-->
खासगी आयुष्य व राजकारण

खासगी आयुष्य व राजकारण

रविवार दि. 19 नोव्हेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
खासगी आयुष्य व राजकारण
---------------------------------------------
एन्ट्रो- काही सेलिब्रेटी तर आपल्याविषयी अशा प्रकारच्या चर्चा, गॉसिप रंगविण्यासाठी विशेष जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. मात्र राजकारण्यांचे थोडे वेगळे आहे. जरी त्यांचे एखादे प्रकरण हे त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत आहे असे आपण जरी म्हटले तरीही राजकारण्यांना खासगी आयुष्य व जनमानसातील त्यांची प्रतिमा ही वेगळी करणे कठीण असते. त्यांच्या खासगी आयुष्यात लोकांनी डोकावणे हे चुकीचे असले तरीही त्यांच्या अशा प्रकरणांची चर्चा रंगते व पर्यायाने त्यांची बदनामी ही होतेच. अनेकदा राजकारणात त्यांची बदनामी करण्यासाठी व राजकारणातून त्यांचे अस्तित्व संपविण्यासाठी विरोधक अशा हत्यारांचा चांगलाच वापर करुन घेतात. त्यामुळे अशी प्रकरणे आपल्यामागे चिकटू नयेत यासाठी राजकारणी प्रयत्नशील राहणे आवश्यक ठरते...
--------------------------------------------
गुजरातमधील निवडणुकांचे राजकारण आता तापू लागले आहे. सोमवारी युवा नेता हार्दिक पटेल यांची एका तरुणीबरोबरचे लागोपाठ दोन व्हिडिओ व्हारयल झाल्याने या राजकारणाला आता गलिच्छतेची एक किनार लागली आहे. अर्थातच हे राजकारण भाजपा करीत आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. अर्थात ही सीडी पाहिल्यावर त्यात अश्‍लिल असे काही दिसत नाही. मात्र एखाद्याची बदनामी करण्यासाठी एखादी अशा प्रकारची सीडी पुरेशी असते. अशा प्रकारची आपली सीडी येणार आहे, असा अंदाज हार्दिक पटेलने यापूर्वीच व्यक्त केला होता. याचा अर्थ भाजपा कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज हार्दिक पटेल यांना आहे. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण गुजरातमध्ये यापूर्वीही संघाचे कार्यकर्ते संजय जोशी यांच्याबाबतीत घडले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्रभाईंचे कडवे विरोधक म्हणून ओळखल्या गेलेल्या संजय जोशी यांची अशीच अश्‍लिल सीडी त्यावेळी गुजरातभर आली होती. यानंतर संजय जोशी सारख्खा एका संघाच्या सच्चा कार्यकत्याची पूर्ण बदनामी झाली. त्यानंतर संजय जोशी हे राजकारण व समाजकारण यातून लूप्त झाले. मात्र याची पुनरावृत्ती हार्दिक पटेल यांच्यासंदर्भात होणार नाही. कारण आता हार्दिक पटेल यांच्यामागे मोठा समाज आहे व युवा नेता म्हणून त्यांना मान्य केलेले आहे. अशा प्रकारे आपल्याविरुध्द कुभांड रचली जात आहेत याची पूर्व कल्पना दिल्याने गुजराती जनतेलाही त्याचा अंदाज होता. यातून एक अर्थ स्पष्ट निघतो की, गुजरातमधील निवडणूक आपल्यासाठी सोपी नाही हे भाजपाला समजले आहे. ती जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे. भाजपविरोधात गुजरातेत निर्माण झालेला असंतोष सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून गेले काही दिवस सातत्याने व्यक्त होत आहे. विकास वेडा झाला ही कॉग्रेसची कॅचलाईन आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळेच भाजपला गुजरातेत सर्वशक्तिनिशी प्रयत्न करावे लागत आहेत. एकीकडे राहुल यांच्या संवादी सभांना मिळणारा प्रतिसाद बघता ज्याला आपण पप्पू म्हणून हिणवले तोच आपल्याला मोठे आव्हान देत आहे, याची खंत भाजपाला लागली आहे. राहुल यांनी या वेळी एकाच वेळी अत्यंत आक्रमक, तर दुसरीकडे कमालीची संयमी अशी आपली प्रतिमा या प्रचारमोहिमेच्या निमित्ताने उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप व मोदी यांच्यावर टीका जरूर करायची आहे; मात्र तसे करताना पंतप्रधानपदाचा अवमान होणार नाही, याची खबरदारीही घ्यायची आहे, हा राहुल यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिलेला सल्ला त्यांच्यातील एका परिपक्व राजकारण्यची साक्ष देतो. त्याचबरोबर विरोधी पक्षात असताना, भाजप नेते तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग असताना पंतप्रधानपदाचा अवमान आणि टिंगलटवाळी करत होते, हे निदर्शनास आणून देऊन राहुल यांनी आणखी एक वार भाजप व मोदी यांच्यावर केला आहे. यावेळी गुजरातच्या राजकारणात तरुण आघाडीवर आहेत, ही एक त्यातील जमेची बाजू म्हटली पाहिजे. हार्दिक पटेल यांच्या व्हिडिओच्या निमित्ताने राजकारणातील लोकांना काही खासगी आयुष्यच नाही का असा सवाल उपस्थित होतो. भारतीय संस्कृतीचा आव आणीत अशा प्रकारे आपल्या पक्षातील असो किंवा पक्षाबाहेरील प्रतिस्पर्धी राजकारण्यांना बदनाम करणे चुकीचेच आहे. प्रत्येकाला त्याचे खासगी आयुष्य आहे व ते जगण्याचा अधिकार आहे. त्यातच जर एखाघ्या नामवंत माणसाने आपल्या वैवाहिक जिवनात विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्याची चर्चा ही होतेच व तशी चर्चा होणे ही देखील स्वाभाविक आहे. मात्र अशा स्थितीत त्यांच्या घरुन जर त्या संबंधांना मान्यता असली तर जनतेलाही त्यात रस घेण्याचे काही कारण नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हार्दिक पटेलचे वय हे केवळ 24 वर्षे आहे व तो विवाहीत नाही. अशा स्थितीत त्याची बदनामी करणे हे पूर्णत: चुकीचे ठरते. कॉग्रेसचे एक ज्येष्ठ नेते व आंध्रप्रदेशाचे माजी राज्यपाल नारायण दत्त तिवारी यांची अशीच एक सीडी प्रसिद्द झाली होती. परंतु त्यांचे वय पाहता व त्यांच्यावर आजवर यासंबंधी झालेले आरोप पाहता त्यांचे हे वर्तन चुकीचेच होते. आपण अमेरिकन व्यवस्था ही मुक्त असल्याचे मानतो. मात्र अशा या मुक्त वातावरणातही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जर विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्यावर टीका होते, हे आपण मोनिका लुईन्स्की प्रकरणात अनुभवले आहे. तर आपल्यासारख्या देशात तर अशी प्रकरणे बाहेर आली तर त्याची चर्चा, गॉसिप आणखीनच जोरदार रंगतात. सध्या मोबाईलमधील कॅमेरा असो किंवा साध्या शर्टाच्या बटणातही लपविता येणारा कॅमेरा यामुळे कुणालाच खासगी आयुष्य राहिलेले नाही. अशा स्थितीत सेलिब्रीटी व राजकारण्यांनी खबरदारी बाळगणे आवश्यक ठरते. सेलिब्रेटींना यातून वगळता येऊ शकते कारण त्यांच्या मागे असे एखादे प्रकरण लागले तर त्यांना त्यासाठी मिळणार्‍या फुकटच्या प्रसिद्दीमुळे ते खूषच असतात. त्यामुळे काही सेलिब्रेटी तर आपल्याविषयी अशा प्रकारच्या चर्चा, गॉसिप रंगविण्यासाठी विशेष जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. मात्र राजकारण्यांचे थोडे वेगळे आहे. जरी त्यांचे एखादे प्रकरण हे त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत आहे असे आपण जरी म्हटले तरीही राजकारण्यांना खासगी आयुष्य व जनमानसातील त्यांची प्रतिमा ही वेगळी करणे कठीण असते. त्यांच्या खासगी आयुष्यात लोकांनी डोकावणे हे चुकीचे असले तरीही त्यांच्या अशा प्रकरणांची चर्चा रंगते व पर्यायाने त्यांची बदनामी ही होतेच. अनेकदा राजकारणात त्यांची बदनामी करण्यासाठी व राजकारणातून त्यांचे अस्तित्व संपविण्यासाठी विरोधक अशा हत्यारांचा चांगलाच वापर करुन घेतात. त्यामुळे अशी प्रकरणे आपल्यामागे चिकटू नयेत यासाठी राजकारणी प्रयत्नशील राहणे आवश्यक ठरते. अनेकदा बनावट सीडी देखील करता येतात. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबिले जाते. मात्र ते उलगडू शकते. मात्र दरम्यानच्या काळात एकाद्या राजकारण्याची बदनामी होते व ती बदनामी भरुन काढता येत नाही. त्यामुळे असा प्रकारच्या चर्चा, गॉसिप किंवा प्रत्यक्ष एखादी सीडी या सेलिब्रेटींसाठी वरदान ठरत असल्या तरीही राजकारण्यांसाठी त्यांचे करिअर संपविणर्‍या ठरु शकतात. सर्वात दुदैवाची बाब म्हणजे याबरोबरीने एका महिलेचीही बदनामी होत असते. तिच्या आयुष्याचा आपल्याकडे कुणीच विचार करीत नाही. 
-----------------------------------------------------------   

0 Response to "खासगी आयुष्य व राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel