-->
संपादकीय पान गुरुवार दि. १३ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अखेर विश्‍वास संपादन!
----------------------------------
भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्याआधी शिवसेनेने विरोधात मतदान करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना भाजप सरकारच्या विरोधात मतदान करणार असून विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे शिवसेवा निदान या मतावर तरी ठाम राहिली. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला राज्यात स्थिरतेसाठी समर्थन देण्याचे पुन्हा एकदा जाहीर करुन त्यांचे सदस्य तटस्थ राहिले आहे. सभागृहात भाजपचे आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला भाजप सदस्यांनी       आवाजी मतदानाने पाठिंबा दिला. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मतविभाजनाची मागणी केली. त्यानंतर सेना सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. शेवटी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर झाले आणि शिवसेनेचे सत्तेत सहभागी होण्याचे दोर अखेर कापले गेलेच. भाजपाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांनी फ्लोअर मॅनेजमेंट उत्कृष्ट केल्याने भाजपाचा सहजरित्या विजय झाला. त्यातुलनेत शिवसेना विरोधी पक्ष म्हणून कमी पडली. आता कॉँग्रेसला अविश्‍वास ठराव अयोग्यरित्या मांडल्याचा साक्षात्कार झाला आहे. अर्थात हे वरातीमागून घोडे आहे. कॉँग्रेसने आता आपला पराभव मान्य करावा व एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्यातच शहाणपणा आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी मात्र शिवसेना व कॉँग्रेस या दोघांना भरलेले अर्ज मागे घेऊन समजूतदारपणा दाखविला हे बरेच झाले. त्यामुळे अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांची निवड होण्याचा मार्ग सुकर झाला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून दहा वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री हरिभाऊ बागडे पाचव्यांदा विजयी झाले आणि आता राज्यात भाजपच्या नेतृत्वातील पहिल्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षाचे मानाचे पद त्यांना बिनविरोध मिळाले आहे. बागडेंनी १९८५ ते २००४ या काळात फुलंब्रीचे प्रतिनिधित्व केले व चारही वेळा मतविभाजनामुळेच त्यांचा विजय झाला. बागडेंच्या पाचव्यांदा झालेल्या विजयात कॉग्रेसच्या मतांचे विभाजन कारणीभूत ठरले होते. विधानसभेचे अध्यक्ष झालेल्या बागडेंनी वृत्तपत्र विक्रीपासून व्यवसायाला सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणार्‍या हरिभाऊ बागडेंचे चितेगाव हे त्यांचे मुळगाव. संघाचे प्रचारक दत्ताजी भाले यांनीच त्यांना घडवल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.  आणीबाणीमध्ये तुरुंगवासही त्यांनी भोगला आहे. सरकारने आता विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यामुळे एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे. आता सरकार झपाट्याने निर्णय घेण्यास सज्ज होईल. सरकार आता नेमके कोणते निर्णय घेते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. शेवटी राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. केंद्रात सत्ता काबीज केलेल्या भाजपला महाराष्ट्रात सर्वात अधिक जागा मिळाल्या आणि प्राप्त परिस्थितीत त्या पक्षाने सरकार स्थापन करण्याचा कौल जनतेने दिला. गेल्या २५ वर्षांची युती मोडून शिवसेना-भाजपा हे पक्ष निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप आणि शिवसेनेने आपल्या युतीला छोट्या आणि मोठ्या भावाची उपमा वापरली आहे. इतके दिवस छोटा असलेला भाऊ म्हणजे भाजप निवडणुकीने मोठा भाऊ, तर शिवसेना छोटा भाऊ झाला आहे. भावाची उपमा वापरली म्हणून भाऊबंदकीचा असा आदर्श घेण्याची काही गरज नव्हती. भाजपने कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा जाहिराती केल्या होत्या. त्या वादग्रस्त ठरल्यावर मागे घेण्यात आल्या. आता महाराष्ट्र हाती दिल्यानंतरचे जे वर्तन आहे, ते पाहता पुढील काळात महाराष्ट्र नेमका कोठे नेऊन ठेवला जाईल, अशी भीती वाटू लागली आहे. भाजपाला आता प्रत्यक्ष काम करुन दाखवायचे आहे. आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, अशी सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि तो शब्द त्यांनी पाळला. शिवसेनेवर भाजप टीका करत नसला तरी शिवसेनेची कोंडी करण्याचे काम त्यांनी केले आणि शेवटी त्यांनी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलेच. जनता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारला कंटाळली होती, म्हणून जनतेने बदल म्हणून भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर बसण्याचा कौल दिला आहे. भाजप आणि शिवसेनेने फार पराक्रम केला म्हणून दिलेला तो कौल नाही, याची जाणीव या दोन पक्षांच्या नेत्यांना दिसत नाही. पहिल्या दिवशी शिवसेनेने जो तमाशा केला तो तर अतिशय निषेधार्ह आहे. मराठी शाळांत उर्दूचा समावेश ऐच्छिक विषयांत करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. अशा निर्णयावर ताशेरे ओढून शिवसेनेने मंत्र्यांना हिरवी टोपी भेट देण्याची कृती केली. याचा अर्थ जग बदलले तरी शिवसेना बदलायला तयार नाही. उद्धव ठाकरे ज्याला आक्रमक हिंदुत्ववाद म्हणतात, तो हा नव्हे. भावनिक मुद्द्यांवर गुजराण करणारी शिवसेना ताज्या निवडणुकीतून काही धडा घेण्याची शक्यता दिसत नाही. पाठिंबाही जाहीर करावयाचा नाही आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला जातो, यावरून आदळआपट करायची, हे न समजण्यासारखे आहे. एकूणच आता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला आता झपाट्याने कामाला लागायचे आहे. लोकांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे व ती अपेक्षा पूर्ण करण्यास त्यांना बळ मिळो. यातून राज्याचे भले व्हावे हीच इच्छा.
---------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel