संपादकीय पान गुरुवार दि. ५ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
साक्षेपी संपादक
-----------------------------
महाराष्ट्राच्या राजकीय मंचावरील एक महत्वाची व्यक्ती गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने घाला घातला असताना साहित्यातील दादा माणूस तसेच एक साक्षेपी संपादक आपण त्याच दिवशी गमावला. सत्यकथा आणि मौज या दोन वाङमयीन नियतकालिकांद्वारे मराठी साहित्य क्षेत्रात साक्षेपी संपादनाचा मापदंड निर्माण करतानाच अनेक साहित्यिक घडविणारे ज्येष्ठ संपादक राम पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेली वाट बदलणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. वेळोवेळी शिष्यवृत्त्या मिळवून मराठीत एमए केलेल्या पटवर्धन यांनी पुढच्या काळात मराठीतील अनेक नवलेखक घडविले, अनेकांच्या प्रतिभेला पैलू पाडून मौजेच्या पुस्तकांतून ते वाचकांसमोर आणले. प्रारंभी काही काळ त्यांनी मंत्रालयात नोकरी केली. पण सरकारी खाक्यामध्ये रमणे त्यांच्या स्वभावात नव्हते. काही महिन्यांतच त्या नोकरीचा राजीनामा देऊन ते मौज प्रकाशनगृहात रूजू झाले. मराठी वाङ्मयीन क्षेत्रात दंतकथेचे स्वरूप प्राप्त झालेल्या सत्यकथामध्ये आधी ते कार्यकारी संपादक आणि नंतर मुख्य संपादक होते. जया दडकर, मारूती चितमपल्ली, अनिल अवचट, नारायण सुर्वे, आशा बगे, सानिया, विलास सारंग, यशवंत पाठक, मीना प्रभू आदी मराठीतील अनेक नामवंत साहित्यिकांची पुस्तके त्यांनी संपादित केली. मौजमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले. सत्यकथेने निव्वळ साहित्यावर भर न देता इतर कला, सामाजिक विचार यांनाही स्थान दिलं. त्याची सुरुवात विष्णुपंतांनी केली असली तरी पटवर्धनांनी आपल्या परीने तेच धोरण अवलंबलं. तसं पाहिलं तर सत्यकथेचे दोन कालखंड पडतात. अगदी सुरुवातीचा १९३३ ते १९४५ चा कालखंड सोडून दिला तर १९४५ ते १९६० पर्यंतचा पहिला आणि १९६० ते १९८६ पर्यंतचा दुसरा असे हे दोन कालखंड आहेत. त्यापैकी पहिल्या कालखंडात नवकथेचा सर्वाधिक प्रभाव होता आणि नवकवितेचाही. १९६० नंतरच्या काळात नवनवीन लेखक लिहू लागले आणि सत्यकथेमध्ये येणार्या कथा-कवितांचं स्वरूपही बदललं. राम पटवर्धनांचा संपादक म्हणून ठसा उमटला तो या दुसर्या कालखंडात. जी. ए. कुलकर्णी यांची रूपककथा, ग्रेस यांची कविता; विलास सारंग, श्री. दा. पानवलकर, विद्याधर पुंडलिक, आशा बगे, गौरी देशपांडे, सानिया यांच्या कथा; दिलीप चित्रे, वसंत आबाजी डहाके, गुरुनाथ धुरी यांच्या कविता यांचा हा काळ होता. याशिवाय अनिल डांगे, रत्नाकर पटवर्धन यांसारखे फक्त सत्यकथेपुरतेच लिहिणारे काही लेखक होते. याव्यतिरिक्त संभाजी कदम, विश्वनाथ खैरे, गंगाधर पाटील, अशोक रानडे यांच्यासारखे वेगळ्या विषयांवर वैचारिक स्वरूपाचं लेखन करणारे लेखक होतेच. जया दडकर हे आणखी एक नाव. याच्या जोडीला र. कृ. जोशी यांच्यासारखे अक्षरकवितांचे प्रयोग करणारे होते ते वेगळेच. पटवर्धनांच्या सत्यकथेचं एकूण स्वरूप यावरून लक्षात यावं. अनिल अवचटांचं ललित लेखन आलं ते याच काळात. सत्यकथेवर टीका अधिक उघडपणे होऊ लागली. लघु अनियतकालिकांची चळवळ, दलित साहित्य यामुळे मराठी साहित्याच्या कक्षा विस्तारल्या आणि सत्यकथा हे विशिष्ट जाणिवा जोपासणारं नियतकालिक राहिलं. राम पटवर्धनांची संपादकीय कारकीर्द बघताना हे सारे संदर्भ लक्षात घ्यायला हवेत. चांगला संपादक हा नेहमी नवीन विषयांच्या आणि नवीन लेखकांच्या शोधात असतो. पटवर्धन नेहमीच अशा चांगल्या साहित्याच्या शोधात असत. बोलण्याच्या ओघात असा काही विषय आला तर ते त्या व्यक्तीला तसा लेख लिहून देण्यास सांगत. एखाद्या लेखकाने कथा पाठवली, त्यात काही विकासाच्या शक्यता दिसल्या तर लेखकाला सांगून त्याच्याकडून अधिक परिपूर्ण कशी होईल याची दक्षता घेत. न स्वीकारलेलं लेखन परत पाठवताना ते पत्रामध्ये अशा पद्धतीने कारणं देत की त्यामुळे लेखक दुखावला न जाता त्याची लेखनाची उमेद कायम राही. संपादक आणि लेखक यांच्या नात्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास असावा लागतो. तो एकदा प्रस्थापित झाला की लेखक एका अर्थानं संपादकासाठी, त्याची दाद मिळावी यासाठी लिहीत असतो. संपादकालाही नवनिर्मिती करणारी प्रतिभा असावी लागते. पटवर्धनांपाशी तशी प्रतिभा होती. पाडस कादंबरीच्या भाषांतरातून जशी ती व्यक्त झाली तशीच त्यांनी जे लेखक भोवती जमवले, जुने लेखक सांभाळले, विविध लेखनप्रकारांना सत्यकथेमधून त्यांनी उत्तेजन दिलं. प्रसंगी होणार्या टीकेचा धोकाही पत्करला. यातून जी साहित्यविषयक नवी जाणीव निर्माण झाली ती सत्यकथेपुरती मर्यादित नव्हती, तर एकूण मराठी साहित्यालाच समृद्ध करणारी होती. साहित्यातल्या प्रवाहांची चर्चा करताना साहित्यिकांची नावं घेतली जातात, पण राम पटवर्धनांसारख्या साक्षेपी संपादकांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं असतं. राम पटवर्धनांनी अनेक नवीन लेखक घडविले, अनेकांच्या लिखामातील सुधारणा केल्यामुळे त्यांना एक लिखाणातील नवी दृष्टी लाभली. त्यांनी फारसे स्वतंत्र लिखाण केले नाही. लेखनाची त्यांना हौसही नव्हती. प्रासंगिक विषयाचे लेख त्यांनी मात्र सातत्याने सत्यकथेत लिहिले. मात्र सत्यकथेत ते स्वत: मराठी नाटकांचे परिक्षण लिहित. इंग्रजीतून मराठी भाषांतरे उत्कृष्ट केली. पटवर्धनांच्या जाण्याने सध्या ८० हून जास्त वय असलेल्या संपादकांच्या पिढीतील एक महत्वाचा दुवा निखळला आहे. त्या पिढीतील माणसे आता पुन्हा होणार नाहीत अशीच खंत सध्याचा साहित्याचा दर्जा व संपादकांची पिढी पाहता लागून राहते.
------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा