-->
संपादकीय पान शनिवार दि. २६ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
राडेबाजीला राजमान्यता
--------------------------------
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात कॅन्टिनमधील एका मुस्लिम कर्मचार्‍याच्या तोंडाच त्याच रोजा सुरु असताना बळजबरीने रोटी कोंबून त्याच रोजा तोडण्याचा प्रकार शिवसेनेच्या खासदार महाशयांनी केलेला प्रकार हा निंदजनकच म्हटला पाहिजे. गेल्या आठवड्यात घडलेला हा प्रकार मिडीयाने उघड केल्यावर अनेकांच्या लक्षात आला. त्यानंतर या प्रश्‍नावर संसदेतही गदारोळ झाला. शिवसेनेने सुरुवातीला तर अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला होता. परंतु वृत्तवाहिन्यांवर खासदार राजन विचारे बळजबरीने रोटी कोंबतानाचे व्हिडिओ फुटेज दाखवल्यानंतर त्यांनी घूमजाव केले आणि रोटी खाण्यासाठी बळजबरी केली नव्हती, अशी सारवासारव केली. तो मुस्लिम किंवा रोजेदार असल्याचे ठाऊक नव्हते, असे राजन विचारे यांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आम्ही हिंदुत्ववादी आहोत मात्र अन्य धर्माचा आदर करतो अशी गुळमिळीत प्रतिक्रिया देऊन सावरण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दुसर्‍याच्या धर्माचा जर सन्मान शिवसेनेचे खासदार करीत असते तर त्यांच्या हातून रोटी कोंबण्याचे कृत्य झाले नसते. त्यामुळे एकूणच शिवसेनेच्या राडेबाज संस्कृतीला शोभेल असेच ते कृत्य आहे. आता तर शिवसेना भाजपाच्या सोबत केंद्रात सत्तेत असल्याने या राडेबाजीला राजमान्यता मिळाली आहे. आपण आपल्या देशात सर्वधर्मसमभाव हा घटनेने मान्य केलेला आहे. भाजपा व शिवसेनेला हा बेडगी सर्वधर्मसमभाव मान्य नाही असे ते सांगतात. मात्र याचा अर्थ प्रत्येकाला त्या धर्म पाळण्याचा घटनेने दिलेला अधिकार कुणाला नाकारता येणार नाही, हे विसरता कामा नये. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अनेक वेळा जेवण चांगले नसते आणि त्याविषयी अनेकदा तक्रारी होत असतात. मात्र जेवणाचा दजार्र् सुधारण्यासाठी सुचना करणे वेगळे व अशा प्रकारे तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍याला रोजा सोडायला भाग पाडून त्याच्यावर मानसिक दडपण आणणे हे कृत्य वेगळे. आपण कशा प्रकारचे हे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठविले आहेत याचे वैष्यम्य आता जनतेला वाटल्याशिवाय राहाणार नाही. मराठी माणसाचा दबदबा राहाण्यासाठी शिवसेनेने राडेबाजी केली. मात्र अनेकदा ही राडेबाजी समर्थनीय होती, कारण त्याला मराठी माणसाच्या हीताची एक किनार होती. मात्र शिवसेनेने ज्यावेळी हिंदुत्वत्वाचा पुकारा केला त्यावेळी मात्र त्यांचा मुस्लिम विरोध वाढू लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी हिंदू मतांचे एकत्रिकरण केले आणि विजयश्री खेचून आणली. मात्र त्यांनी हे करीत असताना प्रखर हिंदुत्ववादाचा मुखवटा बाजूला ठेवून त्याला विकासाचा मुखवटा परिधान केला. दरवेळी अशाच प्रकारचे हिंदू कार्ड निवडणुकीत विजयी होण्यासाठी यशस्वी ठरेल असे जर त्यांना वाटत असेल तर तो शिवसेना व भाजपाचा भ्रम ठरेल. शिवसेना जेव्हा फक्त संघटना होती तेव्हा आक्रमकता शोभत होती, पण संघटनेचा जेव्हा पक्ष होतो तेव्हा रस्त्यावरील आक्रमकतेला संसदीय कामकाजातील आक्रमकतेचे स्वरूप द्यावे लागते. प्रतिपक्षाला संसदेत कैचीत पकडून हवे ते घडवून आणणे हा लोकशाहीतील सनदशीर मार्ग आहे. मात्र त्यासाठी वेगळ्या पद्धतीने स्वत:ची बौद्धिक घडण करून घ्यावी लागते. व्यक्तिगत पातळीवर स्वत:ची अशी घडण करून सर्व पक्षांवर ठसा उमटवणारे खासदार शिवसेनेतही होते व आहेत. सुरेश प्रभू, मनोहर जोशी किंवा विद्याधर गोखले ही या पंक्तीतील काही नावे. लोकसभेचे माजी सभापती व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी शिवसेनेचे कट्टर विरोधक, तरीही मनोहर जोशींच्या सभापती म्हणून केलेल्या कामाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्याबद्दल तर कॉंग्रेससह अन्य पक्षामध्येही आदराने बोलले जाते. तथापि, ही नामावळी वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला नाही. संसदीय कामातून छाप पाडण्यापेक्षा राडेबाजी करून लक्ष वेधून घेणार्‍यांचेच पक्षात कौतुक झाले. त्याचे परिणाम आता नुकत्याच झालेल्या दिल्लीतील घटनेत दिसत आहेत. संसदीय लोकशाहीत विजय मिळवण्यापेक्षा तो पचवून सत्ता राबविणे हे मोठे कठीण काम असते. एनडीएचे नेते तेथे डोके लावताना दिसत नाहीत. बोलण्यापेक्षा कृतीला अधिक महत्त्व असते. सर्वांना समान वागणूक देण्याची भाषा करून भागत नाही. तशी कृती असावी लागते. कोणी आततायी वर्तन करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली गेली तरच लोकांचा विश्वास बसतो. हिंदुत्वाचा शिक्का अधिक गडद होईल, असे वर्तन होणार नाही याची दक्षता नरेंद्र मोदी घेत असल्याचे सध्यातरी जाणवते, पण मित्र पक्ष किंवा परिवारातील संघटना यांच्याकडून हे भान ठेवले जाईल याची शाश्वती नाही. मात्र असे भान कुणी सोडले तर त्याला वठणीवर आणण्याची हिंमत नरेंद्र मोदी यांनी दाखवली तरच संसदेसमोर घातलेल्या दंडवतावर जनतेचा विश्वास बसेल. एनडीएवरील हिंदुत्वाचा शिक्का ठळक करण्याची धडपड विरोधी पक्ष व मीडियातूनही होणार हे भाजपच्याही खासदारांच्या लक्षात आलेले नाही हे लोकसभेत या नेत्यांच्या बडबडीवरुन दिसून येते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. कॉंग्रेसप्रमाणे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याची धडपड मोदी सरकारने करावी, अशी कोणाचीही अपेक्षा नाही, पण धर्मांधता, जात्यंधता अशा विकासाच्या आड येणार्‍या मुद्द्यांभोवती देशाचे राजकारण फिरणार नाही याची काळजीही घ्यावी लागेल. देशाचे अर्थकारण सुधारण्यास मोदींना प्राधान्य द्यायचे आहे. देशातील कोट्यवधी तरुण व मध्यमवयीन मतदारांनी त्यासाठीच त्यांना मते दिली आहेत. त्यांच्या दुर्दैवाने अर्थकारणाला प्राधान्य देण्याची मानसिकता ना भारतातील राजकीय पक्षांत आहे, ना मीडियामध्ये. उलट भडक गोष्टींमध्ये त्यांना अधिक रस आहे. हे वास्तव लक्षात घेऊन संघ परिवार आणि शिवसेनेसारखे मित्रपक्ष यांना वाटचाल करावी लागेल. देशातील अल्पसंख्यांक या वर्तनाने बिथरण्याची शक्यता जास्त आहे आणि याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel