-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २० जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
बिहारमधील राजकीय अस्वस्थता
----------------------------------------------------------------          
बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी आपले गुरू नितीशकुमार यांनाच आव्हान दिले आहे. आता हे नाट्य कोणत्या वळणावर येऊन संपेल हे सांगणे अवघड आहे. नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाची बिहारमध्ये भाजपाशी युती होती. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका या दोन पक्षांनी एकत्र लढवल्या. नंतर दोघांनी मिळून सत्ताही स्थापन केली. दरम्यान, भाजपप्रणित आघाडीत असणार्‍या नितीशकुमार यांनी वेळोवेळी नरेंद्र मोदींच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. अशा परिस्थितीत भाजपाने लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले. हा निर्णय नितीशकुमारांना रूचणे शक्यच नव्हते. अखेर त्यांनी भाजपाशी काडीमोड घेतला. अर्थात त्याचा नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदावर वा त्यांच्या पक्षाकडे सत्ता असण्यावर ङ्गारसा परिणाम झाला नाही. लोकसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.परंतु हे करताना सत्तेवरील आपली मांड पक्की रहावी यासाठी राजकारणातील आपले शिष्य मांझी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. हे करण्यामागे दोन हेतू होते. एक तर मांझी यांच्या रूपाने एक दलित व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून आपण दलितांचे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे आणि दुसरा हेतू म्हणजे भाजपाला नाकारून पुरोगामित्त्वाचा ढोल बडवत रहायचे. असे असले तरी नैतिकतेचा आव आणणार्‍या नितीशकुमार यांनी चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेल्या लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी केली. एवढेच नव्हे तर आपला जनता दल युनायटेड हा पक्ष लालूप्रसादयादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात विलीन करण्याचा प्रस्तावही दिला. यातून त्यांचा दुसरा चेहरा समोर आला आणि या नाट्यातून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार्‍या नितीशकुमारांना आता स्वत:च्या पक्षाची सत्ता कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
मुख्यमंत्रीपदी बसवलेले आपले शिष्य मांझी आपल्या म्हणण्याप्रमाणे कारभार करतील असा नितीशकुमारांना विश्‍वास होता. परंतु सध्याच्या राजकारणात विश्‍वास, निष्ठा या गोष्टी कधीच बाजुला पडल्या आहेत. राहिले आहे ते ङ्गक्त सोयिस्कर राजकारण. अर्थात, हे नितीशकुमार यांच्या लक्षात आले. परंतु त्याला उशीर झाला होता. मांझी हे नितीशकुमारांना विश्‍वासात न घेता निर्णय घेऊ लागले. शिष्य डोईजड होत असल्याचे दिसल्यावर त्याला मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचे नितीशकुमारांचे प्रयत्न सुरू झाले. हे लक्षात येताच एका महादलित मुख्यमंत्र्यावर अन्याय केला जात आहे अशी हाकाटी मांझी यांनी दिली. एवढेच नव्हे तर, आपण सहजासहजी मुख्यमंंत्रीपद सोडणार नाही, हे ही स्पष्ट केले. या सार्‍या घडामोडी भाजपाच्या पथ्यावर पडणार्‍या ठरल्या. बिहारमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण मुख्यमंत्रीपदी असणे आवश्यक असल्याचे नितीशकुमारांना वाटले. सध्या मांझी भाजपाची मदत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, मांझी यांनी नितीशकुमार यांचे समर्थक असणार्‍या मंत्र्यांना बडतर्ङ्ग करतानाच विधानसभा विसर्जित करण्याची शिङ्गारस राज्यपालांना केली. दुसरीकडे, बिहारमधील जनता दल युनायटेडच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नितीशकुमार यांची निवड करण्यात आली असून त्यांनी सरकारस्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रीय जनता दल, कॉंगे्रस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एकूण १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा नितीशकुमार यांचा दावा आहे. सध्याचा पेचप्रसंग सोडवण्याच्या दृष्टीने राज्यपाल बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिङ्गारस केंद्र सरकारला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुका राष्ट्रपती राजवटीच्या कालखंडात पार पडतील. असे होणे भाजपासाठी सोयीचे ठरणार आहे. दुसरीकडे सध्याची स्थिती लक्षात घेता जनता दल युनायटेड या पक्षात ङ्गूट पडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मांझी यांचा गट जनता दल युनायटेडमधून ङ्गुटून वेगळा झाल्यास त्याला भाजपाचे पाठबळ मिळेल असे दिसते. कारण काहीही झाले तरी बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. शत प्रतिशत भाजपा या घोषणेला दिल्लीत हादरा बसला. ती कसर बिहारमध्ये भरून काढण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. परंतु भाजपाला बिहारमध्येै निवडणूक सोपी जाणार नाही. अगोदर युती करून नंतर काडीमोड घेत भाजपाला धक्का देणार्‍या नितीशकुमारांना धडा शिकवण्यासाठी भाजपा शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात कसूर ठेवणार नाही. परंतु या सार्‍यात बिहारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होऊन त्याचा परिणाम सरकारी कारभारावर होणार त्याचे काय? बिहार विधानसभेच्या एकूण २४३ सदस्यांमध्ये जनता दल युनायटेडची सदस्य संख्या ११५ इतकी आहे. भाजपाचे ८८ सदस्य असून राष्ट्रीय जनता दलाचे २४ सदस्य आहेत. कॉंग्रेस-५, भारतीय कम्युनिस्ट पक्ष-१ आणि अपक्ष पाच अशी अन्य संख्या असून पाच जागा रिक्त आहेत. मांझी यांची कारकिर्दही वादग्रस्त राहिली आहे. अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळून मांझी यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अडचणीत आणले. त्यानंतर त्यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. तरिही त्यांनी भाजपाशी संपर्क सुरूच ठेवला. या बाबी मांझी आणि नितीशकुमार यांच्यातील संघर्षासाठी कारणीभूत ठरल्या. दलित आणि आदिवासी लोकच मूळ निवासी असून उच्चवर्णीय हे परदेशातून आले आहेत हे मांझी यांचे विधान चांगलेच वादग्रस्त ठरले. या वक्तव्यामुळे मांझी यांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत. आता हे मांझी पुढे कोणती रणनिती आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर बिहारच्या सत्तेसाठी कशी जंग छेडली जाते, हे पाहणे रंजक ठरेल. एकंदरीत, बिहारमधील राजकारणाचा हा नवा अध्याय सार्‍यांनीच लक्षात घेण्यासारखा आहे.
--------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel