-->
संपादकीय पान मंगळवार दि. २४ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
पृथ्वीराजबाबांना अभय
------------------------
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत आपल्या पदावर कायम राहातील असे कॉँग्रेसच्या वर्तुळातून स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकांचे खापर मुख्यमंत्र्यावर फोडून त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचे काम त्यांच्याच मंत्रिमंडळातील असंतुष्ट सहकार्‍यांनी चालविले होते. केंद्रात सत्ता गमावल्याने हतबल झालेले कॉँग्रेसचे नेते महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातील सत्ता जाऊ नये यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयापर्यंत आल्याची चर्चा होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली व त्यानंतर काहींसे फासे फिरल्याचे दिसते. मुख्यमंत्रीपदाचे कायमचे उमेदवार म्हणून ओळखले गेलेले पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे यांची नावे पुन्हा चर्चेत येऊ लागली. कॉँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असावा यासंबंधी सर्वस्वी निर्णय कॉँग्रेसचे केंद्रीय नेवृत्व घेत असले तरीही सहकारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मतही विचारात घेणे हे ओघाने येतेच. मात्र कॉँग्रेसचे नेतृत्व शरद पवारांच्या कोणत्याही दबावाला बळी पडत नाही, हे आजवर सिध्द झाले आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याचा आग्रह धरल्याने खरे तर पृथ्वीराजबाबा जाणार नाहीत हे पक्के झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटविले नाही, तर राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ आहे, अशी वावटळ निर्माण करण्यात आली. जागावाटपात मोठा वाटा मिळविण्याकरिता, सरकारमधून बाहेर पडण्याचा बागुलबुवा दाखवत दबावतंत्राचा गुळगुळीत झालेला प्रयोगही राष्ट्रवादीने करून पाहिला. पण या वादातून यशाचा मार्ग सोपा होणार नाही हे वेळीच उमगल्याने तो डावही बारगळला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीनंतर राज्यात एकहाती सत्ता आपल्या हातात यावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरश: जिवाचे रान करीत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराजयाने पक्षाला राज्यातील आपली जागा कळून चुकली. आता अस्तित्वाची सारी लढाई महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानातूनच लढावी लागणार आहे. त्यामुळे, कॉंग्रेसमधील असंतुष्टांच्याच हातून पक्षाच्या शक्तिस्थळांवर प्रहार करण्यासाठी कॉंग्रेसमध्ये नेतृत्वबदल घडविण्याच्या पक्षांतर्गत हालचालींना बळ देणे गरजेचे होते. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्याखेरीज कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील शक्तीला सुरुंग लावणे अवघड असल्याचे लक्षात येताच, मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना पुढे करून नेतृत्वबदलाच्या मोहिमेला खतपाणी घालण्याचे प्रयत्नही सुरू झाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा डाग धुऊन काढण्यासाठी अधिक सक्षम नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुका लढविल्या पाहिजेत आणि शरद पवार हेच एकमेव सक्षम नेते आहेत, असे भासविण्याचा प्रयत्नही सुरू झाला. महाराष्ट्रातील सत्ता हेच पक्षाच्या अस्तित्वाचे आशास्थान असल्याने, नेतृत्वबदलाच्या मोहिमांची खेळी कुठे सुरू झाली हे समजण्याएवढे शहाणपण कॉंग्रेसच्या नेतृत्वाकडे आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली मोहिमेतून स्पष्ट झाले. येत्या जेमतेम दोन महिन्यांत राज्यात नेतृत्वबदल करून कोणताही नेता जादूची कांडी फिरवू शकणार नाही, एवढा पक्का निर्णय कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केला असणार. त्यातच आगामी निवडणूक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली लढवावी व राष्ट्रवादी कॉँग्रेस आय. कॉँग्रेसमध्ये विलीन करावी असा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा होती. शरद पवार आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व संपवतील अशी काही शक्यता दिसत नाही. खरे तर सध्या कॉँग्रेसमध्ये विलिन होण्यासाठी पोषक वातावरणही नाही. त्यामुळे शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवून ते आपल्या पक्षाचे अस्तित्व संपवतील असे म्हणणे मुर्खपणाचेच आहे. त्यामुळे हा प्रस्ताव म्हणजे अगदीच अळवावरचे पाणी ठरणार होते. गेले साडेतीन वर्षे मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण आलेल्या दिवसापासून ते चालले अशी चर्चा व अफवा नेहमीच्याच होत्या. तसे पाहता कॉँग्रेसचा कोणताही मुख्यमंत्री हा आलेल्या दिवसापासून आपली कधीही उचलबांगडी होणार ही खूणगाठ बांधून आपले बस्तान तयार ठेवूनच असतो. इंदिरा गांधींच्या काळात तर दिल्लीला मुख्यमंत्र्याला बोलाविले की त्याच्यात धडकीच भरीत असे. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाबाबत असलेला दरारा व भीतीयुक्त वचक अशातून मुख्यमंत्री घाबरत असत. आता तशी परिस्थिती राहीली नसली तरीही केंद्रीय नेतृत्वाबद्दल भरवसा कोणताच मुख्यमंत्री देऊ शकत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात शांतपणाने आपले दिलेले काम चोख करीत असताना त्यांना त्यांच्या मनाविरुध्द राज्यात पाठविण्यात आले. अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यात अडकल्याने त्यांना मुक्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला एक स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री आणण्याची गरज भासू लागली होती. त्यावेळी देखील आज जे मुख्यमंत्री बनण्यासाठी बाशींग बांधून तयार आहेत त्यांचीच नावे पुढे होती. मात्र त्यातील कुणाला मुख्यमंत्री करुन कॉँग्रेसमधील एका गटाचे समाधान करण्याऐवजी सोनिया गांधींनी पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात पाठविण्याचा निर्णय घेतला. यामागे जी अनेक कारणे होती त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याच्या अत्यंत विश्‍वासातले म्हणून त्यंाची ओळख होती. त्याजोडीला त्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ होती. आजवर केंद्रात पंतप्रधानांसारख्या महत्वाच्या कार्यालयात काम करीत असूनही त्यांच्यावर एकही साधा भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता. उच्चशिक्ष़ण व कॉँग्रेसची त्यांची पिढीजात असलेली निष्ठा त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. राज्यातील राजकारणात त्यांना रस नसल्याने त्यांचा कोणताच गट नव्हता. त्यामुळेे पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या दाटणीत कारभार सुरु केला. प्रत्येक फाईलीवर सह्या करताना त्यांनी नियमाचे उल्लंघन होणार नाही याचा कटाक्ष ठेवला. मात्र यातून सत्ताधारी आघाडीतील सर्वच आमदार नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी काही फार मोठ्या धडाडीने काम केले नाही. मात्र जे काम केले ते नियमाच्या चौकटीत केले. त्यामुळे त्यांचंी प्रतिमा स्वच्छ राहिली. आता प्रश्‍न उरतो आगामी निवडणुकांचा. आचारसंहिता लागू होण्यास आता जेमतेम ७० दिवस उरले आहेत अशा वेळी नवीन मुख्यमंत्री कोणीही आणला तरी फारसा काही मोठा क्रांतीकारी बदल घडूच शकत नाही. त्यामुळे यावेळी पृथ्वीराजबाबा असोत किंवा नसोत सत्ताधार्‍यांचा पराभव नक्की आहेच.
-----------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel