-->
संपादकीय पान सोमवार दि. २८ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
चढलेला पारा
--------------------------
निवडणुकांमुळे राजकीय हवा तापलेली असताना आता कोकणासह सर्व राज्यात तापमानाचा पारा चढू लागला आहे. आपल्याकडे निवडणुकीचे वारे आता थंड झाले असले तरी पावसाळा सुरु होईपर्यंत तरी उष्माच्या ज्वाळा सहन कराव्या लागणार आहेत. निवडणुकांत राजकारण्यांनी व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उन्हाळा कसाबसा सहन करीत निवडणूक पार पाडली. आता निकाल लागेपर्यंत राजकीय वातावरणात तप्तता राहाणार असली तरी तापलेली राजकीय हवा मात्र थंडावली आहे. राज्यभरात आता वैशाख वणव्याची चाहूल लागण्यास सुरवात झाली असून, राज्यातील बहुतेक सर्व मोठ्या शहरांतील तापमानाने आताच चाळिशी ओलांडली आहे. राज्यात सध्या सर्वाधिक तापमान ४२.७ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी येथे नोंदविण्यात आले. कोकणात दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्शियसच्या घरात गेले असून अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही दिवसांपापूर्वी राज्याच्या विविध भागांना गारपीट व अवकाळी पावसाने झोडपले होते. विदर्भाला त्याचा सर्वाधिक फटका बसला होता. दोन दिवसांपर्यंत ऊन- पावसाचा खेळ अनुभवणार्‍या नागरिकांना आज उन्हाचे चटके सोसावे लागले. अशा प्रकारे टोकाच्या हवामानातून आपल्याकडील काही भागातील जनतेला जावे लागत आहे. अलीकडेच अनुभवलेला अवकाळी पाऊस व त्याच्या जोडीला गारपीट. यातून शेतकरी व एकूण विदर्भ, मराठवाड्यातील जनता सावरते तोच आता वाढलेले तापमान. विदर्भात सर्वाधिक तापमान वर्ध्यात नोंदविले गेले, तर नागपूर, अकोला येथे तापमानाने चाळिशी ओलांडली. उन्हाची वाढती तीव्रता आणि चाराटंचाईमुळे राज्यातील दूध उत्पादनावर परिणाम झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिदिन १७ हजार ७०० लिटरने दूध उत्पादनात घट झाली आहे. गाय व म्हशीच्या दुधाचा खरेदीदर पाहता राज्यातील पशुपालकांना, शेतकर्‍यांना रोजचा एकूण पाच लाख रुपयांचा फटका बसत आहे. येत्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता वाढेल, तशी दूध उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. गारपिटीच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांपुढे मात्र कमी दुग्धोत्पादनामुळे नवेच संकट उभे ठाकले आहे. राज्यात तालुकास्तरावरील साडेतीनशेहून अधिक सहकारी दूध संघ आहेत. वर्षाकाठी सरासरी ३० ते ४० लाख लिटरहून अधिक दूध या सघांमार्फत संकलन केले जाते. पण यंदा शेतकर्‍यांबरोबर या संघांनाही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. काही सहकारी संघ दुधाच्या खुल्या विक्रीबरोबरच दुधावर प्रक्रियाही करतात. सध्या दुधाची कमतरता भासत असल्याने हे संघ आर्थिकदृष्ट्‌या अडचणीच्या टप्प्यावर आले आहेत. दूध व्यवसाय शेतकर्‍यांचा आर्थिक कणा मानला जातो; पण चाराटंचाई आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरांमुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या दूध उत्पादकांना वाढत्या उन्हाने चांगलेच घेरले आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात तापमानात मोठी वाढ होत असते. परंतु गेल्या काही वर्षात हे तापमान झपाट्याने वाढत चालल्याचे जाणवत आहे. हा केवळ आपल्याच भागातील बदल नव्हे तर जागतिक स्तरावर हा बदल होत आहे. आपल्याकडे पावसाळा हा अनिश्‍चित झाला आहे. एक तर जास्त तरी पडो किंवा कमी तरी. अशा स्थितीत पावसाळा ओस किंवा उन्हाळा तसेच हिवाळा यांचे ऋतुचक्र बदलत चालले आहे. निर्सगाचा तोल ढासळत चालल्याचा हा परिणाम आहे. कोकणात गेल्या पाच वर्षात तापमान हे किमान दहा अंश सेलश्यिसने वाढल्याचे आढळले आहे. याचा कोकणातील अर्थव्यवस्थेला फटका बसावयास सुरुवात झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोकणातील शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देणार्‍या आंब्याच्या फळावर याचा परिणाम होतो. तापमानावर आंबा व्यवसायाचे भवितव्य अवलूंन असते. तापमानात वाढ झाल्यावर आंब्यावर थेट परिणाम होतो. त्याचपूर्वी अवकाळी पाऊस कोकणात काही ठिकाणी पडल्याने आंब्याचे नुकसानही झाले होते. त्यामुळे एक तर पीक कमी आले आहे आणि त्यात वाढत्या तापमानामुळे आंबा भाजू लागला आहे. प्रामुख्याने रत्नागिरी भागातील आंबा उत्पादकांची ही तक्रार आहे. हे जर असेच चालू राहिल्यास आंबा पिक धोक्यात येईल आणि पर्यायाने आंबा उत्पादक शेतकरीही संकटात येणार हे स्वाभाविक आहे. आंब्याप्रमाणे मच्छि उत्पादनावरही वाढील पार्‍याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्सगाचा हा होत असलेल्या असमतोलावर केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण जगाने विचार करण्याची गरज आहे. आपण या भूतलावरील जी साधनसंपत्ती आहे तिचा र्‍हास करु लागलो आहोत. यामुळे आपल्याला हे टोकाचे हवामान अनुभवयास मिळते. मात्र याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मत भिन्नता जरुर आहे. परंतु आपल्या या वसुंधरेला ओरबाडण्याची जी प्रक्रिया माणसाने सुरु केली त्यातून हे सर्व प्रश्‍न निर्माण झाले आहेत हे आपल्याला मान्यच करावे लागेल. मनुष्याच्या या कर्मामुळेच जगाला हे सर्व अनुभवावे लागत आहे. आपल्याकडे असलेले डोंगर आपण जंगलतोड करुन बोडके करीत चाललो आहोत. जी निर्सगाने दिलेली साधनसंपत्ती आहे तिचा कसलाही विचार न करता ती ओरबाडत आहोत. वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे आपण हवेत विषारी वायू सोडत आहोत. औद्योगिकीकरण हे गरजेचे असले हे एकवेळ मान्य केले तरीही प्रदूषण किती मर्यादेपर्यंत करावयाचे याला देखील मर्यादा आहेत. या सर्व मर्यादा आपण ओलांडल्यामुळेच निसर्ग आपल्यावर कोपला आहे. त्यामुळे अवेळी पाऊस असो किंवा वाढत जाणारे तापमान ही संकटे आपल्यावर येत आहेत. याचा आपण कधी विचार करणार? या प्रश्‍नाचे जोपर्यंत उत्तर सोडविले जात नाही तोपर्यंत तापमानाचा पारा चढतच जाणार आहे.
---------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel