-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १४ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
चाचा नेहरुंचा भारत
--------------------------------------
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज १२५वी जयंती. सध्या कॉँग्रेस पक्ष सत्ता नसल्याने विकलांग अवस्थेत असताना पंडित नेहरुंची जयंती आल्याने तिला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सध्या केंद्रात असलेल्या भाजपा सरकारने ही जयंती अतिशय साधे पध्दतीने साजरी करणार हे स्पष्ट आहे. कॉँग्रेस जर सत्तेत असती तर त्यांनी भव्यदीव्य कार्यक्रम आयोजित करुन ही जयंती साजरी केली असती. मात्र जयंतीचे हे निमित्त साधून कॉँग्रेस पक्षाने दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात आयोजित केले असून त्यात १९ देशांच्या ५२ नेत्यांना तसेच समविचारी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय पक्षांना निमंत्रित केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप पक्षाला निमंत्रण दिलेले नाही. आम्ही पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलेले नाही. हे कॉंग्रेसचे संमेलन असून सरकारचे त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. नेहरूंचे विचार आणि दृष्टीकोनावर विश्वास असलेल्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याविषयी निर्णय घेण्याचे एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला स्वातंत्र्य आहे. आमचे याच कालखंडात दहा दिवसांच्या विदेश दौर्‍यावर गेले आहेत. त्यांनी ३१ ऑक्टोबर आणि १४ नोव्हेंबर या तारखा लक्षात ठेवायला हव्या, अशी टीका या संमेलनाची माहिती देताना कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. नेहरूंच्या १२५व्या जयंतीचे निमित्त साधून कॉंग्रेसने समाजवादी पक्ष, बसप, जदयु, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, द्रमुक, अण्णाद्रमुक, माकप, भाकप, राजद या समविचारी पक्षांपर्यंत पोहोचण्याचा नव्याने प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपला आमंत्रण देण्याचे टाळले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तंदुरूस्त असते तर त्यांना निश्चित निमंत्रित केले असते, असे कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. नेहरूंच्या १२५व्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसने सुरू केलेल्या वेबसाइटवर वाजपेयी यांनी केलेल्या प्रशंसेला स्थान देण्यात आले आहे. नेहरूंचा वारसा तसेच त्यांच्या जागतिक दृष्टि्‌कोनाविषयी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन येथे दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात अनेक आंतरराष्ट्रीय नेते तसेच भारत आणि विदेशातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्षपद कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी भूषविणार असून उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचे ९ सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा मोठी असलेले लोक नेहरूंचा वारसा संपवू शकणार नाही. नेहरूंनी १५ वर्षे तुरुंगवास भोगताना अनेक पुस्तके लिहिली. पण जे स्वतःला फार मोठे समजतात, त्यांना अजून एक अध्यायही लिहिता आलेला नाही. नेहरूंपुढे ते खुजे आहेत,असा टोला शर्मा यांनी मोदींना लगावला. देशाचे पहिले पंतप्रधान असणार्‍या पं. जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांबद्दल विशेष प्रेम होतं. या प्रेमातूनच त्यांनी आपल्या जन्मदिनी बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये जन्मलेल्या पं. नेहरु  यांचं बालपण अतिशय श्रीमंतीत गेलं. त्यांचे वडील मोतीलाल नेहरु हे धनाढ्य वकील होते. महात्मा गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून पं. नेहरु यांनी भारतावर राज्य करणार्‍या इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. पं. नेहरुंना जगाविषयी प्रचंड माहिती होती. त्याने महात्मा गांधी प्रभावित झाले. अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असावी, असं त्यांना वाटत होतं आणि त्यांच्या मनातील ही इच्छा स्वातंत्र्यानंतर पूर्णही झाली. देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर एक दिवस नेहरु तीन मूर्ती भवनमधील बागेमध्ये ङ्गिरत होते. त्यावेळी ते तेथील झाडं, रोपट्यांची पाहणी करत होते. अचानक त्यांना रोपट्यांच्या झुडुपांमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी आसपास पाहिल्यावर दोन  महिन्यांचं मूल रडत असलेलं त्यांना दिसलं. त्यानंतर त्या मुलाची आई कोठे दिसते का हे त्यांनी पहायला सुरुवात केली. पण, ती कोठे दिसली नाही. ती बागेमध्ये माळ्याबरोबर काम करत असेल असा विचार नेहरुंनी केला. इतक्यात ते मूल मोठ्याने रडू लागलं. त्यावेळी आपणच त्या मुलाच्या आईची भूमिका निभावायची असं नेहरुंनी ठरवलं. त्यांनी त्या  मुलाला उचलून घेतलं आणि त्याला खाऊ घातलं. थोड्या वेळाने त्या मुलाची आई तेथे आली. त्यावेळी चक्क पंतप्रधानांच्या हाती आपलं मूल पाहून तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. नेहरुंचं मुलांविषयीचं प्रेम हे असं होतं. आपल्या देशाचा पाया नेहरुंनी रचला. तो काळ शीतयुध्दाचा असल्याने अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या कोणाच्याही बाजूने न झुकता अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभारावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यातून खर्‍या अर्थाने तिसर्‍या जगाची उभारणी सुरु झाली. आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, त्यामागेही मुख्य प्रेरणा नेहरुंचीच होती. नेहरुंनी आपल्या देशाची समाजवादी रचना उभारण्यासाठीची बिजे रोवली. मात्र पुढे चालून त्यांच्यांच पक्षातील वारशांनी ही रचना कशी अयशस्वी होईल यासाठी प्रयत्न केले. नेहरु हे एक दृष्टे होते. त्यांना जगाने एक अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेते म्हणून स्वीकारले होते. नेहरुंचे जेवढे चाहते होते तेवढेच त्यांच्या वैचारिक भूमिकेशी असहमती व्यक्त करणारेही त्यांचे विरोधक होते. परंतु तो वैचारिक लढा काही थांबणारा नव्हता. स्वातंत्र्यानंतर देशाचा एक भरभक्कम पाया उभारण्याची कामगिरी नेहरुंनी केली याबाबत कुणाचेही दुमत होण्याचे कारण नाही.
----------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel