-->
संपादकीय पान बुधवार दि. १२ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
सत्तेसाठी लाचरी
------------------------------------
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याचा नेहमी संदेश दिला तीच शिवसेना त्यांच्या पश्‍च्यात आता सत्तेसाठी लाचार झाल्याचे चित्र पहावे लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर गेले महिनाभर शिवसेनेचे अध्यक्ष भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांचेे जे उंबरठे झिजवत आहेत ते पाहता त्यांची किव करावीशी वाटते. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपा त्यांना सत्तेत सहभागी करुन न घेण्यासाठी झिडकारतो आहे आणि शिवसेना आपल्याविषयी आज नव्हे तर उद्या तरी मतपरिवर्तन होऊन सत्तेत सहभागी करुन घेईल अशी अशा व्यक्त करुन सत्तेसाठी लांगूनचालन करीत आहे, हे विचारक चित्र पाहून मराठी माणसास आपली कीव वाटावी अशी परिस्थिती आहे. मात्र भाजपा काही त्यांना सत्तेची भीक घालण्यास तयार होत नाही. आता आमची पाळी आहे, आता तुम्हाला आम्ही सत्तेत सहभागी करुन घेणार नाही, असे वेगळ्या भाषेत भाजपा शिवसेनेला सांगत आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाला हे समजत नाही असे नाही. भाजपा आपल्या झुकवतोय हे पूर्णपणे समजतेय पण सत्ता ही सोडवत नाही अशी स्थिती आहे. मंत्रिपदे आणि खात्यांसंदर्भातील मागणीला भाजपने अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. त्यातच, विधानसभेतील तिसरा मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदासाठी आपला दावा केला. ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये, यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा अर्ज दाखल केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, जुळले तर जुळले असे सांगत भाजपशी सत्तासहभागाची बोलणी सुरू ठेवण्याचेही संकेत त्यांनी दिले. कितीही लाचारी! राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास आम्ही विरोधी बाकांवर बसू,या उद्धव यांच्या इशार्‍याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिवसेना विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळाला. तरीही भाजपकडून काही प्रस्ताव येतो का, अशी वाटही पाहिली जात होती. याच दरम्यान, कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या पक्षाचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज दाखल केला. एकीकडे, भाजपकडून प्रस्ताव नाही आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदही हातून जाण्याची भीती यामुळे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्र सोमवारी सायंकाळी विधिमंडळ सचिव डॉ. अनंत कळसे यांना दिले. विरोधी पक्षनेतेपदाचा दावा दाखल करण्यासाठी मुदत नसली तरी अध्यक्ष निवडीपर्यंत अर्ज दाखल केले की अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित असते. शिवसेनेचे ६३ व कॉंग्रेसचे ४२ सदस्य निवडून आले असून दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचाच विरोधी पक्षासाठी हक्क आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठीही शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याचे शिवसेना प्रवक्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला असला तरी भाजपशी चर्चा सुरूच राहील, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. भाजप केवळ चर्चाच करीत आहे आणि कॉंग्रेसने विरोक्षी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेला धड सत्तेत सहभाग नाही आणि विरोधी पक्षनेतेपदही नाही, अशी अवस्था होऊ नये, यासाठी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेण्यात आला,असे ते म्हणतात. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या मुद्दयावर भाजपने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करूनही भाजपने काहीही केले नाही. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याचे ठरविल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वबळावरच १४४चा जादुई आकडा कसा गाठता येईल या दृष्टीने भाजपच्या धुरिणांनी चाचपणी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून कर्नाटकच्या धर्तीवर राजीनामा घेऊन पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांना गळाला लावण्याची भाजपची व्यूहरचना असल्याचे उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात येते. कर्नाटकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बहुमताचा पल्ला गाठण्यासाठी कॉंग्रेसच्या आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडून त्यांना भाजपच्या वतीने निवडून आणण्याचे ऑपरेशन लोटस हे अभियान राबविले होते. या योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चाही केली आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील दोन दगडांवर पाय य्ेवून असलेल्या काही चेहर्‍यांचा सध्या शोध घेण्यात येत आहे. या आमदारांनी राजीनामे द्यायचे, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा आणि पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीने निवडून आणण्याचे धोरण आहे. किंवा थेट शिवसेनेत फूट पाडून एक स्वतंत्र गट स्थापन करुन सरकारला पाठिंबा देण्याचे घटत आहे. उध्दव ठाकरे यांना यांना याची मुख्य भीती वाटत आहे. प्रचार काळात शिवसेनेची सत्ता येणारच असे चित्र उभे करण्यात आले होते. त्यामुळे सत्तेच्या आशेने अनेक मुंगळे शिवसेनारुपी गुळाला चिकटले. उध्दव ठाकरेंना वाटत होते की, आपल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत आहे. मात्र ही शिवसेनेची ताकद वाढत नव्हती तर सत्तेच्या आशेने हे कावळे जमा झाले होते. आता जर ही सत्ता आली नाही तर हे कावळे उडून जातीव अशी भीती शिवसेनेला व उध्दव ठाकरेंना आहे. शिवसेनेत फूट पडू नये यासाठीच शिवसेनेची ही सत्तेसाठी लाचारी सुरु आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel