-->
शनिवार दि. १९ ऑक्टोबर २०१४ च्या मोहोरसाठी-- 
------------------------------------
सरकार स्थापनेचे सात पर्याय
--------------------------------
निवडणुका संपून निकाल काय लागणार याची चर्चा आता काही वेळातच संपणार आहे. हा लेख वाचकांच्या हातात पडेपर्यंत निकाल हाती आलेले असतीलही, किंवा निकालाचा कल तरी स्पष्ट झालेला असेल. असे असले तरी सत्ता नेमकी कोण स्थापन करणार याचे अंदाज आपण बांधू शकतो. निदान त्यासंबंधीचे पर्याय कोणते असू शकतात याचा विचार आपण पूर्ण निकाल हाती येईपर्यंत बांधू शकतो. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याने आपल्याला या प्रत्येक पक्षाची नेमकी ताकद किती आहे ते यावेळी आजमाविता येणार आहे. यावेळच्या निवडणूण कोणत्या मुख्य मुद्यांवर लढविली गेली असे विचारल्यास ठोस असे उत्तर देता येत नाही. हिंदुत्वाचा मुद्दा यावेळी प्रचारात नव्हताच. मराठी अस्मिता हा मुद्दा मात्र शिवसेनेने लावून धरला. परंतु त्यात त्यांना किती प्रमाणात यश येते हे समजेलच. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे ही भाजपा वगळता सर्वच पक्षांची मागणी आहे. मात्र त्यावर काही रण निवडणुकीत माजले नाही. भ्रष्टाचार हा मुद्दा चर्चेत जरुर होता परंतु त्यावरुन काही मोठे काहूर उठविण्यात आले नाही. तोंडी लावण्यापुरताच हा मुद्दा निवडणुकीत वापरला गेला. त्यामुळे यावेळी कोणत्याच मुद्यावर निवडणूक लढविली गेली नाही. अशा पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकीत एकच पक्ष सत्तेत येणार की पुन्हा एकदा पक्षांची खिचडी असलेले सरकार सत्तेत येणार हा खरा सवाल आहे. सत्तेत येणारे सरकार हे कसे असू शकते त्याचे आपण काही पर्याय तपासू शकतो.
पर्याय१- भाजपाला व त्यांच्या सोबत असलेल्या चार पक्षांच्या महायुतीला संपूर्ण बहुमत मिळून ते सरकार स्थापन करतील. अशा स्थितीत महायुतीला १४५ जागा मिळणे आवश्यक आहे. असे झाल्यास सरकार सहजरित्या स्थापन होईल व अन्य पक्षांना निमूटपणे विरोधात बसावे लागेल. यानुसार अर्थातच भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे उघड आहे. असे जाल्यास पुढील मांडलेले सर्व पर्याय रद्दबातल होतील. मात्र तसे न झाल्यास पुढील पर्याय खुले होतील.
पर्याय२-यानुसार भाजपा व त्यांच्या सहकारी पक्षांना मिळून ११० ते १३० जागा मिळतील व त्यांना अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागेल. अशा स्थितीत ते भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असेल. हा पर्याय सर्वात जास्त शक्य वाटतो.
पर्याय३-या स्थितीत भाजपाला व त्यांच्या मित्र पक्षांना ९० ते १०० जागा मिळतील व सरकार स्थापनेसाठी त्यांना ४५ ते ५५ आमदारांची गरज भासेल. अशा स्थितीत त्यांना केवळ अपक्षांची साथ घेऊनही पुरेसे ठरणार नाही. अशा वेळी ते शिवसेनेची साथ घेऊ शकतील. १९९९ साली अशाच प्रकारे कॉँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत आले होते. सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रवादीची स्थापना काही महिन्यांपूर्वीच कॉँग्रेसमधून फुटून झाली होती. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकून त्यांनी मात्र नंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घातले होते. हीच स्थिती भाजपा व शिवसेनेची होऊ शकते.
पर्याय४-जर शिवसेनेला ८० ते १०० जागा मिळाल्या व भाजपाला ७० ते ८० एवढ्या जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे आपल्या सोबत येण्यासाठी भाजपाला आमंत्रण देतील. अशा स्थितीत हे पक्ष आपल्यातील मतभेद गाडून सत्तेच्या माळा गुंफतील. अर्थात या पर्यायानुसार उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि गेल्या २५ वर्षापूर्वी जुळलेले हे लग्न मोडलेले असले तरी हा घटस्फोट मोडीत निघेल.
पर्याय५-समजा शिवसेना व भाजपा आपल्या घटस्फोटावर कायम राहिले तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना एकत्र येतील, गरज भासल्यास मनसेलाही बरोबर घेण्याचा पर्याय खुला ठेवतील. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला ५० जागा मिळवाव्या लागणार आहेत. सध्याच्या सर्व्हेनुसार ते अशक्य दिसत आहे.
पर्याय६-कॉँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी जर ७०च्या पुढे जागा मिळल्या तर हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र येतील आणि मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण किंवा अजित पवार हे विराजमान होऊ शकतात. अर्थात हा पर्याय सध्या तरी अशक्यच वाटत आहे.
पर्याय७-जर समजा कोणत्याच पक्षाला जास्त जागा मिळविता आल्या नाहीत व खिचडी सरकारही स्थापन करणे शक्य झाले नाही तर दिल्लीसारखी स्थिती निर्माण होऊन राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल. कालांतराने सत्तेची गणिते जुळल्यास सरकार स्थापनेचा पर्याय खुला होऊ शकतो.
हे सात पर्याय राज्यात काय होऊ शकते याचा अंदाज येण्यासाठी बांधलेले आहेत. लोकांचा कल काय असेल हे सध्यातरी सांगता येत नसल्याने काय होऊ शकते यासाठी हे पर्याय आखलेले आहेत. अर्थात यात सात पर्यायापैकी कोणता तरी एक पर्याय येणार हे नक्की. हे राज्य सुरुळीत चालावे व जनतेची कामे झपाट्याने व्हावीत यासाठी स्थिर सरकार स्थापन होण्याची गरज आहे. सर्वच पक्षांच्या युत्या आघाड्या रद्द झाल्याने कदाचित यातून एक चांगले चित्रही राज्यात उभे राहू शकते अशी अपेक्षा करुया.
प्रसाद केरकर
-------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel