-->
रविवार दि. १६ नोव्हेंेबर २०१४ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
दोन घटनांचा वेध...
-------------------------------
गेल्या आठवड्याभरात (राज्यात झालेल्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या व्यतिरिक्त) जागतिक पातळीवरील दोन महत्वाच्या आठवणीत राहणार्‍या घटना झाल्या. यातील पहिली घटना म्हणजे जर्मनीची भींत पाडून पश्‍चिम व पूर्व जर्मनीचे एकत्रिकरण होणार्‍या घटनेला तब्बल २५ वर्षे झाली व दुसरी घटना म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची १२५ वी जयंती. केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर जगात ज्यांचे वय साठीच्या पुढे आहे त्यांना या दोन्ही बाबींचे मोठे आकर्षण होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांना पंतप्रधान न करता जर सरदार वल्लभभाई पटेल यांना केले असते तर देशाचे चित्र वेगळे दिसले असते असे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान कोण असावा यात महात्मा गांधींची महत्वाची भूमिका होती. गांधींजींनी नेहरुंची विव्दत्ता आणि नेतृत्वगुण तपासून त्यांच्या बाजूने कौल दिला होता. खरे तर पटेल हे गुजरातचे आणि गांधींजी हे देखील गुजरातचेच. मात्र गांधींजींनी आपल्या राज्यातल्या नेत्याच्या बाजूने कल न देता नेहरुंच्या बाजूने दिला. अर्थातच पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे, त्याची प्रतिमा देशातच नव्हे तर जगात उठावदार असली पाहिजे असे गांधीजींचे मत होते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या राज्यातील सरदार पटेल यांना पंतप्रधान न करता नेहरुंना केले. नेहरुंचे विरोधकही त्यांच्या विद्धवत्तेबद्दल शंका घेत नसत. ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी जगाचे दोन तट पडले होते एक गट होता अमेरिकन भांडवलशाहीचे समर्थन करणार्‍या देशांचा तर दुसरा होता सोव्हिएत युनियनच्या समाजवादी देशांचा. शीत युध्दाच्या या काळात या दोन्ही देशांच्या गटांनी भारताने आपल्या कळपात यावे यासाठी नेहरुंवर जबरदस्त दबाव होता. मात्र नेहरुंनी या दोन्ही बलाढ्य देशांचा दबाव झुगारुन संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि जागतिक राजकारणात अलिप्त राष्ट्र चळवळ उभारली. यातून तिसरे जग मजबूत झाले. नेहरु भांडवलशाहीच्या बाजूने कधीच झुकले नाहीत उलट त्यांचा कल हा समाजसत्तावादी देशांकडे होता. त्यातूनच त्यांनी संमिश्र अर्थव्यवस्थेची बांधणी केली. त्याकाळी आपल्या देशात पायाभूत सुविधांसाठी लागणारे मोठे प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेची नव्हे तर सोव्हिएत युनियनची मदत झाली होती, हे विसरता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर झालेली फाळणीचे वातावरण पाहता देशात सर्वधर्मसमभाव नांदावा यासाठी नेहरुंनीच पाया घातला. देशाने जर सर्वधर्मसमभाव सस्वीकारला नसता तर देशाचे सार्वभौमत्व व एकसंघपणा टिकणे कठीण झाले असते याचा विचार कुणी करताना दिसत नाही. नेहरुंची आणखी एक महत्वाची देणगी म्हणजे नियोजन आयोग. देशाचा विकास हा नियोजनबध्द केला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी नियोजन आयोगाची कल्पना प्रत्यक्षात आणली. याच आयोगाच्या माध्यमातून देशाचा विकास झाला. या आयोगाच्या पदसिध्द अध्यक्षपदी पंतप्रधान असतात. तसे करण्यामागे त्यांची ठोस भूमिका होती. नंतर नियोजन आयोग हे नोकरशाहीच्या फेर्‍यात अडकले आणि त्याचा पुरता फज्जा उडाला हा भाग वेगळा. नेहरुंनी अशा प्रकारे नियोजनबध्द विकास, सर्वधर्मसमभाव, संमिश्र अर्थव्यवस्था व अलिप्त राष्ट्र चळवळ या महत्वाच्या बाबी आपल्याला दिल्या. त्यामुळेच पंडित नेहरु हे व्यक्तिमत्व देशाच्या दृष्टीने महत्वाचे होते. तसेच दुसर्‍या महायुध्दानंतर जर्मनीचे दोन तुकडे झाल्यावर या दोन देशांचे विभाजन करण्यासाठी उभारलेली बर्लिनची भिंत पाडण्याच्या एतिहासिक घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. १९९१ साली सोव्हिएत युनियनची शकले झाली, मात्र त्या अगोदरच भिंत पाडून जर्मन जनतेने या दोन देशांचे एकत्रिकरण केले होते. सोविएत युनियनचे अखेरचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचोव यांनी ग्लासनोस्त आणि पेरेस्रोयका ही दोन तत्त्वे अंगिकारली आणि या मोकळेपणा व पुनर्रचनेचा मंत्र सांगणार्‍या तत्त्वांनी केवळ सोविएत युनियनच नव्हे तर सार्‍या जगाला हादरे दिले. यातून कम्युनिस्ट जगाची जी पडझड आणि फेररचना झाली त्यात जसे काही देशांचे विघटन झाले तशा कृत्रिम फाळण्या उद्ध्वस्तही झाल्या. यात जर्मनी हा दोन्ही महायुद्धांमध्ये बलाढ्य शक्ती म्हणून उतरलेला देशही होता. दुसर्‍या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीची फाळणी केली आणि अजस्त्र बर्लिन भिंत उभी केली. ही भिंत जनतेने कोसळून पडल्याला बरोबर २५ वर्षे पुरी झाली. जगाला हादरावून सोडणारी ही घटना होती. बर्लिन भिंत पडणे, ही पूर्व आणि पश्चिम जर्मनी असे दोन देश जन्माला घालून सुरू झालेले दोन छावण्यांमधील शीतयुद्ध संपल्याची सर्वांत स्पष्ट आणि देखणी खूण होती. त्या खुणेचा रौप्यमहोत्सव केवळ एकवट जर्मनीत नाही तर जगभर अनेक देशांमध्ये साजरा झाला. या बलाढ्य भिंतीची एक सोंड या काळ्या कालखंडाचे स्मरण म्हणून जतन केली आहे. त्या तुकड्यावर चढून स्वातंत्र्याची उल्हासदायी हवा पुन्हा एकदा चाखणार्‍यांची झुंबड उडाली होती. १० नोव्हेंबर, १९८९ रोजी पूर्व जर्मनीमधून भिंतीवर चढून स्वातंत्र्यात उडी मारणार्‍यांची रीघ लागली होती. त्यावेळी, जे तरूण ही भिंत चढले, ते आता पन्नाशीत पोहोचले आहेत. जगभरातून पर्यटक हा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी जमले होते. स्वातंत्र्याइतकं मोलाचं दुसरं काही नाही.. अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या. त्या केवळ जर्मन नागरिकांची नव्हे तर जगातील सर्वच स्वातंत्र्येच्छू नागरिकांची भावना व्यक्त करत होत्या. फाळणी झालेली जर्मनी ही दुसर्‍या महायुद्धाची एक खूण मिटली असली तरी फाळणी झालेला कोरिया तसाच आहे. एक शीतयुद्ध संपले असले तरी पुढचे शीतयुद्ध जगाच्या वेशीवर येऊन ठेपले आहे, असे मिखाईल गोर्बाचोव यांनी या पंचविशीच्या निमित्ताने म्हटले आहे. ते वाक्य उत्सवाच्या जल्लोषातही सार्‍या जगाने लक्षात ठेवावे, असे आहे. या दोन्ही घटना शीतयुध्दाच्या काळातल्या असल्या तरीही त्याचे अजूनही महत्व काही संपुष्टात आलेले नाही.
--------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel