-->
संपादकीय पान मंगळवार दि. २४ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
मोठ्या शहरांची वाढत चाललेली उपनगरे
------------------------------------
आपल्या देशातील शहरांप्रमाणे त्याची उपनगरे व त्याजोडीला ग्रामीण भागातही झपाट्याने बदल होत चालले आहेत. अर्थात हे बदल होणे अपेक्षितच होते. २००१ व २०११ या काळातील जनगणणेचा आढावा घेतल्यास हे झालेले बदल आपल्याला प्रकर्षाने जाणवतील. मुंबई, कोलकाता व दिल्ली या तीन प्रमुख शहरातील लोकसंख्या कमी होऊन त्यांची उपनगरे झपाट्याने वाढली आहेत. हैदराबाद व चेन्नई या शहरात मात्र काही प्रमाणात लोकसंख्या वाढली असली तरी त्यांची उपनगरे मात्र वाढली आहेत. मुंबई, दिल्ली व कोलकाता या शहरातील मुख्य भाग वाढण्यात आता मर्यादा आहे. तसे मात्र हैदराबाद व चेन्नईतील स्थिती नाही. हे शहर अजूनही वाढू शकते. मुंबई शहराची लोकसंख्या आठ टक्क्‌यांनी कमी झाली. तर मुंबईच्या उपनगराची लोकसंख्या आठ टक्क्‌यांनी, ठाण्याची ३६ टक्क्‌यांनी तर रायगडची १९ टक्क्‌यांनी या दशकात वाढली. नवी दिल्लीची लोकसंख्या २१ टक्क्‌यांनी कमी झाली तर दिल्लीची उपनगरे असलेल्या गुरगावची लोकसंख्या ७३ टक्क्‌यांनी वाढली, फरिदाबाद ३३ टक्क्‌यांनी, गझियाबादची ४१ टक्क्‌यांनी व नॉयडाची लोकसंख्या ४९ टक्क्‌यांनी वाढली आहे. ही आकडेवारी पाहिल्यास देशातील प्रमुख शहरे वाढण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. देशातील कोणतीही प्रमुख शहरे ही आता महाग होत चालली आहेत. मुंबई, दिल्लीसारख्या शहरात जागंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना या शहरात घर घेणे ही आवाक्यातील बाब राहिलेली नाही. त्यामुळे गेल्या दशकात या शहरांना जोडून असलेली उपनगरे वाढली. या शहरात राहणे लोकांना परवडणारे नसल्याने त्यांनी आपला मोर्चा उपनगरात वळविला. तसेच ग्रामीण भागातून रोजगारासाठी येत असलेला लोंढाही या उपनगरात भर टाकू लागला. याच्या जोडीला आपल्याकडे गेल्या दोन दशकात विभक्त कुटुंब पध्दती जोर धरु लागली. अशा वेळी शहरात ज्यांच्या जागा होत्या त्या त्यांनी विकून उपनगरात मोठ्या जागा घेऊन किंवा दोन जागा घेऊन भावडांनी स्वतंत्र संसार थाटले. याचा परिणाम असा झाला की, उपनगरातील लोकसंख्या वाढली. मुंबईत शहरातून मराठी मध्यमवर्ग माणूस बाहेर म्हणजे विरार किंवा डोंबिवलीला हलला यामागचे विभक्त कुटुंब पध्दती हे एक महत्वाचे कारण ठरले. मराठी माणूस शहरातून हद्दपार झाला याची बोंब मारणे निरर्थक होते. कारण त्याला तशी आर्थिक, सामाजिक स्थिती कारणीभूत होती. एकेकाळी मुंबईचा कर्ताकर्विता म्हणून ओळखला गेलेला गिरणी कामगार अशाच आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी या शहराबाहेर फेकला गेला. अर्थात त्याला त्यावेळी जर सरकारी पातळीवर पाठबळ मिळाले असते तर तो मुंबापुरीत टिकलाही असता. मात्र त्यावेळी कॉँग्रेसच्या सरकारने गिरणी मालकांच्या बाजूने म्हणजेच भांडवलदारांची बाजू घेतली. यातून हा कामगार केवळ मुंबईच्या शहरातूनच नव्हे तर आयुष्यातून पार उद्धवस्त झाला. सरकारने सुरु केलेल्या नव्या आर्थिक नितीनुसार, देशाचा चेहरा मोहरा बदलत गेला. देशात झपाट्याने मध्यमवर्ग वाढला. त्यापूर्वी मात्र मध्यमवर्ग हा तसा पाहता गरिबच होता. फक्त तो गिरगावातल्या किंवा पार्ल्यातल्या चाळीत राहात होता. पु.ल. देशपांडेच्या बटाट्याची चाळमध्ये रेखाटलेल्या व्यक्ती या सर्व त्या काळातील मध्यमवर्गीय समाजातीलच होत्या. आता शहरे बदलत असताना एकीकडे श्रीमंत, गर्भश्रीमंत यांच्या बरोबरीने नवमध्यमवर्ग जन्माला आला आहे. या नवमध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा मोठ्या आहेत. अलिकडे झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये याच मध्यमवर्गाने मोदींच्या प्रचाराला भूरळ पाडून मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान केले आहे. आजवर हा मतदार मतदानाला जाणे टाळत असे. या मध्यमवर्गाने कोणाला मतदान करायचे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु रेल्वेची असो किंवा गॅसची दरवाढ याला पहिला विरोध हा याच वर्गातून होणार आहे. म्हणजेच हा वर्ग आपल्या खिशाला चिमटा लावून घेण्यास तयार नाही. असा हा मध्यमवर्ग शहरातून बाहेर फेकलेला मोठ्या संख्येने आहे. काळाच्या प्रवाहातील हा एक महत्वाचा टप्पा आहे.
   
     

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel