त्वाची असते. म्हणूनच सरकारने अधिकाधिक पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळांच्या वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तीन हजार कोटी खर्च करण्यात आले. उद्योजकांना महिनाभरात परवानग्या देण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात याला पर्यावरण परवानगीचा अपवाद आहे. एकूणच पाहता नारायण राणे यांनी राज्याची वस्तुस्थितीपूरक अशी तुलना गुजरातशी केली आहे. अर्थात हे करीत असताना त्यांचा मुक्काम आता अन्य कोणत्याही पक्षात हलणार नाही हे देखील अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. अलिकडेच झालेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वार्‍यात नारायणराव आघाडीवर होते. परंतु आता राज्यात पृथ्वीराज चव्हाणच राहाणार हे नक्की झाले आहे आणि ही वस्तुस्थिती राणेंनी मान्य केली असावी, असेच त्यांच्या या ताज्या भाषणांवरुन दिसते.
-----------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel