-->
संपादकीय पान गुरुवार दि. २९ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
मालिका ते मंत्री... स्मृती इराणीचा प्रवास!
------------------------------
यावेळच्या लोकसभेत हेमामालिनी ते रेखा, जया बच्चन पासून किरण खेर, शत्रुघ्न सिन्हा अशा अनेक चित्रपट कलाकारांची मांदियाळी असताना तरुण स्मृती इराणीने मात्र यावेळी आपली मंत्रिपदापर्यंत मजल मारण्यात यश मिळविले. ब्युटी प्रॉडक्टचे प्रमोशन नंतर मिस इंडिया स्पर्धेत सहभाग, पुढे मतुलसी विरानीच्या रुपाने देशातली सर्वाधिक लोकप्रिय सून आणि आता नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मनुष्यबळ विकास मंत्री असा एक अनोखा प्रवास स्मृती इराणी यांनी केला आहे. ३८ वर्षाच्या स्मृती इराणी या मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. प्रचंड आत्मविश्वास आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यांच्या जोरावर स्मृती इराणी यांनी एखाद्या सिनेमात शोभावी अशी उत्तुंग भरारी घेतली आहे. स्मृती इराणी यांचे कुटुंब हे संघ परिवारातले. स्मृती इराणीचे आजोबा संघाचे स्वयंसेवक होते आणि भाजपचे कार्यकर्ता होते. मागील तीन पिढ्यांपासून त्यांचा कुटुंबाचा भाजपशी संबंध आहे. वैचारिक पातळीवर हे कुटुंब नेहमीच भाजपधार्जिणे राहिले आहे.  यांनी २००३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजकीय कारकिर्द सुरू केली. चौदाव्या लोकसभेत दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून कपिल सिब्बल यांच्या विरोधातल्या निवडणुकीत स्मृती इराणी यांचा पराभव झाला. पण उत्कृष्ट वक्ता असल्यामुळे स्मृती इराणी यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आणि २०११ मध्ये गुजरातमधून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. १६ व्या लोकसभेसाठी अमेठी मतदारसंघातून कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाच स्मृती इराणी यांनी आव्हान दिले. अमेठीत राहुल यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करणा-या स्मृती यांचा पराभव झाला, मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे पद मिळाले.
अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणा-या स्मृती इराणी यांनी दहावीत असल्यापासूनच स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सुरुवात केली. नोकरी करुन मिळालेल्या पैशांतून स्मृती इराणी स्वतःसाठी खर्च करत होत्या. दिल्लीत ब्युटी प्रॉडक्टचे प्रमोशन करण्यासाठी त्यांनी २०० रुपयांची पहिली कमाई केली. ही स्मृती इराणी यांची स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचा मार्ग ठरवण्याच्या दिशेने झालेली सुरुवात होती. रुढी-परंपरा जपणा-या पंजाबी-बंगाली कुटुंबातल्या ३ मुलींमध्ये सर्वात लहान असलेल्या स्मृती इराणी यांनी १९९८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत स्मृतीला विशेष यश मिळाले नाही. पण आता मुंबईतच नशिब घडवायचे असे स्मृती इराणी यांनी स्वतःच्या मनाशी एकदम पक्के करुन टाकले. मिळेल ते काम करायचे पण टिकून राहायचे असा विचार करुन स्मृती इराणी यांनी मुंबईमध्ये वांद्रे येथे मॅकडोनाल्डमध्ये नोकरी स्वीकारली. ही नोकरी करत असतानाच स्मृती यांनी ग्लॅमर वर्ल्डमध्ये संधी शोधायला सुरुवात केली. उत्तम आवाजाच्या जोरावर स्मृती इराणी यांनी ओ ला ला ला कार्यक्रमाचे अँकरिंग करण्याची संधी मिळवली. स्मृती इराणी यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. लवकरच एकता कपूरने स्मृती इराणी यांना टीव्ही मालिकेतून काम करण्याची संधी दिली. क्योंकी सास भी कभी बहू थी कार्यक्रमाद्वारे प्रचंड लोकप्रिय झालेल्या स्मृती इराणी यांनी आपले बालपणीचे पारशी मित्र जुबिन इराणी यांच्याशी विवाह केला. मुलगा जोहर आणि मुलगी जोईश यांची आई झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी अचानकपणे राजकारणात प्रवेश केला. खेर तर त्यांच्या हातात त्यावेळी बर्‍यापैकी मालिका होत्या. भाजपची राष्ट्रीय सरचिटणीस, २०१० मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय महिला मोर्चाची अध्यक्ष नंतर पक्षाची उपाध्यक्ष असा प्रवास करणा-या स्मृती इराणी यांनी दरम्यानच्या काळात विरुद्ध आणि थोडी सी जमीन थोडा सा आसमान अशा दोन टीव्ही मालिकांची निर्मिती केली. या मालिकांना मर्यादीत यश मिळाले पण राजकीय पटलावर स्मृती इराणी यांनी वेगाने प्रगती केली. अशा प्रकारे मालिकांप्रमाणे इराणी यांनी राजकारणातही आपले बस्तान अल्पावधीत बसविले. आता मंत्रिणबाई म्हणून त्यांची कामगिरी अशी असेल हे बघण्यासारखे असेल.
---------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel