-->
संपादकीय पान बुधवार दि. ४ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
लोकनेता
------------------------------ 
भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व नुकतीच केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून सुत्रे हाती घेतलेले गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन होणे हा एक जबरदस्त धक्का होता. राज्यातील तळागाळातील जनतेचा लोकनेता म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख करावा असे हे मुंडे बीडमधील आपल्या विजयी रॅलीसाठी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या या विजयी रॅलीचे रुपांतर आता शोकाकुल रॅलित होणे ही एक दुदैवी घटना म्हणावी लागेल. भाजपाने दिल्लीचे तख्त जिंकल्यानंतर आता महाराष्ट्राचा गड सर करण्याचा मनोदय प्रत्येक मुलाखतीत व्यक्त करणारे गोपीनाथ मुंडे अचानक निघून गेल्याने भाजपाची फार मोठी हानी होणार आहे. भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे तर मुंडे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना केंद्र सरकारमध्ये स्थान देत त्यांच्याकडे ग्रामीण विकास, पंचायत राज, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मुंडे हे अतिशय दिलखुलास नेते होते त्यामुळेच केवळ पक्षातच नाही तर विरोधी पक्षातही त्यांचे मित्र बरेच होते. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्याकडे नेहमी असे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात भाजपाचा ब्राह्मणी चेहरा बदलून त्याला ओ.बी.सी.चा पाया तयार करुन देण्याचे काम त्यांनी केले. भाजपा त्यांनी खर्‍या अर्थाने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. ते एक संघर्ष करणारे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती. त्यांनी पक्षाला जसे राज्यात स्थान मिळवून देण्यासाठी संघर्ष केला तसाच पक्षांतर्गत आपले स्थान बळकट करण्यासाठीही वेळोवेळी संघर्ष करावा लागला. गडकरी यांच्याशी झालेल्या वादात त्यांची राजीनामा देण्यापर्यंत मजल गेली होती. परंतु शेवटी गोपीनाथ मुंडेसारखा मागासवर्गीयात स्थान असलेले नेता त्यांना पक्षाला पाहिजे असल्याने वेळोवेळी त्यांची समजूत काढली जाई. आता देखील राज्यात आगामी निवडणुकीत युतीची सत्ता येणार अशी चिन्हे दिसू लागताच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांचे पहिले नाव होते. त्यासाठी त्यांनी गेले वर्षभर बरीच मेहनतही घेतली होती. त्यासाठी त्यांनी आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले. त्यानंतर महायुती हे नाव ख-या अर्थाने सार्थ करण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांना सोबत घेऊन आम्ही पाच पांडव असल्याचे सांगितले. त्यांनी यातूनच कॉंग्रेस - राष्ट्रवादीचा पाडाव केल्याशिवाय राहाणार नाही, अशी घोषणा केली. यापूर्वी त्यांनी त्यांचे हे शब्द खरे करुन दाखवले होते आणि आता देखील त्यांची त्यादृष्टीने वाटचाल सुरु होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. भाजपमध्ये असतानाही त्यांची इतर पक्षातील नेत्यांसोबतची मैत्री कायम चर्चेत राहीली. विलासराव देशमुख यांच्यासोबतची त्यांची मैत्री महाराष्ट्रासाठी कायम कुतूहलाचा विषय राहीला. मराठवाड्यातील बीड जिल्हा हा मुंडेचा गड होता. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा हे त्यांचे मुळ गाव. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेनेच्या सोबतीने १९९५ मध्ये युतीची सत्ता आणली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. बीड जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली होती. मोठ्या संघर्षाने ते आमदार आणि आता केंद्रीय मंत्री झाले होते. २००९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभा लढवण्यास सांगितली आणि ते संसदेत गेले. तिथेही त्यांनी त्यांची चमकदार कामगिरी करुन दाखवली. लोकसभेत ते पक्षाचे उपनेते होते. महाराष्ट्रात केवळ भाजपचे नेते म्हणूनच त्यांनी काम केले नाही, तर राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील कामगारांचे ते नेते होते. एका साधारण शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ मध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी जन्मलेला हा तरुण पुढे चालून राज्यात उपमुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होईल असे कुणास वाटलेही नव्हते. ११ वी पासूनच ते राजकारणाकडे ओढले गेले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी ते जोडले गेले. त्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पायाला भिंगरी लावत महाराष्ट्र पिंजून काढला. १९८० मध्ये भाजपचा संक्रमणाचा काळ होता. त्यावेळचे भाजपाचे व संघाचे नेते वसंतराव भागवत यांनी तेव्हा मागासवर्गाला भाजपसोबत जोडण्याचे काम सुरु केले होते. त्यांच्या या मोहिमेला माधव हे नाव देण्यात आले होते. माधव म्हणजे, माळी, धनगर आणि वंजारी. मुंडे हे वंजारी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत. प्रमोद महाजन हयात असताना महाजन-मुंडे या जोडगोळीचाच शब्द पक्षात अंतिम होता. मात्र, महाजन यांची हत्या झाल्यानंतर मुंडे पक्षात एकटे पडले होते. मुंडेंनी विधानसभेची पहिली निवडणूक १९७८ मध्ये लढवली मात्र त्यांना यात यश आले नव्हते. त्यानंतर ते बीड जिल्हापरिषदेचे सदस्य झाले. उजणे जिल्हा परिषद गटातून ते निवडून आले.  मात्र, १९८५ मध्ये ते रेणापूर मतदारसंघातून पराभूत झाले. परंतु या पराभवाने खचून न जाता त्यांनी जोमाने काम सुरु केले आणि आपला मतदारांमध्ये पाया भक्कम केला. यातून मुंडेनी पराभव कधी पाहिलाच नाही. १९८० ते २००९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात ते उपमुख्यमंत्री झाले.  त्यांच्या कामगिरीची दखल घेत पक्षाने २००९ मध्ये त्यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि मुंडे केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले. २००९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून  प्रथमच लोकसभेवर निवडून गेल्यानंतर पक्षाने त्यांना उपनेते पद दिले. प्रथमच खासदार झालेल्या नेत्याला एवढे मोठे पद देण्याची ही पहिलीच वेळ होती. युपीएच्या काळात लोकलेखा समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले होते. मुंडेंनी गेल्या काही वर्षात आपल्या कामातून पक्षात आपले जबरदस्त समर्थक उभे केले. त्यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी त्यांच्या सोबतीने राजीनामा देण्याची जी एक स्पर्धा पक्षात लागली होती, त्यावरुन त्यांची पक्षातील ताकद उघड झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून विद्यार्थी सेनेतून तयार झालेला हा तरुण गेल्या तीन तपात राज्यावर आपली छाप पाडून होता. आता आगामी निवडणुकांची जोरदार तयारी करण्याच्या तयारीत ते होते आणि अशा वेळी त्यांच्यावरील हा घाला म्हणजे भाजपाला एक मोठा धक्काच सहन करावा लागणार आहे. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधू शकेल व त्यांचे मन वळवू सकेल असा एकमेव नेता मुंडेंच्या रुपाने भाजपाकडे होता. त्यामुळेच प्रमोद महाजनांच्या निधनानंतर युती टिकविण्याची सर्व जबाबदारी मुंडेंवर होती आणि ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. कॉँग्रसेच्या पारंपारिक राजकारणाला छेद देऊन ८०च्या दशकात जी कॉँग्रेसचे कट्टर विरोधक असलेली पिढी पुढे आली त्यात गोपीनाथ मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येते. मध्यंतरी त्यांचे पक्षात बिनसल्यावर ते पक्ष सोडणार असे चित्र तयार झाले होते. मात्र त्यांचा कॉँग्रेस विरोेध एकढा कडवा होता की त्यांनी पक्ष सोडण्याचा कधी निर्णय घेतला नाही. मुंडेंच्या रुपाने राज्याला लाभलेला एक मागासवर्गीयातील आघाडीचा नेता अचानकपणे राजकीय मंचावरुन निघून गेला आहे. ही घटना धक्कादायक तर आहे, मात्र मुंडें आता या जगात नसले तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात आपला जो ठसा उमटवून ठेवला आहे तो भावी पिढीसाठी कायमचा प्रेरणादायी ठरावा.
-----------------------------------

   

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel