-->
संपादकीय पान मंगळवार दि. १७ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
समाजवादी चळवळीतील बंडखोर आणि अभ्यासू नेता
--------------------------------------
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार ऍड. व्यंकटेश उर्फ व्यंकाप्पा नारायण पत्की यांचे शनिवारी सायंकाळी मिरज येथील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६४व्या वर्षी निधन झाले.  त्यांच्या जाण्याने आपण एक समाजवादी चळवळीतील बंडखोर आणि अभ्यासू नेता गमावला आहे. युक्रांद चे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपले समाजकार्य सुरू केले. प्रथम समाजवादी पक्षात, नंतर जनता पक्ष आणि जनता दलात त्यांनी बरीच वर्षे काम केले. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, बापूसाहेब काळदाते, भाई वैद्य अशा अनेक समाजवादी नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होते. आमदार संभाजी पवार यांचे अत्यंत जिवलग मित्र म्हणूनही ते ओेळखले जात. त्यांच्याच पुढाकाराने सन १९९६च्या सुमारास ते विधानपरिषदेवर निवडून आले. सहा वर्षे त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. म्हणूनच त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान मिळाला. विधानपरिषदेचे आमदार म्हणून त्यांची कारकीर्द खूप गाजली. ते सदैव, वाचन व अभ्यासात गर्क असत. सांगलीचे माजी नगरसेवक म्हणूनही त्यांनी चोख कामगिरी बजावली होती. १९७० च्या दशकात सांगली जिल्ह्यावर ज्यावेळी कॉँग्रेसचा वरचश्मा होता त्यावेळी विरोधकांना जिल्ह्यात अजिबात स्थान नव्हते अशा वेळी व्यंकप्पा पत्की यांनी सांगली जिल्ह्यात विरोधकांचे राजकारण सुरु केले. म्हणजे खरे तर प्रवाहाच्या विरोधातच त्यांनी त्यावेळी पाऊल टाकले. त्यावेळी सांगली जिल्ह्यावर वसंतदादा पाटील यांचे प्रभूत्व होते आणि कसलीही बाब दादांच्या परवानगी शिवाय होत नसे. राजकारण असो की समाजकारण दादांचेच वर्चस्व होते. व्यंकप्पा पत्की यांच्या मागे कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी राजकारणात पाय रोवले हे एक महत्वाचे. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या पत्की यांनी दादांच्या विरोधात आपले बस्तान बसविले. ही बाब अतिशय अवघड अशीच होती. मात्र संघटनात्मक कौशल्य त्यांच्याकडे एवढे जबरदस्त होते की त्यांनी ते आव्हान सहजरित्या पेललेे. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मात्र या काळात त्यांची ज्येष्ठ समाजवादी नेते ग.प्र.प्रधान यांची भेट झाली आणि प्रधानसरांच्या व्यक्तीमत्वाने पत्की भारावले. तुरुंगात असताना त्यांनी प्रधानसरांच्या भाकरी आणि स्वातंत्र्य या पुस्तकाचे लेखनिक म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणी उठल्यावर ते तुरुंगाच्या बाहेर आले व त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र राजकारण त्यांना अस्वस्थ करीत होते. मूळ पिंड त्यांचा राजकीयच असल्याने त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली व राजारामबापूंचे नेतृत्व मान्य करुन जनता पक्षात सामिल झाले. जिल्ह्यातील घराणेशाही मोडावी म्हणून त्यांनी खूप कष्ट केले. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. पडद्यामागे राहून राजकारण करण्यात आणि परिस्थीती हाताळण्यात पत्कीसरांचा हातखंडा होता. जनता दलात प्रवेश केल्यावर त्यांची पैलवान संभाजी पवार व प्रा. शरद पाटील यांच्यांशी चांगलीच मैत्री जमली. सांगली व मिरजेची आमदारकी जनता दलाला मिळावी यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. त्यांचे जवळचे मित्र संभाजी पवार जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी अनेकांचा असलेला विरोध डावलून त्यांनी पत्की यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. अल्पावधीतच त्यांची एक अभ्यासू व उत्कृष्ट वक्ते म्हणून ओळख सभागृहाला झाली. त्याचबरोबर त्यांचा लोकसंग्रही मोठा होता. तसेच अनेक पत्रकारांशीही त्यांची चांगली मैत्री होती. कांदरवाडीच्या सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक व अध्यक्ष होते. या कारखान्याच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र नंतर त्यांनी आमदार म्हणून कार्यकाल संपल्यावर हळूहळू राजकारणातून निवृत्ती घेतली. राज्याच्याच नव्हे तर सांगलीच्याही राजकारणातून त्यांनी अलिप्त राहणे पसंत केले. आमदार म्हणून कार्यरत असताना खरे तर अनेकांना असे वाटत असे की पत्की यांचे राजकारण प्रदीर्घ काळ या राज्याच्या राजकारणावर छाप पडणारे ठरेल. मात्र त्यांना राजकारणाचा काही काळाने उबग आला आणि त्यांनी त्याला सोडचिठ्ठी दिली. आता तर काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
---------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel