-->
संपादकीय पान बुधवार दि. ४ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
सोशल साईटचा असाही मनस्ताप
-------------------------------
आपल्याकडे देशात सोशल नेटवर्कने तरुणाईलाच नव्हे तर सर्वांनाच एक प्रकारची मोहीनी घातली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोशल नेटवर्कने आपली जबरदस्त ताकद दाखविली. मात्र सोशल नेटवर्कचा उपयोग जसा चांगल्या रितीने करता येतो तसाच तो एखाद्याची बदनामी करुन समाजात तेढ निर्माण करण्यासाठीही केला जातो. याची प्रचिती नुकतीच फेकबुकवर टाकलेल्या महापुरुषांच्या बदनामीपर फोटोंनी आली आहे. फेसबुकवरील एका व्यक्तीच्या संतापजनक विकृतीने सार्‍या महाराष्ट्रभर हलकल्लोळ माजवून टाकला आहे. इथे लोकांच्या अस्मितेशीच छेडछाड झाल्याने ते पेटून उठले आहेत, मात्र फेसबुक आणि सोशल साईटवर दररोज शेकडो प्रकारच्या विकृती समोर येत आहेत. त्यात महिलांची बदनामीचे प्रकार नित्य झाले आहेत. त्यामुळे महिला युजर्सनी स्वतःचे फोटो अपलोड करता दहा वेळा विचार केला पाहिजे. याची प्रचिती अनेक वेळा येते. त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकी प्रकरणे पोलिसांत जातात आणि अपवादानेच त्यातील विकृतांना शासन होते. सोशल साईटने लोकसंपर्क प्रचंड वाढवला. मात्र त्याची काळी बाजूही आता पुढे येत आहे. विटंबनेच्या धक्कादायक प्रकारानंतर राज्यभरात तणाव निर्माण झाला. नेत्यांच्या व्यक्तिगत निंदानालस्तीपासून सारे काही या माध्यमांनी अलिकडे झालेल्या निवडणुकीत करून दाखवले. आता समाजात विध्वंस निर्माण करण्याचा त्याचा हातखंडाही पुढे येतो आहे. गेले दोन दिवस फेसबुक आणि वॉट्‌सअपवर याच विषयावर चर्चा झडल्या. संताप, निषेध व्यक्त झाला. एक लिंक बंद केली की दुसरी खुली केली जात होती. दुर्दैव म्हणजे, एका विकृताने अपलोड केलेला हा प्रकार अन्य सोशल साईटवरून वणव्याप्रमाणे पसरला. तसाच तो जाणते-अजाणतेपणे पुढे सरकवला जात होता. या प्रकाराचे राज्यव्यापी पडसाद उमटल्याने त्याची चर्चा सुरु झाली. अर्थात केवळ महापुरुषांच्या बदनामीचे जसे प्रकार घडतात त्याप्रमाणे सर्वसामान्य घरातील महिला आणि मुलींच्या बदनामीचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः फोटो मिक्सिंग करून बदनामी करणे आणि शिवाय ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी सांगलीतील शिवाजी क्रीडांगण परिसरातील एका तरुणीचे कॉल गर्ल म्हणून प्रोफाईल तयार करून त्याचे ई-मेल पाठवण्यात आले होते. तेव्हा सोशल साईटचा एवढा गवगवा नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची फार चर्चा झाली नाही. दोन वर्षांपूर्वी इचलकरंजीतील एका कॉलेज युवतीचे असेच प्रोफाईल बनवून बदनामी करण्यात आली. त्या प्रकरणी मिरजेतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीतही एका किशओरवयीन मुलीची अशा प्रकारे बदनामी करण्याचे प्रकरण गाजले होते. यावर एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्र पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी या वाढत्या प्रकारांविरुद्ध जागृती हाती गेतली होती. सोशल साईटवर महिलांनी आपले फोटो अपलोड करू नयेत, असा सल्ला दिला. त्याचा फारसा परिणाम मात्र झालेला दिसत नाही. महिलांचा सध्या फेसबुकचा वापर वाढलाय याचे कौतुक करताना त्यातले वास्तवही समजून घेतले पाहिजे. खुलेपणाने बोलण्याचे हे माध्यम आहे; मात्र त्यालाही आता मर्यादा आल्या आहेत. या मर्यादाच्या सीमारेषा ज्याच्या त्याने आखायच्या आहेत. अत्याधुनिक कॅमेरे आणि दूरवरचे दृश्य टिपण्याची क्षमता असलेल्या लेन्सचा वापर करून महिलांचे फोटो टिपले जात आहेत. त्यानंतर विकृत पद्धतीने हे फोटो फेसबुकवर टाकले जात आहेत. काही अश्‍लील फोटोंना सामान्य घरातील महिलांचे चेहरे जोडून बदनामी करण्याची विकृती अधिकच वाढली आहे. यातून अनेकांची बदनामी होते. यात फटका बसलेली अनेक कुटुंबे पोलिसांकडे आधारासाठी येतात; मात्र पोलिसांना अशा तक्रारीचे निरसन करण्यासाठी पुरेसा अवधीच नाही. विकृतांना लोकांचा धाक आणि कायद्याचा चाप गरजेचा आहे मात्र तो नाही हे देखील अधोरेखित होते. य प्रकारांमुळे सोशल नेटवर्किगचा वाईट प्रकार जनतेपुढे उघड झाला आहे आणि भविष्यात त्याला आळा घालण्याची गरज आहे.
--------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel