-->
संपादकीय पान सोमवार दि. ३० जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
नैतिक-अनैतिकतेचा दांभिकपणा
--------------------------------
देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. यावेळी त्यांनी मुलांना लैंगिक शिक्षण देण्यासंबंधी वादग्रस्त विधान केले. नंतर त्यांनी सावसासारव केली आणि आपण लैंगिक शिक्षणाच्या बाजूनेच आहोत. मात्र त्यात अश्‍लिलता नसावी असे म्हणून आपले ज्ञान पाजळले. खरे तर लैंगिक शिक्षणाची आज आपल्य समाजाला प्रामुख्याने तरुणांना निंतांत आवश्यकता आहे. लैंगिक शिक्षणात अश्‍लिलता असल्याचे जर मंत्रिमंहोदयांनी म्हटले तर काय बोलायचे? कारण लैंगिक शिक्षण हे अश्‍लिल ठरविले जाऊच शकत नाही. ते ज्ञान देण्याचा भाग झाला. आज आपल्याकडे समाज नैतिक-अनैतिकतेच्या फेर्‍यात अडकला आहे. अर्थात नैतिक-अनैतिकता म्हणजे नेमके काय? नैतिक-अनैतिक ठरवण्याचा अधिकार नेमका कुणाचा? धर्मसंस्थेचा, राजसत्तेचा की न्यायव्यवस्थेचा? मुळात, जगात नैतिक-अनैतिक असे काही असते का, एकासाठी जे नैतिक तेच, दुसर्‍यासाठी अनैतिक असू शकत नाही का? आदी प्रश्नांची सर्वमान्य उत्तरे अद्याप मिळू शकलेली नसताना, आपल्याकडच्या राजकीय नेतृत्वाने मात्र नैतिक-अनैतिकतेच्या सोप्या व्याख्या करण्याचा छंद विनासायास जोपासलेला आहे. जगात भारतीय धर्मसंस्कृती तेवढी थोर आहे. या धर्मसंस्कृतीने घालून दिलेली नैतिकता तुम्ही पाळा, तुमच्या सगळ्या समस्या मिटतील, सगळे प्रश्न मार्गी लागतील, असा समस्त राजकीय धुरिणांचा सांगावा  आहे. प्रामुख्याने हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे अशी विधाने करीत असतात. संधी मिळेल तेव्हा, संस्कृतीचे दाखले देत नैतिकतेचा डोस देण्याकडेच त्यांचा कल राहिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाही बहुदा तो मोह आवरलेला नाही. अलीकडेच जसे त्यांनी लैंगिक शिक्षणाबाबत डोस पाजले तसेच काही दिवसांपूर्वी देशाचे नवे एड्सविषयक धोरण आखताना जनजागृती मोहिमांमध्ये शरीरसंबंधांत कंडोम वापरापेक्षा एकपत्नीव्रत जपा आणि एड्स टाळा. हीच आपली संस्कृती आहे आणि हेच वैज्ञानिक सत्यही आहे असे म्हटले होते. अशा आशयाच्या नैतिकमूल्याधारित संदेशांची भर घालण्याचे आदेश डॉ. हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या पदाधिकार्‍यांंना दिले. या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या काही स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी देशाचे आरोग्यमंत्री धर्माच्या प्रभावाखाली येऊन जनतेची दिशाभूल करताहेत, म्हणत टीकेची झोड उठवली. त्यावर माझा कंडोम वापराला विरोध नाही, परंतु कंडोम सदोष असू शकतात, त्याने एड्सचा धोका वाढू शकतो. अशा वेळी पत्नीशी एकनिष्ठ राहणे केव्हाही श्रेयस्कर आहे, एवढेच मला म्हणायचे होते, असे म्हणत हर्षवर्धन यांनी स्वत:ची बाजू सावरून घेतली . कुणी म्हणेल, आरोग्यमंत्री काय चुकीचे म्हणाले? ते योग्यच म्हणाले. कंडोम निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या लॉबीला त्यांनी चपराक दिली तेही योग्य झाले, पण नैतिकतेचे दाखले देताना एकपत्नीव्रत ही आपली संस्कृती आहे असे ते जे काही म्हणाले, त्याने ते उघडे पडले. कारण, भारत हा खरोखरच नैतिकता पाळणार्‍यांंचा देश असता, तर शरीरसंबंधातून एचआयव्ही-एड्स झालेला एकही जण आजवर भारतात आढळला नसता. आपण अशा प्रकारे नैतिकतेच्या विनाकारण फेर्‍यात अडकलो आहोत. त्याबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारण्याची आपल्याला जास्त गरज आहे. दुसरा तो अनैतिक आणि आमची संस्कृती पाळणारा तो नैतिक असा आपल्याविषयी फुकाचा गर्व करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याकडे आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यापासून उच्चमध्यमवर्गीय जन्माला मोठ्या संख्येने आला. या वर्गाने अनेक पाश्‍चिमात्य बदल स्वीकारले. हे बदल स्वीकारत असताना आपण आपली जुनी संस्कृती आणि पाश्‍चिमात्य बदल यांचा मेळ घालून त्यातील चांगले ते स्वीकारले पाहिजे होते, त्याऐवजी या दोन्ही संस्कृतीची सरमिसळ झाली. यातून अनेकदा आपल्याकडे दांभिकपणा निर्माण झाला. यातूनच आपल्याकडे अनेक तरुण पिढीत समस्या झालेल्या आढळतात. यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला विज्ञाननिष्ठ असलेले लैंगिक शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel