-->
संपादकीय पान मंगळवार दि. ३ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
तेलंगणाचा अखेर जन्म; आता पुढे काय?
--------------------------------
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर वेगळ्या तेलंगण राज्याचा सोमवार २ जून रोजी अधिकृतरित्या भारताचे २९वे राज्य म्हणून जन्म झाला. तेलंगणचे पहिले मुख्यमंत्री म्हणून के. चंद्रशेखर राव यांनी शपथ घेतली. काल मध्यरात्रीपासूनच तेलंगणमध्ये नव्या राज्यनिर्मितीचा जल्लोष सुरू झाला होता. एकत्र आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही दोन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा ठराव संसदेमध्ये फेब्रुवारीत मंजूर झाला होता. त्यावेळी २ जून ही दोन्ही राज्यांच्या निर्मितीची अधिकृत तारीख ठरविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळातच ३० एप्रिल रोजी येथे विधानसभेसाठीही मतदान झाले. यात तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसने अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळविले. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन्हींसाठी हैदराबाद हीच संयुक्त राजधानी असेल. पुढील दहा वर्षांत सीमांध्राला वेगळी राजधानी उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॉँग्रेसच्या राज्यात या स्वतंत्र राज्याची घोषणा झाली आणि याची प्रत्यक्षात निर्मिती होईपर्यंत कॉँग्रसेची सत्ता जाऊन भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे. तेलंगण प्रांत मूळचा निजामाच्या अधिपत्याखालील प्रदेश होता. १९४८ मध्ये संस्थाने खालसा झाल्यानंतर हैदराबाद राज्याची स्थापना झाली खरी मात्र तेव्हापासून स्वतंत्र तेलंगणाचा लढा सुरु झाला होता. १९५३ मध्ये पोट्टी श्रीरामुलु यांच्या तेलुगु भाषिक राज्यासाठीच्या आंदोलनामुळे व उपोषणादरम्यान झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा ऐरणीवर आला. १ नोव्हेंबर १९५३ रोजी तत्कालीन मद्रास प्रेसिडन्सीमधून आंध्र प्रदेश या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. १९५६ मध्ये हैदराबाद राज्याचे (तेलंगण प्रांत) आंध्र प्रदेशमध्ये विलिनीकरण झाले. मात्र दोन्ही प्रांतांतील आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दरीमुळे तेलंगणमधील नागरिकांचा याला कायमच विरोध राहिला. तेलंगणला आंध्रमध्ये समाविष्ट करताना आंध्र आणि तेलंगण या दोन प्रांतात झालेल्या करारात तेलंगणचे हित अबाधित राखण्याचे आश्वासन मिळाल्याने तेलंगणमधील नेत्यांची विलिनीकरणास मान्यता दिली. मात्र आंध्रकडून तेलंगणाला मिळणार्‍या सापत्न वागणुकीमुळे १९६९ मध्ये मारी चेन्ना रेड्डी यांच्या तेलंगण प्रजा समितीच्या नेतृत्त्वाखाली स्वतंत्र तेलंगणासाठीच्या मागणीने जोर धरला. त्यावेळी झालेल्या निदर्शनांदरम्यान पोलिस गोळीबारात ३५० जण ठार झाले होते. १९९८ सालच्या निवडणुकीत एक मत-दोन राज्य, असे आश्वासन देत भाजपचा स्वतंत्र राज्यास पाठिंबा दिला होता. के. चंद्रशेखर राव यांनी यांनी २००१ साली तेलुगु देसम सोडून तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) स्थापन केल्यानंतर स्वतंत्र तेलंगणच्या मागणीला पुन्हा जोर आला. २००४ मध्ये राव यांच्याशी हातमिळवणी करताना तेलंगणची मागणी मान्य करण्याचे कॉंग्रेसने आश्वासन दिले. कॉँग्रेसने नेहमीप्रमाणे दिलेली आश्‍वासने न पाळण्याचे याबाबतीतही केले. परिणामी राव २००९ साली आमरण उपोषणाला बसल्यानंतर स्वतंत्र तेलंगणासाठीची प्रक्रिया सुरू करत असल्याची तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांची घोषणा केली. आंध्र, तेलंगणमधील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर केंद्राकडून सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्या. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचा अहवाल टीआरएसने फेटाळला. अखेरीस जनमताचा वाढलेला रेटा पाहता ३० जुलै २०१३ रोजी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीस कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची मंजुरी मिळाली. ऑक्टोबर २०१३ मध्ये आंध्र प्रदेशच्या विभाजनास केंद्राची मान्यता देण्यात आली. फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकसभेने तेलंगण विधेयक मंजूर केल्यानंतर विभाजनास विरोध करत आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री किरणकुमार रेड्डी यांचे बंड केले. त्यांना या प्रश्‍नावर आपल्या पदाचा राजीनामा दिला.  संसदेने विधेयक मंजूर केल्यानंतर विभाजनाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. अखेरीस २ जून रोजी तेलंगणची देशातील २९वे राज्य म्हणून अस्तित्वात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. अशातर्‍हेने अखेरीस आंध्र प्रदेशच्या औपचारिक विभाजनानंतर सोमवारी तेलंगण हे २९ वे वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले आहे़ तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के़ चंद्रशेखर राव तेलंगणचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली़  मुख्यमंत्री एऩ किरणकुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर गत १ मार्चपासून आंध्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती़ अनेक वर्षांच्या संघर्षानंतर वेगळे तेलंगण राज्य अस्तित्वात येणार, या आनंद सोहळ्यासाठी संपूर्ण हैदराबाद गुलाबी रंगात न्हाऊन निघाले होतेे़ टीआरएसच्या झेंड्याचा रंगही गुलाबी आहे़  शहरात मोठेमोठे पोस्टर, बॅनर लावण्यात आलेले आहेत़ यात चंद्रशेखर राव यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत़  ताज्या विधानसभा निवडणुकीत राव यांच्या टीआरएसने तेलंगणमध्ये ११९ विधानसभा जागांपैकी ६३ जागा जिंकल्या होत्या, तर तेलगु देसमनेे भाजपासोबत सीमांध्रच्या १७५ जागांपैकी १०६ जागांवर विजय मिळवला होता़  तेलंगणाच्या निर्मितीनंतर आता केंद्रातील सरकारपुढे लहान राज्यांच्या निर्मिचा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. कॉँग्रेसने लहान राज्यांना किंवा सध्या असलेल्या राज्यांचे विभाजन करण्यास मनापासून विरोध होता. मात्र तेलंगणाचा यात काय तो अपवाद. कारण हे राज्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनमताना रेटा होता आणि तत्याला बळी पडून हे राज्य झाले. मात्र भाजपा हा लहान राज्ये असावीत या मताचा आहे. यापूर्वी त्यांनी झारखंड, छत्तीसगढ, उत्तराखंड अशा तीन राज्यांची निर्मिती केली होती. आता तर भाजपाच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आल्याने महाराष्ट्राचे तुकडे पाडून विदर्भ हे स्वतंत्र राज्य स्थापन करणार का, असा सवाल उपस्थित होतो. अर्थात त्यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर याबाबतची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. जर स्वतंत्र विदर्भ स्थापन करण्याच्या बाजूने भाजपा असेल तर शिवसेना कोणती भूमिका घेणार हा देखील प्रश्‍न आहेच.
------------------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel