-->
संपादकीय पान बुधवार दि. २८ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
मोदी युगाचा प्रारंभ
----------------------------
नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी झाल्याने आता मोदी युगाचा प्रारंभ झाला आहे. मोदी यांच्या समावेत ज्या ४५ मंत्र्यांचा समावेश झाला आहे त्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचा समावेश नसल्याने एक प्रकारचा धक्काच बसला आहे. अडवाणी व जोशी या दोघांनी मोदी यांच्या विरोधात यापूर्वी अनेकदा तार छेडली होती. त्यामुळेच त्यांना ज्येष्ठतेच्या नावाखाली डावलून मोदी यांनी पक्षात एक जोरदार धक्कातंत्र दिले आहे. त्यामुळे मोदी यांच्या मंत्रिमंडळात केवळ मोदी यांच्या गटातीलच सदस्य आहेत. यात अपवाद केवळ उमा भारती यांचा आहे. कारण उमा भारतीसारख्या व्यक्ती या कोणत्याच गटातील नाहीत, त्या स्वयंभू आहेत. मोदी हे देखील स्वयंभू आहेत. त्यामुळे अशा दोघा स्वयंभू व्यक्तींचे कसे पटेल हा प्रश्‍न आहेच. ज्याप्रकारे भाजपाचा निवडणूक प्रचार हा नरेंद्र मोदी या व्यक्ती केंद्रीत होता त्याचप्रमाणे आता मंत्रिमंडळातही मोदी यांचीच माणसे आहेत. म्हणजे संपूर्ण सरकार मोदीच चालविणार आहेत असे दिसते. आणखी एक मुद्दा म्हणजे या मंत्रिमंडळावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्णपणे छाप आहे. त्यामुळे आम्ही राजकारण करीत नाही असे सांगणार्‍या संघाच्या ताब्यात आता सरकारची सर्व सूत्रे राहाणार आहेत. सध्या मंत्रिमंडळ हे सुटसुटीत म्हणजे फक्त ४५ जणांचे आहे. नजिकच्या काळात म्हणजे किमान एक वर्षे तरी त्याचा विस्तार होणार नाही. त्यामुळे रामदास आठवलेंपासून भाजपामधील जे रुसलेले नाराज मंत्रीपदाचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता नाही. रामदास आठवले यांना पहिल्यांदा खासदारकी हवी होती, आता ती मिळाल्यावर मंत्रिपद हवे झाले. बरे यांची ताकद ती काय, अशा स्थितीत मोदी त्यांना मंत्रिपद देणे शक्य नव्हते. आठवलेंचा हा रुसवा मोदी युगात तरी संपण्याची चिन्हे नाहीत. नेहमी पाकिस्तानवर गरळ ओकणार्‍या शिवसेनेलाही नवाझ शरिफ यांच्या समोर आपल्या एकमेव मंत्र्याला शपथ घेणे भाग पडले. शिवसेनेला सध्या एकाच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले असताना हे मंत्रिपद कोणते असेल याचाही अजून पत्ता लागलेला नाही. त्यातच मंगळवारी अनंत गितेच्या पदरात अवजड मंत्रालयाची माळ पडल्याने ते नाराज झाले आहेत. अवजड मंत्रालय म्हणजे खरे तर बिनखात्याचा मंत्री असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेला असल्या एका बोगस मंत्रिपदाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या तत्वाला मुरड घालावी लागली हे दुदैवी आहे. कारण आज नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना सीमेवर आपल्या जवानांचे शिरकाण होत असतानाही शपथविधीला बोलावले उद्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात येण्याचे आमंत्रणही दिले जाईल. हे शिवसेनेला पसंत पडेल का? कारण याच शिवसेनेने पाकिस्तानचा संघाचा सामना होऊ नये यासाठी यापूर्वी क्रिकेटचे पीच उखडले होते. आता शिवसेना मोदी सरकारमध्ये असताना पाक संघाचे स्वागत मुंबईत करील का, असा प्रश्‍न आहे. महाराष्ट्राने कधी नव्हे एवढे बळ यावेळी शिवसेना-भाजपाला दिले असताना मोदींनी मात्र केवळ सहा मंत्री दिले आहेत. मुंबईसारख्या महानगरात कॉँग्रेसचा सफाया करुन सहाही ठिकाणी विजय नोंदविणार्‍यांपैकी एकालाही मंत्रिपदाची लॉटरी लागली नाही. तीच स्थिती राजस्थान, मध्यप्रदेश व मोदींच्या गुजरातमध्ये आहे. देशाचा कारभार करताना प्रत्येक समुदायातील प्रतिनिधीला, प्रत्येक धर्मियांना मंत्रिमंडळात स्थान देणे हे पंतप्रधानांचे कर्त्यव्य आहे. निदान तसा तो एक प्रकारचा संकेत आहे. मात्र  तसे देशव्यापी प्रतिनिधीत्व मोदींच्या मंत्रीमंडळात दिसत नाही. या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लिम मंत्री आहे. नजमा हेपतुल्ला या मंत्री झाल्या खर्‍या परंतु त्या दहा वर्षापूर्वी कॉँग्रेसमधून आलेल्या होत्या. त्यांच्यापेक्षा प्रदीर्घ काळ पक्षात असलेले व भाजपाचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले गेलेल्या शहनवाझ हुसेन, मुक्तार अब्बास यांना मंत्री करता आले असते. परंतु मोदी यांनी या नेत्यांना वेटींग मध्ये ठेवून त्यांचा एकप्रकारे अपमानच केला आहे. अशा प्रकारे मोदी यांच्या युगाला प्रारंभ होत असताना अनेक नाराजीचे सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. एन.डी.ए. या आपल्या आघाडीत असलेल्या शिवसेना, अकाली दल, टी.डी.पी. या पक्षांची आता मोदी यांना गरज नसल्याने त्यांची त्यांनी एखादे मंत्रिपद देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता भाजपाला स्वबळावर सत्ता मिळाल्याने त्यांना आता अन्य मित्र पक्षांची गरज राहिलेली नाही. त्यामुळेच त्यांनी मित्रपक्षांना अशा प्रकारची मंत्रिपदे देऊन त्यांची जागा दाखवून दिली आहे. निवडणूक काळात मोठ्या एैटीत भाषण करुन कॉँग्रेसला नामोहरण करुन सोडणार्‍या मोदींची शपथविधीच्या वेऴची देहबोली मात्र काहीशी दबावाखाली असल्यासारखी होती. तीच स्थीती राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांचीही होती. खरे तर शपथविधीच्या वेळी आनंदी वातावरणात त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहावयास हवा होता. कदाचित त्यांच्यावर आलेल्या जबाबदारीची कल्पना त्यांना सतावत असावी. कारण सत्तेत येण्यापूर्वी लोकांना दिलेली आश्‍वासने आता पूर्ण करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. देशापुढील आव्हाने ही काही लहान-सहान नाहीत. त्याचबरोबर आपण ज्या सोशल मिडायाच्या माध्यमातून कॉँग्रेस विरोध प्रचार करुन सत्तेत आलो तोच प्रचार आपल्या विरोधातही सोशल मिडियातून होऊ शकतो. त्यासाठी आपण लोकांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली पाहिजे हा तणाव मोदींपासून अनेक आघाडीच्या मंत्र्यांच्या देहबालीतून दिसत होता. नमो युगाचा प्रारंभ होत असताना ही देहबोली बरेच काही बोलून जाते.
-----------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel